(केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्रांचे जनक असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला, त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीला, अभिवादन)

वर्तमानपत्र! असं नुसतं म्हटलं तरी पहिलं मनात काय येतं? चांगल्या झोपेनंतरची सकाळ, वाफाळता चहा आणि हातात वर्तमानपत्र. दिवसाची सुरुवात कशी मस्त बहारदार. काही लोकांना तो पेपर नंतर टॉयलेट मध्ये नेण्याची सवय असते म्हणा, पण ती आपण विचारात नको घेऊया.

आता, वर्तमानपत्र लोकं का आणि कशासाठी वाचतात? काही लोकांना फक्त मुखपृष्ठ बघायचे असते कारण सगळ्या ठळक बातम्यांचा एक प्रकारे गोषवाराच मिळतो. काही जण वर्तमानपत्र उघडतातच मुळी खेळाचे पान वाचायला तर काही जण संपादकीय सदर प्रथम वाचतात. कित्येक लोकं तर फक्त शब्दकोडे आणि सुडोकूसाठी पेपर घेतात. तसेच खूप जण मराठी नाटकांसाठी, बऱ्याच बायका कुठले सेल चालू आहेत बघायला, तर काही जण फक्त छोट्या जाहिराती (विवाह, नोकरी आणि बरेच तत्सम) बघतात. खऱ्या वाचकांना शनिवारी आणि रविवारी मेजवानीच असते. ललित लेख, मुलाखती, सदरे, सेलिब्रिटी लोकांचे स्तंभ असा भरगच्च मेवा. बऱ्याच लोकांना तर वर्तमानपत्राशिवाय आयुष्य सुद्धा असू शकते हा साधा विचार सुद्धा करता येत नाही.

परंतु गेले काही वर्षे प्रिंट मीडिया आता फार काळ तग धरू शकणार नाही अशी जगभर चर्चा चालू आहे. दिवसागणिक फोफावत जाणारा डिजिटल मीडिया हा प्रिंट मीडियाला विळखा घालेल का हा प्रश्न जगभरातील विश्लेषकांना भेडसावतो आहे.

आज भारतात एक लाखाच्या वर वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिके प्रकाशित होतात. अगदी आपल्या मराठीतच अंदाजे 25 मोठी वर्तमानपत्रे आहेत आणि देशभरात सुमारे 22 भाषांमधून अंदाजे 25 कोटी लोकांपर्यंत वर्तमानपत्रे पोहोचतात. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी वर्तमानपत्र 6 जानेवारी 1832 साली प्रकाशित केले. म्हणजेच वर्तमानपत्र क्षेत्राचा इतिहास जवळ जवळ 178 वर्षे इतका जुना आहे. नंतरच्या काळात लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, गोविंदराव तळवलकर, निळूभाऊ खाडिलकर अशा दिग्गजांनी हा वसा तसाच सुरु ठेवला.

आपण माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. वर्तमानपत्रांचा आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा होता. त्याकाळी जनमत बदलायचे व त्याचे चळवळीत रुपांतर करावयाचे काम वर्तमानपत्रांनी चोख बजावले. कारण तेव्हा विश्वासार्हता हे वर्तमानपत्रांचे सर्वात मोठे भांडवल होते. खरे, खोटे करतांना पुर्वी ठामपणे वर्तमानपत्राला साक्षी ठेऊन सांगितले जायचे की वर्तमानपत्रात छापून आले आहे म्हणजे सत्यच असणार. ह्याच बरोबर समाज प्रबोधन हा सुद्धा वर्तमानपत्रांचा प्रमुख उद्देश होता.

कालांतराने जसजसा कागद, छपाई, पत्रकार, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च वाढू लागला तसतसे वर्तमानपत्र चालवणे कठीण होऊ लागले आणि मग जाहिराती मिळवण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. त्यामुळे हळूहळू ही समाजनिष्ठा संपुष्टात येऊ लागली. वर्तमानपत्र हे आता निव्वळ जाहिरातींचा धंदा झालाय जणू आणि त्याचा परिपाक म्हणजे जाहिरातींसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी.

1995 नंतर वर्तमानपत्रांची थोडीफार पीछेहाट होऊ लागली आणि त्याचे प्रमुख कारण टीव्ही न्यूज चॅनेल्स. त्यांच्या लाईव्ह न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज जास्त प्रकर्षाने पहिल्या जाऊ लागल्या कारण वर्तमानपत्र हे फक्त सकाळी येणार. आता जेव्हापासून पेडन्यूज सुरु झाल्या आहेत, तेव्हापासून वर्तमानपत्राची तसेच टीव्ही न्यूज चॅनेल्सची विश्वासार्हता पार रसातळाला गेली आहे. पूर्वी पत्रकारांचा एक दबदबा असायचा, एक प्रकारचा सन्मान दिला जायचा त्यांना परंतु आज ते सगळं संपत चाललंय.

गेल्या दहा वर्षांत घडलेला दुसरा एक मोठा बदल म्हणजे सोशल मीडिया. आज संपूर्ण जगाचे व्यक्त होण्याचे माध्यम सोशल मिडीया झालाय, असं आपण म्हणू शकू. पूर्वी कोणालाही व्यक्त व्हायचे असेल तर वर्तमानपत्र हे एकच माध्यम होते. परंतु आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळू लागली. जणू प्रत्येक जण स्वतःच वार्ताहर आणि पत्रकार झालाय. व्हाट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा अनेक माध्यमातून तरुण वर्ग आपापली मते मांडू लागला. आणि त्यामुळे वर्तमानपत्रांची गरजच एक प्रकारे कमी झाली आहे.

सध्याचंच बघा ना, कोरोनाची टाळेबंदी चालू होऊन चार महिने झाले आणि आजवरच्या 178 वर्षाच्या वर्तमानपत्राच्या इतिहासात प्रथमच वर्तमानपत्र बंद राहण्याचा प्रसंग आला आणि आपल्या सर्वांच्याच घरी पेपर येणं बंद झालं. सुरुवातीला खूप त्रास झाला, चुकल्याचुकल्या सारखे वाटू लागलं. खरा विचार करायचा तर सद्यकाळात जास्त करून 40-45 वयोगटाच्या पुढील लोकंच वर्तमानपत्र हातात घेतात. तरुण पिढीला वर्तमानपत्राचे पूर्णपणे वावडे आहे असे म्हणणे अजिबात धाडसाचं होणारं नाही. टाळेबंदीच्या ह्या काळात जसे महिने उलटू लागले तसे वर्तमानपत्र वाचणाऱ्या पिढीच्याही हे लक्षात येऊ लागलं की पूर्वी जरी रोज आपल्या दिवसाची सुरुवात वर्तमानपत्रांनी होत होती तरी आता मात्र वर्तमानपत्र नसले तरी अडतंच असं नाही. त्यामुळे एक प्रकारे वर्तमानपत्र वाचायची लोकांची गरज संपली आहे की काय? असं वाटू लागलं. असं म्हणता येईल का की वृत्तपत्र क्षेत्राला कोरोनारुपी दृष्ट लागली आहे?

आपल्या देशातच जवळजवळ 67 कोटी लोकांकडे इंटरनेट आहे आणि आज मोबाईलमुळे संपुर्ण जगातील ई पेपर आपल्या हातात उपलब्ध झालेत, आणि ते सुद्धा फुकटात. आज सारा प्रिंट मीडिया डिजीटल युगाकडे धाव घेतोय. आज भारतातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रे ई-पेपर म्हणून वाचता येऊ शकतात. त्यामुळे साहजिकच वर्तमानत्रांचे प्रमुख जाहिरातदार सुद्धा आता डिजिटल व सोशल मिडीयाकडे वळू लागलेत आणि आता जाहिराती देखील बहुतेक वेबसाईटवर उपल्बध झाल्यात.

डिजिटल युगामुळे आधीच वर्तमानपत्राचा खप 30% ते 40% कमी झालायं आणि त्यात जाहिराती नाही मिळाल्या तर उद्या कदाचित वर्तमानपत्राचा आर्थिक कणाच मोडकळीला येईल. त्याचा दृश्य परिणाम आजच दिसू लागला आहे. ह्या उद्योगात कर्मचारी आणि वेतन कपात आधीच सुरु झालेय. पण आता त्यांच्या बरोबरीने वर्तमानपत्रावर अवलंबून असणाऱ्या छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांचे भविष्य देखील अंधारात ढकलले जाईल असेच चित्र दिसते आहे.

आज लोकशाहीचा हा चौथा खांब सरकारच्या जाहिरातीवर कसाबसा तग धरून उभा आहे. पण या कोरोनाच्या संकटात सरकारचे खजिने रिक्त होऊ लागलेत. अशा परिस्थितीत जर सरकारने उद्या वर्तमानपत्राला जाहिराती देण्याचे बंद करण्याचे ठरवले तर आज जो काही थोडाफार बुडत्याला काडीचा आधार मिळतोय तो देखील संपुष्टात येईल. त्यामुळे या वातावरणात वर्तमापत्राचे भविष्य सद्यस्थितीत तरी अंधूक व धुसर दिसतंय.

कोरोना टाळेबंदी अजून किती काळ चालणार आणि तिचे अजून किती टप्पे होतील हे कोणीही सांगू शकत नाही. या महापुरात किती व्यवसाय तग धरून उभे राहतील हे देखील येणारा काळच ठरवेल. एअरलाईन्स, ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉटेल, रेस्तराँ यांच्याबरोबरीने वर्तमानपत्रांसुद्धा घरघर लागेल का? जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत अनेक धंदे संपलेत. आता ती वेळ प्रिंट मिडीयावर येऊन ठेपली आहे असा एक सूर सध्या जाणवतो. बऱ्याच जाणकारांच्या मते आणखी पाच-सात वर्षानी वर्तमानपत्रे इतिहासजमा होतील.

पूर्वी अशी एक समजूत होती की वर्तमानपत्र हातात असले म्हणजे जनमत आपल्या बाजुने वळवता येते आणि त्या अनुषंगाने इतर व्यवसाय देखील करता येतात. त्यामुळे हे क्षेत्र भांडवलदारांचे आणि राजकारण्यांच्या उत्पन्नाचे मोठे साधन झाले होते आणि त्याचा परिपाक म्हणजे सगळी मीडिया हाऊस ही बड्या बड्या धेंड्यांच्या अधिपत्याखाली गेली. परंतु आज कोरोनाने मात्र सर्वांचे पुरते वस्त्रहरण केल्याचे चित्र दिसतंय.

असा हा जागतिक लोकशाहीचा चौथा खांब परत पूर्वीच्या ताठ मानेने उभा राहावा अशी माझ्यासकट जरी बऱ्याच लोकांची इच्छा आणि अपेक्षा असली तरी ते खरंच शक्य आहे का? This is the billion dollar question. Or Is Corona the last straw on the camels (media’s) back?

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Media #Advertisements #TV_News #Corona #Democracy #वर्तमानपत्रे #मीडिया #सोशल_मीडिया