70000 वर्षांपूर्वी, आपले पूर्वज हे या पृथ्वीतलावरील क्षुल्लक प्राणी होते. आदिमानवांबद्दल ज्ञात असलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते नगण्य होते. त्यांच्या अस्तित्वाचे जगावर उमटलेले पडसाद हे जेलीफिश, काजवे किंवा सुतारपक्षी ह्यांच्यापेक्षा जास्त नव्हते. याउलट आजचा मानव या ग्रहावर आपली सत्ता गाजवत आहे. आणि प्रश्न हा आहे की आपला त्या अवस्थेपासून ते आतापर्यंतचा प्रवास झाला कसा? आफ्रिका खंडाच्या एका कोपर्‍यात चुपचाप गुजराण करणारी वानरे या पृथ्वीग्रहावर अधिराज्य कशी करती झाली?

सामान्यत: आपण वैयक्तिक स्तरावर आपल्यात आणि इतर सर्व प्राण्यांत असणारा फरक पाहतो. आपल्याला, निदान मला तरी असा विश्वास वाटतो, की माझ्यात, माझ्या शरीराच्या घडणीत, माझ्या मेंदूत काहीतरी वेगळे विशेष आहे जे मला कुत्रा किंवा डुक्कर किंवा चिंपँझी पेक्षा श्रेष्ठ बनवते. परंतु सत्य हे आहे की वैयक्तिक पातळीवर मी एखाद्या चिंपँझीसारखाच आहे. आणि जर तुम्ही मला आणि एका चिंपँझीला एखाद्या निर्जन बेटावर, कोण अधिक सक्षम आहे हे पाहण्यासाठी एकत्र सोडलेत, आणि जर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला झगडावे लागले, तर मी पैजेवर सांगेन की चिंपँझी जास्त चांगल्या प्रकारे आपले अस्तित्व टिकवून राहील. आणि ह्यात व्यक्तिश: माझ्यात काही कमतरता आहे असे नाही, कारण जर तुमच्यापैकी कोणालाही जरी चिंपँझी सोबत एखाद्या बेटावर ठेवले तरीही, चिंपँझीच अधिक चांगला टिकाव धरेल.

माणूस आणि इतर सर्व प्राण्यांमधला खरा फरक वैयक्तिक पातळीवर नसून सामूहिक पातळीवर आहे. माणूस ह्या ग्रहावर आपले अधिपत्य गाजवू लागला कारण तो एकमेव असा प्राणी आहे की जो परिवर्तनशील असून खूप मोठ्या समूहात राहून एकत्रितरित्या काम करू शकतो. आता इतरही अनेक समाजप्रिय कीटक आहेत, जसे की मधमाश्या अथवा मुंग्या, जे मोठ्या संख्येने वसाहत करून सहचर्याने जगतात परंतु सहजी ते परिस्थितीनुसार स्वत:ला बदलत नाहीत. त्यांचे समुहकार्य अत्यंत काटेकोरपणे चालते. मधमाश्याच्या पोळ्याचे कार्य हे मूलत: एकाच अंगाने चालते आणि कोणतीही नवीन संधी आली किंवा धोका दिसू लागला तरी, मधमाश्या त्यांच्या समूहकार्य पद्धतीत त्वरित बदल घडवून आणू शकत नाहीत. उदाहरणार्थ, राणी माशीचा अंमल संपुष्टात आणत नाहीत किंवा पोळ्यातील सर्व मधमाश्यांचे समान हक्क/सत्ता देणारी वा कामकरी मधमाशांची साम्यवादी हुकूमशाही स्थापन करत नाहीत. इतर संगतीप्रिय सस्तन प्राणी, म्हणजे लांडगे, हत्ती, डॉल्फिन्स, चिंपँझी, जे आपल्या सवयीत परिवर्तन घडवून सहकार्याने राहू शकतात परंतु त्याचे प्रमाण खूप कमी आहे कारण सहकार्य करण्यासाठी त्यांना एकमेकांची पुरेशी ओळख असणे आवश्यक असते. जर मी चिंपँझी आहे आणि तुम्ही एक चिंपँझी आहात आणि मला तुमच्याबरोबर सहयोगाने रहायचे असेल तर मी, तुम्ही कोणत्या प्रकारचे चिंपँझी आहात? तुम्ही चांगले चिंपँझी आहात का? की दुष्ट चिंपँझी आहात? तुम्ही विश्वासार्ह आहात का? तुम्ही कसे आहात? ही सर्व माहिती असल्याशिवाय मी तुमच्याशी सहकार्य करणार नाही.

होमो सेपियन (म्हणजे मानवजात) हा असा एकमेव प्राणी आहे की ज्याच्यात समूहात राहून, सहयोगाने वागून एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी परिस्थितीनुसार स्वत: मधे योग्य ते बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.

एक विरुद्ध एक किंवा दहा विरुद्ध दहा चिंपँझी आपल्या पेक्षा कदाचित आपल्यापेक्षा बलशाली ठरतील. परंतु, 1000 माणसे जर 1000 चिंपँझी बरोबर जुंपवली तर माणसांचा सहज विजय होईल हे निश्चित, कारण 1000 चिंपँझी माणसांप्रमाणे एकजुट करु शकत नाहीत. जर तुम्ही 100000 चिंपँझी ऑक्सफर्डच्या रस्त्यावर, किंवा वेम्ब्ले स्टेडियम वा तियानमेन चौकात कोंबलेत तर प्रचंड गदारोळ होईल. आता फक्त कल्पना करून पहा की एक लाख चिंपँझीना वेम्ब्ले स्टेडियम मध्ये सोडले आहे; ठार वेडेपणा!

मात्र कित्येक हजारो माणसं तिकडे नेहमीच जमतात पण कधीही गोंधळ उडत नाही, उलट तो सहकार्याने वागणार्‍या सुसभ्य सुसंस्कृत लोकांचा मेळावा असतो. मानवी इतिहासात, मानवाने आतापर्यंत मिळवलेल्या विजयात, मग ते पिरामिड बांधणे असो वा चंद्रावर स्वारी करणे असो, हा एका व्यक्तीच्या सामर्थ्याचा विजय नाही तर समूहात राहून सहकार्याने काम करण्याच्या, परिवर्तनशीलतेच्या क्षमतेचा विजय आहे.

आता मी जे हे भाषण देतो आहे त्याबद्दल सुद्धा विचार करून बघा. मी इथे 300-400 प्रेक्षकांसमोर उभा आहे आणि तुमच्यातील बहुतेकांना मी ओळखतही नाही. त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले तेही माझ्या परिचयाचे नाहीत. काल ज्या विमानाने लंडनला आलो त्याचा पायलट अथवा कर्मचारी वर्ग ह्यांनाही मी ओळखत नाही. माझ्या आजच्या भाषणाचे ध्वनिचित्रमुद्रण करणाऱ्या कॅमेरा आणि माइक्रोफोनचे शोधकर्ते आणि निर्माते कोण हे मला माहित नाही. माझ्या भाषणाची पूर्वतयारी करण्यासाठी जी पुस्तके आणि लेख संदर्भासाठी वापरली त्यांच्या लेखकांशी माझा परिचय नाही. ब्यूनोस आईर्स किंवा नवी दिल्लीत बसून इंटरनेटवर ह्या भाषणाचा व्हिडीओ पाहणारे सुद्धा माझ्या ओळखीचे नसतील. परंतु आम्ही जरी एकमेकांना ओळखत नसलो, तरी जागतिक स्तरावर, आपल्या एकत्रित सहकार्याने काम केल्याने, विचारांचे आदान प्रदान शक्य होते. हे चिंपँझी मात्र करू शकत नाही. त्यांच्यात परस्परात संवाद होतो, पण एक चिंपँझी प्रवास करून दुसऱ्या चिंपँझीच्या टापुत जाऊन, केळी, हत्ती किंवा तत्सम काही विषयावर गप्पा मारत आहे असा विचार आपण करूच शकत नाही.

सहकार्य हे नेहेमीच चांगले असते असेही नाही. ऐतिहासिक काळापासून मानवप्राणी काही अतिशय भयानक कृत्ये करत आला आहे आणि आपण आज सुद्धा भयंकर कृत्ये करीत आहोत. ही सगळी कृत्ये देखील व्यापक सहकार्यावरच आधारित आहेत. तुरुंग हे सहकार्याची एक प्रणाली आहे, पशुवधगृहे ही देखील सहकाराची एक प्रणाली आहे तसेच छळ छावण्या या देखील सहकार्याची एक प्रणाली आहे. चिंपँझीच्या जगात तुरुंग, पशूवधगृहे व छळ छावण्या नाहीत.

आता समजा मी तुम्हाला पटवून देऊ शकलो की, होय, आपण या जगाचे नियंत्रण करतोय कारण आपण मोठ्या संख्येने आणि भोवतालच्या परिस्थितिनुसार बदलून सहकार्य करू शकतो. यावर लगेच एखाद्या जिज्ञासू श्रोत्याच्या मनात येणारा पुढचा प्रश्न म्हणजे, आपण हे नक्की कसे करतो? सर्व प्राणिमात्रांमध्ये फक्त आपल्यालाच असे सहकार्य करणे कसे शक्य होते? यावर उत्तर आहे आपली कल्पनाशक्ती. आपण अगणित अनोळखी लोकांशी सहजरित्या सहकार्य करू शकतो कारण, या पृथ्वीतलावरच्या समस्त प्राण्यांमध्ये फक्त आपणच कल्पनारम्य आणि काल्पनिक कथा निर्माण करतो व त्यावर विश्वास ठेवतो. आणि जोपर्यन्त सगळे सारख्याच काल्पनिक कथांवर विश्वास ठेवतात तोपर्यन्त सगळे समान नियम व मूल्यांचे पालन करतात. इतर सर्व प्राणी आपापल्या संपर्क प्रणालीचा उपयोग वास्तवाचे वर्णन करण्यासाठी करतात. एखादा चिंपँझी असे म्हणू शकतो की, तो पहा, तेथे एक सिंह आहे, आपण सगळे इथून पळून जाऊ, किंवा ते पहा, तेथे एक केळ्याचे झाड आहे, आपण जाऊन काही केळी आणू.

मानव मात्र आपली भाषा / वाचा केवळ वास्तवाचे वर्णन करण्याकरिताच वापरत नाही तर नवीन कल्पनेतील वास्तव निर्माण करण्यासाठी देखील करतो. एखादा माणूस असे म्हणू शकतो की, तो पहा, तेथे आकाशात त्या ढगांवर देव आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागला नाहीत, तर तुम्ही मेल्यावर देव तुम्हाला शिक्षा करील व तुम्हाला नरकात पाठवेल. आणि तुम्ही सर्व जर या कथांवर विश्वास ठेवलात तर तुम्ही तेच समान नियम, कायदे व मूल्यांचे पालन कराल आणि सहकार्य कराल. हे केवळ मानवच करू शकतात. तुम्ही एखाद्या चिंपँझीकडून केळे हस्तगत करण्यासाठी असे सांगून पटवू शकत नाही की, बाबा रे, तू मेल्यावर चिंपँझीच्या स्वर्गात जाशील आणि तेथे तुला तुझ्या पुण्यकर्मांबद्दल खूप सारी केळी मिळतील म्हणून तू तुझे हे केळे आता मला दे. कुठलाही चिंपँझी अशा कथांवर विश्वास ठेवणार नाही; फक्त मानवप्राणी अशा कथांवर विश्वास ठेवतात व म्हणूनच आपण जगाचे नियंत्रण करतो आणि चिंपँझी प्राणी संग्रहालय किंवा संशोधन प्रयोगशाळांमध्ये बंदिस्त असतात.

त्यामुळे तुम्हाला आता हे पटू शकेल की, होय, या धार्मिक कल्पनाकथांवर विश्वास ठेऊन माणसे एकमेकांशी सहकार्य करतात. लाखो लोक एकत्र येऊन एखादे कॅथीड्रल किंवा मशीद बांधतात किंवा एखादे धर्मयुद्ध अथवा जिहाद करतात कारण ते देव, स्वर्ग आणि नरकाच्या त्याच कथांवर विश्वास ठेवतात. मात्र मला येथे या गोष्टीवर जोर द्यायचा आहे की इतरही व्यापक मानवी सहकार्याच्या मागे हेच तंत्र काम करत असते, केवळ धार्मिक क्षेत्रात नव्हे. उदाहरणादाखल, न्यायाचे क्षेत्र घ्या. आज जगातील बहुतेक सर्व कायदेप्रणाली या मानवी अधिकारांच्या विश्वासावर आधारित आहेत. पण मानवी अधिकार काय आहेत? मानवी अधिकार हे देव आणि स्वर्ग या कथांसारखेच आपण निर्माण केलेली एक कथा आहेत. ती वस्तुस्थिती नाही; आणि होमो सेपीयन्सशी संबंधित एखादे जीवशास्त्रीय तथ्यही नाही. एखादा माणूस घ्या, त्याची चिरफाड करा आणि आत पहा, तुम्हाला तेथे हृदय, मूत्रपिंड, मज्जातंतू, संप्रेरके, डीएनए इत्यादी सापडेल परंतु मानवी अधिकार मात्र सापडणार नाहीत. मानवी अधिकार फक्त एकाच ठिकाणी सापडतील आणि ते म्हणजे कथांमध्ये, ज्या आपणच निर्माण केल्या आणि गेली अनेक शतके पसरवल्या. या कथा सकारात्मक असतील, चांगल्याही असतील पण शेवटी त्या आपल्या कल्पनाशक्तीतून आपणच निर्माण केलेल्या काल्पनिक कथाच असतात.

राजकीय क्षेत्रातही असेच चित्र दिसते. आधुनिक राजकारणाचे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे राज्ये आणि राष्ट्रे. परंतु राज्ये आणि राष्ट्रे म्हणजे नक्की काय? ती काही वस्तुस्थिती नाही. एखादा पर्वत ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही तो पाहू शकता, त्याला स्पर्श करू शकता, त्याचा गंधही घेऊ शकता. परंतु, इज्राएल किंवा इराण किंवा फ्रान्स किंवा जर्मनी सारखी राष्ट्रे म्हणजे केवळ कथा आहेत ज्या आपण निर्माण केल्यात व ज्यांच्याशी आपण खूप घट्ट बांधले गेले आहोत.

आर्थिक क्षेत्रातही हे असेच चित्र दिसते. कंपन्या व कॉर्पोरेशन्स हे जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. तुमच्यापैकी सुद्धा बरेच जण गुगल किंवा टोयोटा किंवा मॅकडोनल्ड्स सारख्या कॉर्पोरेशन्स साठी काम करत असाल. हे नक्की काय आहेत? वकील लोक याला “कायदेशीर कल्पना” असे संबोधतात; या सर्व कथा आहेत ज्या वकील नावाच्या शक्तिशाली तज्ञ लोकांनी शोधल्या व पसरवल्या. आणि ही सर्व कॉर्पोरेशन्स दिवसभर काय करतात? बहुतेक करून ते पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असतात. आणि पैसा म्हणजे तरी काय? पैसा ही काही वस्तुस्थिती नाही, त्याला वस्तूनिष्ठ मूल्य नाही. ही हिरव्या रंगाची डॉलरची नोट बघा, त्याला काहीच मूल्य नाही. तुम्ही ती खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, पांघरूही शकत नाही. पण येथे अवतरतात कुशल कथाकार, बँकेचे उच्चपदस्थ अधिकारी, वित्तीय मंत्री, प्रधान मंत्री आणि हे सर्व आपल्याला एक पटू शकणारी कथा सांगतात. ते म्हणतात, हे पहा, तुम्हाला हा हिरव्या रंगाचा कागदाचा तुकडा दिसतोय? त्यातून १० केळी घेता येतील इतके त्याचे मूल्य आहे. आणि जर मी, तुम्ही आणि सर्वांनी यावर विश्वास ठेवला, तर हे सहजी चालून जाते. मी हा निरुपयोगी कागदाचा तुकडा घेऊन सुपरमार्केट मधील एका अनोळखी व्यक्तीला – ज्याला मी या आधी कधीच भेटलो नाही – देऊन त्या बदल्यात खरीखुरी केळी घेऊन ती खाऊ शकतो. हे सर्व विस्मयकारक आहे.

हे तुम्ही चिंपँझीसोबत कधीच करू शकत नाही. होय, चिंपँझी नक्कीच बोलतात, तुम्ही मला शहाळे द्या, मी तुम्हाला केळे देईन, इथपर्यंत हे चालू शकते. परंतु तुम्ही मला एक निरूपयोगी कागदाचा तुकडा दिलात तर त्या बदल्यात मी तुम्हाला माझ्याकडचे केळे देईन? कधीच नाही!! कोण समजलात तुम्ही मला? एक मानव?

खरं तर, मानवाने शोधलेल्या आणि कथन केलेल्या सगळ्या कथांमध्ये पैसा ही सर्वात यशस्वी कथा आहे कारण या कथेवर सगळ्यांचा विश्वास आहे. सगळ्यांचाच देवावर विश्वास असतोच असे नाही, सगळ्यांचाच मानवी अधिकारांवर विश्वास असतोच असे नाही, सगळ्यांचाच राष्ट्रवादावर विश्वास असतोच असे नाही, परंतु सगळ्यांचाच पैशावर विश्वास असतो. ओसामा बिन लादेनचेच उदाहरण घ्या ना! तो अमेरिकन राजकरणाचा, अमेरिकन धर्माचा व अमेरिकन संस्कृतीचा तिरस्कार करे, परंतु त्याचा अमेरिकन डॉलरला कधीच विरोध नव्हता. खरंतर, त्याला ते खूप आवडायचे.

शेवटी असेच म्हणावे लागेल की आपण मानव जगाचे नियंत्रण करतो कारण आपण दुहेरी वास्तवात जगत आहोत. इतर सर्व प्राणिमात्र वस्तुस्थिती मध्ये जगत असतात. त्यांच्या वास्तवामध्ये नद्या, झाडे, सिंह आणि हत्ती यासारख्या वस्तुनिष्ठ गोष्टी असतात. आपण मानव देखील वास्तवात जगत असतो. आपल्याही वास्तव जगात नद्या, झाडे, सिंह आणि हत्ती यासारख्या गोष्टी आहेत. परंतु शतकानुशतके आपण या वास्तव्यावर अजून एक वास्तवाचा दूसरा थर चढवला आहे. एक असे वास्तव, जे देव, पैसा, कॉर्पोरेशन्स सारख्या कल्पित अस्तित्वापासून बनलेले आहे. आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे, जसा इतिहास उलगडत गेला, तसे हे कल्पित वास्तव अधिकाधिक शक्तिशाली बनत गेले आणि आज ते जगात सर्वात प्रभावशाली बनले आहे. आज, नद्या, झाडे, सिंह आणि हत्ती यासारख्या वस्तुनिष्ठ गोष्टींचे अस्तित्व टिकून राहणे हे यूनाइटेड स्टेट्स, गूगल, जागतिक बँक अशा केवळ आपल्या कल्पनेत असणार्‍या काल्पनिक संस्थांच्या निर्णय व इच्छाशक्तीवर अवलंबून राहिले आहे.

धन्यवाद

The original link of the TED Talk delivered by Yuval Harari, in London.

https://youtu.be/nzj7Wg4DAbs

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Apes #Homo_Sapiens #Chimpanzee #Harari