सध्या कोरोना विषाणूमुळे सर्वसाधारण लोकांचा असा एक सूर दिसतो की हे सर्व चीनने मुद्दामून घडवून आणले त्यामुळे त्यांना घडा शिकवायला हवा आणि त्याचा एक भाग म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा.

मला अजून तरी हे पटत नाही की चीनने असा विषाणू फैलाव मुद्दामून केला. आता तो त्यांच्या वुहान शहरातील प्राण्यांच्या बाजारातून पसरला की तेथील बायो लॅब मधून अपघाताने पसरला हे कळायला मार्ग नाही. परंतु कितीही विचार केला तरी एका गोष्टीचे मात्र उत्तर मिळत नाही आणि ते म्हणजे हा विषाणू 8000-10000 किमी अंतरावर असलेल्या इटली- पश्चिम युरोप आणि 12000-14000 किमी अंतरावर असलेल्या अमेरिका या देशात धुमाकूळ घालतो आणि वुहान पासून 800-1000 किमी अंतरावरील शांघाय आणि बेजिंग शहरात त्याचा फारसा प्रादुर्भाव कसा होत नाही? दुर्दैवाने चीन म्हटल्यावर मिळणारी माहिती किती खरी यावर कायमच प्रश्नचिन्ह असते.

बऱ्याच लोकांचे त्यावर असे म्हणणे की चीनने जी अत्यंत कठोर पावले (extreme steps) उचलली त्यामुळे तो फक्त वुहान शहरापुरता मर्यादित राहिला. परंतु एका गोष्टीचे चीन समाधानकारक उत्तर देऊ शकलेला नाही आणि ते म्हणजे जर या विषाणूचा पहिला रुग्ण नोव्हेंबर अखेरीस लक्षात आला होता तर मग या कठोर उपाययोजना अमंलात आणायला जानेवारीचा तिसरा आठवडा का उजाडावा लागला? वुहान शहरात लॉकडाऊन आधीच का करण्यात आला नाही? ज्यायोगे त्याच्या सीमा बंद झाल्या असत्या आणि कोणीच येऊ जाऊ शकले नसते.

त्यामुळे आता असं म्हणता येईल की जे परदेशी लोक वुहान मध्ये आले किंवा जे वुहान मधील बाधित रुग्ण विमानाने पाश्चिमात्य देशांमध्ये गेले आणि त्यामुळे हा उद्रेक झाला. हे म्हणत असताना दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कुठल्याही देशातील जेव्हा एक मनुष्य परदेशी जातो तेव्हा त्याच वेळी शेकड्यांनी लोकं देशांतर्गत प्रवास करत असतात. जर यात तथ्य आहे असं मानलं तर मग चीनमध्ये वुहान बाहेर काहीही प्रसार कसा झाला नाही? मानसिक गोंधळाने डोकं पार चक्रावून जाते. पुढील धक्कादायक घटना म्हणजे काही आठवड्यांपूर्वी चीनने असा दावा केला की आमच्या देशातील कोरोना संपला आणि तो आनंद साजरा करायला वुहान शहरात आतषबाजी केली. संपूर्ण जग होरपळून निघत असताना अशी आतषबाजी करणे म्हणजे कोडगेपणाची परिसीमा आहे. लगेच पुढची बातमी की सर्व ठिकाणचे कारखाने आणि आस्थापने चालू झाली. हा सर्व घटनाक्रम बघितला की माझ्यासारख्या माणसाच्या मनात देखील शंकास्पद स्थिती निर्माण होते आणि संशयाची सुई चीनकडे बोट दाखवायला लागते.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील एका सुपरमार्केट मधील एक व्हिडिओ बघण्यात आला. तेथील नागरिक एका चायनीज जोडप्याला काहीही खरेदी न करून देता हाकलून देताना बघितले. हे जरी चुकीचे असले तरी ती एक स्वाभाविकपणे उमटणारी प्रतिक्रिया आहे. आज जगभरात मुस्लिम समाजाबद्दल उमटणारी प्रतिक्रिया याच पठडीत मोडते कारण बहुसंख्य मुस्लिम समाज त्यांच्या धर्माच्या नावाखाली ज्या अतिरेकी कारवाया होतात त्याचा उघड निषेध करताना दिसत नाहीत त्यामुळे त्यांचा या गोष्टींना पाठींबा आहे असे ध्वनित झाल्यामुळे असे होते. हिटलरच्या काळात जर्मन लोकांनी त्याच्या निघृण नरसंहाराचा विरोध अथवा निषेध केला नाही त्यामुळे एक प्रकारे सर्वच जर्मन दोषींच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. तसेच थोडेसे आत्ता आहे, अर्थात चीनमधील नागरिकांना त्यांच्या व्यवस्थेविरुद्ध बोलणे फारच कठीण आहे परंतु दुसऱ्या देशाचे नागरिक झालेले चिनी सुद्धा आपला निषेध कधी नोंदवताना दिसत नाहीत. त्यामुळे मग अशा पार्श्वभूमीवर असे पडसाद काही अंशी न टाळता येणारे असतात.

एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की नुसत्या बहिष्काराच्या घोषणा करून काहीही घडणार नाही, भावनिक आवाहन या पलीकडे त्याला काहीही किंमत नाही. आणि अशी आवाहने गेली बरेच वर्षे केली जात आहेत पण त्यातून आजपर्यंत तरी काहीही साध्य झालेलं नाही. दर दिवाळीला तसेच जरा काही चीनबरोबर कुरबुर झाली (मग डोकलाम किंवा हफीज सईद किंवा तत्सम काहीही) की अशी आवाहने केली जातात. हे देशप्रेमा पोटी केलेलं विधान म्हणून जरी सहमत झालो तरी पण वास्तवात अत्यंत कठीण !!!

गेल्या काही दशकात चीनने जगाची बाजारपेठ विचारपूर्वक व नियोजनबद्ध रीतीने काबीज केली आहे, आता जगातील सर्व प्रमुख कंपन्यांची उत्पादन केंद्रे चीन मध्ये आहेत. आज जगातील एकही अशी गोष्ट नाही की चीनमध्ये बनत नाही, आणि नुसती बनतच नाही तर ती प्रचंड घाऊक प्रमाणात आणि अत्यंत स्वस्त. त्यामुळेच चीनच्या रेड ड्रॅगनने सर्व जगाची बाजारपेठ काबीज केली आहे.

आम्ही या पुढे चिनी वस्तू घेणार नाही म्हणजे तुम्ही काय काय घेणार नाही हे आधी नक्की ठरवा, नक्की नीट विचार करा, तुमच्याकडे असलेली घरातील, ऑफिस मधील प्रत्येक गोष्ट कुठून आली आहे हे फक्त तपासून बघा. ज्याच्यावर “मेड इन इंडिया” असं लिहिलेलं असतं त्यात सुद्धा 50-80% गोष्टी चिनी उत्पादित असू शकतात. अगदी टाटांच्या गाडी मध्ये सुद्धा काही सुटे भाग हे चीन उत्पादीत किंवा चिनी मशिनरी वापरून उत्पादन केलेले असतील !!! इलेक्ट्रोनिक वस्तूंमध्ये तर विचारूच नका. भारतात मिळणारे किंबहुना जगात विकले जाणारे मोबाईल, टीव्ही, कॉम्पुटर, प्रिंटर, कॅमेरा, आणि रोजच्या वापरातील असंख्य गोष्टी या चिनी आहेत. एकच उदाहरण देतो; 2019 मध्ये भारतात 16 कोटी मोबाईल हॅन्डसेट विकले गेले आणि त्यातील 72% हिस्सा हा Xiaomi, Oppo, Vivo, Realme, OnePlus या चायनीज कंपन्यांचा होता.

आपण काय काय घ्यायचं थांबविणार?

बरं, दुसरं म्हणजे अशी भीमगर्जना करणारा कोणीही महाभाग असं म्हणत नाही की आम्हीं चिनी वस्तूंच्या तोडीच्या वस्तू बनवून दाखवू. माझं असे ठाम मत आहे की बहुसंख्य भारतीय वस्तूंचा दर्जा सुमार असतो. याचे मूळ कारण म्हणजे, आम्हा भारतीयांच्या रक्तातच गुणवत्तापूर्ण काम करणे नाहीये. चलता है ही आमची वृत्ती सगळीकडे दिसून येते. त्यामुळे आधी स्वतःमध्ये बदल घडवून आणा आणि मग या अशा भावनिक देशप्रेमी घोषणा करा.

देशप्रेम जरूर असावं परंतु ते वास्तवास धरून नसेल तर फजितीची पाळी येते.

चीनला कशी टक्कर द्यायची किंवा त्यांना कसं थोपवायचं, हा जागतिक प्रश्न आहे, आणि भले भले देश, अगदी अमेरिका सुद्धा, याचं अजूनही उत्तर शोधू शकलेले नाहीत. बऱ्याच लोकांना कल्पना नसेल पण अमेरिकेत होणाऱ्या एकूण चायनीज आयातीतील 10% हिस्सा एकट्या Walmart चा आहे. आज Walmart, Target, Home Depot, Kohl’s, Macy’s सारखे सुपरमॉल्स हे चायनीज आयातीवर अवलंबून आहेत. याचाच अर्थ जोपर्यंत जगातील लोकांची वस्तू स्वस्त मिळण्याची हाव सुटत नाही तोपर्यंत चीनला मरण नाही. त्यामुळे आपण चीनची कोंडी करू म्हणणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत.

आजपर्यंत जगाला हे न उलगडलेले कोडं आहे की चीनला हे कसे काय शक्य होतं? माझ्या मते कुठल्याही लोकशाही असणाऱ्या देशात हे अशक्य आहे. सगळे नियम धाब्यावर बसवणे, मीडियाची गळचेपी करणे, Human Rights ला फाट्यावर मारणे, स्वतःच्या नागरिकांना कसलेही स्वातंत्र्य न देणे, आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीचा पूर्णपणे नायनाट करणे, कुठलीही खरी गोष्ट जगाला कळू न देणे आणि अजून बऱ्याच काही गोष्टी फक्त कम्युनिस्ट देशात म्हणजेच हुकूमशाहीतच घडू शकतात. आणि त्यामुळेच चीनचा वरचष्मा आहे.

आज चीनशी समोरासमोर टक्कर देणे कुठल्याही देशाला अशक्य आहे. परंतु सर्वसामान्यांनी मनात आणलं तर या गोष्टीला सुरुवात होऊ शकते. ज्या वस्तू पूर्णपणे Made in China आहेत, मग ती MG Hector गाडी असो वा आयफोन असो, ग्राहक म्हणून जर आपण नाकारू शकलो आणि स्वस्त गोष्टींचा हव्यास थोडा जरी कमी करू शकलो तर अशा कंपन्यांना फेरविचार करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पण हो, ह्या गोष्टी जादूच्या कांडी सारख्या 1-2 वर्षात घडणार नाहीत हे ही लक्षात घ्यायला हवं. तसेच त्याच बरोबरीने प्रचंड श्रम, मेहनत घेऊन अत्यंत चिकाटीने आपल्या देशात तयार होणाऱ्या मालाच्या दर्जावर विशेष भर द्यायला हवा.

यातील एक मोठा अडथला म्हणजे सर्वच देशातील अत्यंत सुमार दर्जाचे राजकारणी आणि त्यांची ‘कसेही करून फक्त निवडून येणे’ यासाठी चाललेली दळभद्री राजकीय गणिते, आणि दुर्दैवाने दिवसेंदिवस वाढत चाललेली अडाणी प्रजा !!!

असा बदल घडवून आणायला जनतेची मानसिकता आणि त्याच्या बरोबरीने राजकीय ताकद हवी. मला स्वतःला तरी सध्या कुठल्याही देशाला हे जमेल असे वाटत नाही. आणि त्याचमुळे चीनच्या औद्योगिक एकाधिकारशाहीचे हे शिवधनुष्य भेदणे अवघड वाटते.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Corona #China #Cheap_Goods #Boycott #कोरोना #चीन # स्वस्त_गोष्टी #बहिष्कार