कायापालट

आपण जेव्हा कायापालट असा शब्द वापरतो तेव्हा तो एखाद्या स्थितीत, माणसात अथवा जागेत झालेला संपूर्ण पण चांगला बदल ध्वनित करण्यासाठी असतो. बदल आपल्या शहरांमध्येही होत असतो. आज आपल्या नजरेसमोर मुंबई शहराचे पालटलेले रूप आपण बघतो आहोत. परंतु मुंबईचे सुंदर स्वरूप बकाल झाले आहे त्यामुळे त्याचा कायापालट न म्हणता आपण त्याला अधोगती म्हणतो. आज शहरांप्रमाणेच गावागावात रूपबदल होतो आहे पण तो किती चांगला आणि किती वाईट हे स्थानिक रहिवासीच सांगू शकतात. त्यामुळे अधोगती की कायापालट हे व्यक्ति सापेक्ष आणि स्थान सापेक्ष असते. माझा जन्म शिवाजीच्या पार्क परिसरात झाला आणि त्यातील बदलांवर तर मी एक पूर्ण लेखमालिका लिहिली. माझ्या आयुष्यातील दुसरा महत्वाचा परिसर म्हणजे प्रभादेवी.

हे नाव प्रभादेवीच्या मंदिरामुळे या परिसराला देण्यात आले असावे. श्री प्रभादेवी मंदिराचा इतिहास मोठा रंजक आहे.

महिकावती (हे माहीमचं एक नाव आहे) ही सदर बखर सन १४४८ ते सन १५७८ या दरम्यान लिहिली गेली असून त्यात सन ११४० (शके १०६२) ते साधारणतः सन १३४० या दोनशे वर्षांच्या दरम्यान केळवे-माहीम आणि मुंबई माहीम या परिसरात घडलेल्या राजकीय घटनांचा उल्लेख आहे. चालुक्य कुळाचा राजा, प्रताप बिंब, (याची कुलदेवता शाकंभरी, जी प्रभावती या नावानेही ओळखली जाते) याची कोकण प्रांतातील मूळ राजधानी केळवे-माहीम हातची गेल्यानंतर सन ११४० च्या दरम्यान मुंबईतील माहीम येथे नवीन राजधानी केली. कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात कुलदेवतेच्या स्थापनेने करायची प्रथा आपण आजही पाळतो. त्याप्रमाणे प्रताप बिंबाने माहीम येथे आपली कुलदेवता श्री प्रभावती हिचं देऊळ स्थापन केले. तिच्या उजव्या-डाव्या हाताला श्री कालिका आणि श्री चंडिका देवींची स्थापना केली. श्री कालिका देवी ही राजा प्रताप बिंबाचे सरचिटणीस गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता तर श्री चंडिका देवी राजा प्रताप बिंबाचे पुरोहित असलेल्या हेमाडपंतांची कुलदेवता असल्याचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत स्पष्टपणे आहे. हे दोघेही राजा प्रताप बिंबासोबत माहीमला आल्याची तसेच गंभीरराव सूर्यवंशींना वरळी गाव इनामात दिल्याची नोंद बखरीत आहे. या महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या कुलदेवतांना बरोबरीचं स्थान देऊन त्यांचा सन्मान केला असावा किंवा या कुलदेवता असलेल्या समाजाला आपल्या राज्यात बरोबरीचं स्थान आहे, असा संकेत दिला असावा.

परंतु आज जिथे मंदिर पाहतो ते तिचे मूळ ठिकाण नव्हे कारण ते होते मुंबईच्या माहीमात. कारण प्रताप बिंबाची राजधानी माहीम होती व कुलदेवतेचे मंदिर राजधामा नजीकच असणार. कृष्णराव रघुनाथजी नवलकर यांच्या The Hindu Temples of Bombay ह्या पुस्तकात हे मंदिर माहीमच्या कोटवाडीत होते असा उल्लेख आहे. कोटवाडी म्हणजे आजच्या यशवंत नाट्यगृहाच्या आसपास असलेली वस्ती. कालांतराने मुसलमान आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी देवस्थाने उध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आणि हे मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. परंतु मंदिर उध्वस्त होणार याची कुणकुण लागलेल्या या देवीचे पूजक असलेल्या पाठारे प्रभू समाजातील लोकांनी ती मूर्ती विहिरीत दडवून ठेवली. पुढे जवळपास २०० वर्षांपेक्षा जास्त ती मूर्ती विहिरीच्या तळाशी पडून राहिली. पुढे धर्मांध आक्रमकांचा जोर ओसरला तेव्हा ती मूर्ती विहिरीतून काढून तिची विक्रम संवत १७७१, म्हणजे इसवी सन १७१५ सालात आताच्या मंदिरात तिची प्राणस्थापना केलेली आहे असा शिलालेख मंदिरात पाहायला मिळतो. त्यामुळे प्रभादेवीच्या आताच्या मंदिरालाही ३०० पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत. आणि या मंदिरातील देवीची मूर्ती आजपासून सुमारे ८८० वर्षांपूर्वीची आहे असे म्हणता येईल.

भूतकाळ (१९८० पर्यंत):-

आमच्या मराठे कुटुंबाचा प्रभादेवीशी संबंध १९६१ साली सर्वप्रथम आला. माझे आजोबा, अप्पासाहेब मराठे यांनी पोर्तुगीज चर्चची प्रभादेवीतील जागा लीझ वर घेतली. त्यावेळी ती जागा एक प्रकारे जंगलातच होती तरी देखील त्या जागेत अनधिकृत झोपड्या आणि शेती करणारे लोक होते. एक स्टॅंडर्ड मिल सोडली तर बाकी आसपास काहीही नाही. आम्ही राहतो त्या जागेपासून ही जागा फक्त अडीच किमी दूर पण तरी देखील माझ्या आईला प्रश्न पडला होता की अशी जंगलात जागा घेण्याची गरज काय? आज विचार केला तर हसून हसून पुरेवाट होईल. पुढील अनेक वर्षे तिथे स्टॅंडर्ड मिल, मराठे उद्योग भवन आणि रॅशनल आर्ट सोडून इमारतीच नव्हत्या. खरं तर प्रभादेवी हा अतिशय लहान परिसर आहे. सिद्धिविनायक देवळापासून (सयानी रोड जंक्शन) सुरु होतो तो डाव्या बाजूला अथवा समोर गोखले रोड पर्यंत आणि उजवीकडे सेंच्युरी बझार पर्यंत; बस्स संपला. प्रमुख रस्ते म्हणजे वीर सावरकर मार्ग, अप्पासाहेब मराठे मार्ग, शंकर घाणेकर मार्ग, सयानी रोड, पी बाळू मार्ग आणि न्यू प्रभादेवी रोड. आजूबाजूच्या छोट्या बोळांमध्ये मंचरजी फ्रामजी, म्हात्रे, हातिस्कर, कवळी, डिसिल्वा, भगवानदास, पाटील, भानकर, नागू सयाची अशा नावांच्या वाड्या, तसेच आदम जिवाजी, द्वारकादास त्रिभुवन, रावजी वाणी, दयाळ वेलजी, संताची, साखरबाई या चाळी आणि काद्री मॅन्शन, इराणी कंपाऊंड, सुलतान मॅन्शन, भिकू बिल्डिंग, मुलजी हाऊस अशा काही बैठ्या इमारती. (हाती काढलेल्या नकाशा बघा म्हणजे साधारण अंदाज येईल. हा नकाशा अगदी अचूक असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल)

काही लोकांच्या मते श्री सिद्धिविनायक मंदिर १६३५ साली (संवत १६९२) स्थापण्यात आले परंतु सरकारी दस्ताऐवजानुसार ते १९ नोव्हेंबर १८०१ रोजी स्थापन झाले. श्रीमती देऊबाई पाटील या निपुत्रिक महिलेने आपले पैसे दान करून लक्ष्मण विठू पाटील या ठेकेदाराकडून (contractor) ते बांधून घेतले. पण पूर्वी सिध्दीविनायक मंदिर कसे होते? एक कौलारू बैठी जागा. त्याच्या अगदी बाजूच्या सोसायटीत माझे काका राहायचे आणि त्यांच्या गॅलरीमध्ये उभे राहिले की बरोब्बर समोर गणपतीचे दर्शन व्हायचे.

१९७३ सालापर्यंत मराठे उद्योग भवन समोर रस्ताच नव्हता. समोरच्या प्रभादेवी मंदिराच्या गल्लीत गाडी उभी करावी लागे.

त्यावेळी सेंच्युरी बझार पासून सिध्दीविनायक देवळापर्यंतचा रस्ता दुतर्फा रहदारीचा होता. परंतु ट्रॅफिक वाढायला लागल्यामुळे आतील रस्ता प्रस्तावित करण्यात आला. त्यावेळी श्री. सदानंद वर्दे, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. त्यांचे प्रयत्न आणि सहकार्यामुळे पुढे होणाऱ्या रस्त्याचे नामकरण अप्पासाहेब मराठे मार्ग असे मंजूर करण्यात आले. पण आता बोलायचे म्हणजे जर तो रस्ता आधी झाला असता किंवा त्याला आजच्या इतके महत्व असते तर हे नाव नक्कीच बाद झाले असते. कुठल्यातरी राजकारणी व्यक्तीच्या नावाची वर्णी लागली असती.

तरी देखील पुढील २-३ वर्षे रस्ता काही पूर्ण झाला नव्हता पण आम्ही झोपडपट्यांच्या मधून गाडी आणायला लागलो. पण ते करताना देखील अत्यंत काळजी घ्यावी लागे. माझ्या वडिलांना आणि राजाभाऊ केळकर यांना ३-४ वेळा गाडीखाली कोंबडी मेली म्हणून पैसे द्यावे लागले होते.

१९७७-७८ साली तो रस्ता दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी एक दिशा मार्ग (वन वे) करण्यात आला आणि पुढील काही वर्षात या रस्त्याचा विकास हा आम्हालाही थक्क करणारा आहे.

पुढील कालखंड (१९८० – २०२०):-

आजची परिस्थिती काय आहे? सिध्दीविनायक हे भारतातील एक श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन पासून सगळे छोटे मोठे सेलिब्रिटी या मंदिरात जातात. सुरक्षेच्या नावाखाली मंदिराने त्यांच्या समोरील अर्धा रस्ता अतिक्रमण करून व्यापून टाकला पण कोणाची बोलायची टाप नाही. सगळ्यांना येणाऱ्या भाविकांची काळजी पण सामान्य मुंबईकराचे किती हाल होतात याचे कोणालाही सोयरसुतक नाही. कुठे रस्ता बंद करतील, कुठे टॅक्सी स्टॅन्ड करतील याचा नेम नाही.

आमचा (हे गमंतीत म्हणतोय बरं का) अप्पासाहेब मराठे मार्ग तर ऑटो हब झाला आहे. एक सुझुकी सोडली तर भारतातील जवळपास सर्व गाड्यांच्या, उदा. होंडा, ह्युंदाई, स्कोडा, वोक्सवॅगन, टाटा, एमजी हेक्टर, मर्सिडीझ, लँबोर्गिनी, पोर्शे अशा अद्ययावत शो रूम या रस्त्यावर आहेत. टोलेजंग इमारतींनी या परिसराची स्काय लाईनच बदलून टाकली आहे. मुंबईतील सर्वात महागडी घरं आज इथे विकली जातात. दीपिका पदुकोण वगैरे सेलिब्रिटी मंडळी सुद्धा आज प्रभादेवीत राहायला येऊ लागली. पूर्वीच्या सर्व वाड्या आणि चाळी आज अस्तित्वातच नाहीत. काही जुनी नावे फक्त शिल्लक राहिली आहेत. आजूबाजूच्या गल्ली बोळांमध्ये काही जुन्या इमारती अजून आहेत पण पुढील काही वर्षात त्या ही राहणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एकेकाळी असलेला मराठी परिसर आज पार बदलून गेला आहे. तसेच ५० वर्षांपूर्वीचा असलेला हा औद्योगिक भाग आज प्रामुख्याने निवासी आणि काही प्रमाणात कमर्शियल ऑफिसेसचा झाला आहे.

भविष्याची चाहूल:-

काही वर्षांपूर्वी नरिमन पॉईंट हा कमर्शियल हब होता आणि प्रत्येक कंपनीच्या दृष्टीने तिथे ऑफिस असणे क्रमप्राप्त होते. कालांतराने तिथून ऑफिसेस प्रथमतः वरळी, प्रभादेवी, परळ आणि अंधेरीला स्थलांतरीत झाली आणि सध्या बीकेसी मध्ये ऑफिस असणे गर्वाची गोष्ट घडली आहे. हल्ली कोणीही ऑफिसची जागा विकत घेत नाही; भाड्यानेच जागा घेतल्या जातात. पूर्वी कमर्शियल जागेला निवासी जागेपेक्षा जास्त भाव मिळत असे. आता मात्र पूर्णपणे उलटी परिस्थिती आहे. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात ऑफिस कुठे आहे याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे कमर्शियल जागांची भाडी वाढणे तर सोडा पण कायम कमीच होत आहेत. या सर्व रेट्यात आमचा तरी किती काळ निभाव लागणार हे तो भगवंतच जाणे.

बरं ज्या नवीन टोलेजंग इमारती होत आहेत त्या सर्व निवासी आहेत आणि ज्यांचे भाव पार गगनाला भिडलेले आहेत. आज जरी बांधकाम व्यवसायात मंदीचे वातावरण असले तरी मुंबईत जागाच कमी त्यामुळे चांगले प्रोजेक्ट्स होत राहतील. मात्र मराठी माणूस ते विकत घेण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही. आजपासून काही वर्षात प्रभादेवीत मराठी माणूस औषधालाही सापडणार नाही आणि ते बघत राहण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही.

कालाय तस्मै नमः !!

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Prabhadevi #Transformation #प्रभादेवी #कायापालट #सिद्धिविनायक #Auto_Hub #Siddhivinayak

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.