आम्ही, नीरजा या आमच्या सामाजिक संस्थेमार्फत गेले काही वर्षे विक्रमगड तालुक्यातील (पालघर जिल्हा) येथे जल व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेत आहोत. बर्‍याच निराधार आणि गरीब लोकांना आमच्या प्रयत्नांचा लाभ मिळाला आहे. तसेच आम्ही दुमाडापाडा येथील निकामी बंधाऱ्याचे पुनर्वसन केले आहे ज्यायोगे जवळजवळ ७० हुन अधिक शेतकऱ्यांना जलसिंचनाचा फायदा झाला आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन आलो आणि बघून खूप आनंद झाला की यावर्षीच्या अभूतपूर्व पावसाला तोंड देत बंधारा व्यवस्थित टिकलाच नाही तर अजूनही ओसंडून वाहत आहे.

त्यामुळे तेथील शेतकरी भाजीपाला लावून दोन ते तीन पिके घेऊ शकतील म्हणजेच काय तर त्यांच्या विकासात आमचा छोटा हातभार.


तसेच संस्थेच्या कामामुळे पाणी टंचाई कमी होण्यास हातभार लागला आहे. जिथे उन्हाळ्यात १५ टँकरनी पाणी पुरवले जात होते त्याची संख्या वर आली आहे. विक्रमगड पंचायत समितीने सुद्धा नीरजाच्या कामाची दाखल घेतली आहे. दि. सप्टेंबर २०१९ च्या त्यांच्या मासिक सर्वसाधारण सभेत नीरजा संस्थेचे कौतुक करण्यात आले आणि लवकरच त्यांचे अभिनंदन पत्र आम्हाला मिळेल अशी आशा आहे.

या वर्षीच्या पावसाचा विचार केला तर असा सर्वसाधारण समज असेल की पाण्याची कमतरता भासणार नाही. दुर्दैवाने गुजरातपासून कोकणपर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यातील भूभाग कठोर आणि अभेद्य लाव्हा खडकापासून बनलेला आहे आणि जमिनीत पाणी शिरत नाही अथवा मुरत ही नाही. त्यामुळे लोकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात.

आम्ही विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात व्यापक सर्व्हे करीत आहोत. सुमारे ५०० ते ६०० लोकांची पाण्याची गरज भागेल अशी विहीर बांधण्यासाठी एक जागा शोधली आहे. ती मोखाडा तालुक्यातील घनवळ, हिरवे या गावी ती असेल आणि तेथीलमहिला परिवर्तन संस्थायांच्या सहकार्याने ती पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षी किमान बंधाऱ्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यापैकी विक्रमगड तालुक्यातील करसूड गावाच्या भोईर पाडा येथे असलेला निकामी बंधारा आणि तसेच घाणेघर येथे एक संपूर्ण नवीन बंधारा बांधण्यात येईल. तसेच ज्या आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या आहेत तिथे हॅन्ड पंप सहित बोअर वेल करून देण्यात येणार आहेत.

आपल्या प्रयत्नांचा फायदा घेऊन पाण्याची मूलभूत गरज भागल्यामुळे आजपर्यंत त्यापासून वंचित राहिलेल्या लोकांचे समाधानी चेहरे पाहणे हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे.

लोकांची गरज, त्यानुसार कामाची आखणी, कामाच्या आधी गावातल्या लोकांची मानसिकता बनवणे, कामाला लागणारे आर्थिक पाठबळ, आखणीनुसार काम पूर्ण करणे, त्यात लागणारी तांत्रिक मदत, लोकसहभाग, अशी एक पूर्ण साखळी असते. या साखळीतील एक छोटा हिस्सा जरी आम्हाला बनता आले तरी आनंद आहे.

तुमच्या पैकी जर कोणी या साखळीचा दुवा बनून या कार्यात आम्हाला हातभार लावू शकत असतील तर सोन्याहून पिवळं. कुठल्याही सामाजिक कार्याला आर्थिक पाठबळ हे लागतेच परंतु या कामांसाठी लागणाऱ्या पैशाची मला काळजी नाही; मला खात्री आहे की स्वामी कृपेने ते उभे राहतील. त्यामुळे तुमची मदत ही पैशाचीच असायला हवी असे अजिबात नाही. कोणी तांत्रिक सल्लागार होऊ शकत असतील, कोणी ही कामे पूर्ण करण्यात मदत करू शकत असतील, कोणी स्वतःचा वेळ देऊ शकत असतील, अशा सर्व लोकांचे मनापासून स्वागत.

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ.

धन्यवाद.

यशवंत मराठे +91 98200 44630

सुधीर दांडेकर +91 98223 77368

neerajaysm@gmail.com

yeshwant.marathe@gmail.com