मी काही संगीतज्ञ नव्हे की शास्त्रीय गायकही नव्हे; त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडेल की भीमसेन जोशींबद्दल मी काय लिहिणार? तसेच त्यांच्याबद्दल इतक्या ठिकाणी आणि इतके वैविध्यपुर्ण लिखाण झाले आहे की त्या महासागरात काही नवीन लिहिण्याची माझी क्षमताच नाही. एक रसिक म्हणून मी माझा वैयक्तिक अनुभव ह्या मनोगताद्वारे शेअर करणार आहे त्यामुळे ते सगळ्यांना आवडेलच असे नाही कारण not everyone will be able to identify with the same. असो.

मला लहानपणापासून संगीताची आवड असली तरी ती हिंदी/मराठी चित्रपट संगीत आणि मराठी भावगीत ह्या पुरतीच मर्यादित होती. शास्त्रीय संगीतापासून मी खरंच जाणीवपूर्वक लांब होतो. हे गायक तासनतास काय गातात ते कळायचे ही नाही आणि समजायचे देखील नाही. १९६६ साली आमच्या मराठे उद्योग भवनच्या उदघाटनाला भीमसेनजींचे गाणे गच्चीत झाले होते असे ऐकून होतो आणि फोटो सुद्धा बघितले होते. ती मैफल आठवणे शक्यच नव्हते कारण मी फक्त ५-६ वर्षांचा होतो. त्यावेळची माझ्या वडिलांकडून ऐकलेली हकीकत म्हणजे भीमसेन मैफिलीच्या आधीही दारू प्यायले आणि मध्यंतरात देखील दारू प्यायले. मध्यंतरानंतर त्यांना दोन जणांनी धरून आणून बसवले. असे असून देखील त्या दिवशीची मैफल त्यांनी गाजवली होती म्हणे. दैवी देणगी; दुसरं काय!! मला अजूनही त्या मैफिलीची आठवण सांगणारे लोकं आहेत.

आमच्या स्विफ्ट कंपनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १९८१ साली काहीतरी कार्यक्रम करावा अशी माझ्या बाबांची इच्छा होती. त्यावेळी माझे काका, पं. वसंत गाडगीळ, यांनी असा आग्रहच धरला की परत एकदा भीमसेनजींचेच गाणे व्हायला हवे. तशी बाबांना शास्त्रीय संगीताची फार आवड नव्हती परंतु त्यांनी वसंतकाकांना हो म्हटले. पुन्हा एकदा उद्योग भवनच्या गच्चीत कार्यक्रम ठरला. आधीच्या अनुभवामुळे बाबांनी जय्यत तयारी ठेवली होती.

कार्यक्रम रात्री ९ चा ठरला होता. भीमसेन त्यांच्या पत्नीसोबत बरोबर ८.४५ ला उद्योग भवनमध्ये पोहोचले.

आमच्यावर तर दडपणच आले. मी त्या वेळी २१ वर्षाचा होतो आणि तसा मनाविरुद्ध पण आपणच ठरवलेला कार्यक्रम असल्यामुळे नाईलाजाने हजर राहणे क्रमप्राप्त होते. भीमसेन माझ्या बाबांच्या केबिनमध्ये स्थानापन्न झाल्यावर बाबांनी तुम्ही काही घेणार का असे विचारले पण ते म्हणाले नको. भीमसेनजींचा कार्यक्रम असल्यामुळे खूप गर्दी झाली पण त्यांची कीर्ती सर्वदूर असल्याने लोकं थोडे आरामात येत होते आणि अखेरीस ९.३० ला कार्यक्रमाला सुरुवात झाली. मी लोकांचे स्वागत करण्याच्या नावाखाली तसा मागेमागेच होतो पण शेवटी १० वाजता एका जागी बसलो. साधारण १५-२० मिनिटांनी त्यांचा शुद्ध कल्याण राग ऐकता ऐकता काय झाले समजले नाही पण अचानक उत्पात व्हावा त्याप्रमाणे अंगातून एक वीज चमकून गेली. संगीताचा स्वर्गीय आनंद काय असतो तो त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवला आणि भारावून गेलो. मध्यंतरात बाबांनी त्यांना परत एकदा विचारलं तर म्हणाले, आज नको. प्रेक्षकात जी एन जोशींसारखा संगीतज्ञ, हार्मोनियम वादक गोविंदराव पटवर्धन अशी दिग्गज मंडळी होती. मध्यंतरानंतर भीमसेन यांच्या साथीला गोविंदराव स्वतः बसले आणि मैफल दृष्ट लागावी इतकी मस्त झाली.

कार्यक्रम झाल्यानंतर बाबांनी परत विचारणा केली असता, भीमसेन हसत हसत म्हणाले, अहो मराठे, मी सोडलीय, का सारखी सारखी आठवण करून त्रास देताय? बाबा म्हणाले, अहो तुम्ही जेवला पण नाहीत तर ते म्हणाले, तुमची बायको मला आता पिठलं भाकरी खायला घालणार असेल तर चला तुमच्या घरी. रात्री १.३० वाजता स्वारी पिठलं भाकरी खाऊन पुण्याला जायला निघाली आणि गाडी चालवणार ते स्वतः त्यामुळे बाबांनी खूप आग्रह केला की इथेच रहा पण ते म्हणाले, अहो अशा अपरात्री प्रवास करायची माझी नेहमीची सवय आहे, तेव्हा मी नीट जाईन; तुम्ही नका काळजी करू.

त्या दिवसानंतर मी संमोहित झाल्यासारखा भीमसेनजींच्या जमतील तेवढ्या मैफिली ऐकल्या. सलग ४ वर्षे सवाई गंधर्व, बी जे मेडिकल कॉलेज फेस्टिवल, सेंट झेविअर्स कॉलेज फेस्टिवल, रंग भवन आणि खाजगी मैफिली तर अगणित. मी अक्षरशः झपाटून गेलो होतो. बरं ते काय गातात तो राग कोणता हे तेव्हांही कळायचे नाही आणि अजूनही कळत नाही. पण संगीताचा अभूतपूर्व आनंद लुटला ह्यात शंकाच नाही. त्या ४-५ वर्षांची आठवण झाली तरी आज देखील अंगावर काटा उभा रहातो.

भीमसेनजींची दारू सुटायला बऱ्याच अंशी त्यांच्या संतवाणी, अभंगवाणी ह्या कार्यक्रमांचा फार मोठा हात होता. जसजसे ते विठ्ठलनामात तल्लीन होऊ लागले तशी त्यांची आसक्ती बहुदा कमी झाली असावी. मी अशी एक गोष्ट ऐकली आहे की ज्या दिवशी त्यांनी दारू सोडायचे ठरवलं त्या दिवशी रात्री ते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेले आणि पुजाऱ्यांना सांगितलं की मी आता गाभाऱ्यातच बसणार आहे; तुमची वेळ झाली की तुम्ही देऊळ बंद करून जा. कारण मी बाहेर पडलो तर परत व्यसनाला बळी पडेन. भीमसेनजी पुढील ५-६ तास गाभाऱ्यात देहभान विसरून गात बसले, ते पुजारी काकड आरतीसाठी परत देऊळ उघडेपर्यंत. ही घटना / गोष्ट खरी आहे की नाही हे नक्की माहित नाही पण जर तथ्य असेल तर असं वाटतं की आपण तिथे असायला हवं होतं. तसे संगीत परत ऐकायला कधीच मिळणार नाही.

१९८५ साली मी आमच्या कौटुंबिक व्यवसायात उडी मारली आणि मग मात्र ही आवड थोडी मागे पडू लागली. सांगून पटणार नाही पण १९८६ साली माझ्या लग्नसोहळ्यात भीमसेनजींची गायची मनापासूनची इच्छा होती आणि त्यांनी ती बोलून पण दाखवली. परंतु लग्नाचा खर्च आणि त्यांचे मानधन हे एकत्र बाबांना परवडण्यासारखे नव्हते. तसेच माझ्या सासरच्या लोकांना आवडेल की नाही याची देखील शंका होती म्हणून मग जड मनाने बाबांनी त्यांना नाही म्हटले.

मला दुसरी गोष्ट आठवते आहे ती म्हणजे १५ ऑगस्ट १९८८ रोजी दूरदर्शनने “मिले सूर मेरा तुम्हारा” हे गाणे स्वातंत्र्यदिनानिमित्त दाखवले. त्यावेळी माझ्या नंतरच्या पिढीतील (हल्ली दर दहा वर्षात पिढी बदलते) अनेक जणांनी विचारणा केली हे सुरवातीला गातात ते कोण? काय सुंदर आवाज आहे? आता विचार केला तरी हसायला येतं.

मला भले, ओंकारनाथ ठाकूर, बडे गुलाम अली खान, अब्दुल करीम खान, आमिर खान किंवा डी व्ही पलुस्कर यांच्या मैफिली ऐकण्याचे सुदैव नाही मिळाले पण कुमार गंधर्व, पं. जसराज, वसंतराव देशपांडे, मल्लिकार्जुन मन्सूर, फिरोज दस्तूर, जितेंद्र अभिषेकी तर मनसोक्त ऐकले. आणि हो, उद्या मरताना मी अभिमानाने म्हणू शकतो की मी या पृथ्वीतलावरील गंधर्व, भीमसेन जोशी यांच्या संगीताचा मनमुराद आस्वाद घेतला आणि माझे जीवन सार्थक झाले.

भारतरत्न भीमसेन जोशी उर्फ अण्णा यांना साष्टांग दंडवत.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Classical_Music #Bhimsen_Joshi #संतवाणी #अभंगवाणी #पंढरपूर #विठ्ठल