भक्ती संगीत – मोहम्मद रफी

हरि ओम…. हरि ओम….

मन तरपत हरी दर्शन को आज,

मोरे तुम बिन बिगरे सगरे काज,

बिनती करत हूँ रखियों लाज…

माझ्या मते हे आजपर्यंत ध्वनिमुद्रित केले गेलेले हिंदी चित्रपटातील सर्वोत्तम भजन आहे.

ह्या उत्कृष्ट भक्तीगीतातील मोहम्मद रफीचा अजरामर, अद्वितीय स्वर, हा परमेश्वराप्रती, ओढ, प्रेमभावना आणि उत्कट भक्तीने ओथंबलेला होता. ह्या गीताचे बोल शकील बदायुनी यांचे होते आणि संगीत नौशाद अली यांनी दिले होते.

महम्मद रफी, शकील बदायुनी आणि नौशाद अली या मुस्लिम त्रयीने एकत्र येऊन सादर केलेले हे अनमोल रत्न. हे भजन कदाचित अशी वस्तुस्थिती दर्शविते की त्यावेळी रसिक फक्त भारतीय संस्कृती मानत होते, हिंदु का मुस्लिम ह्याच्याशी त्यांना देणघेणं नव्हते. मी स्वतः कधीही ते कोणत्या धर्माचे आहेत ह्याचा विचार केला नाही आणि फक्त त्यांच्या कलेचा/ गाण्याचा आस्वाद घेतला.

मी कुठेतरी वाचले आहे की दिलीप कुमारने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत फक्त एकदा मुसलमान व्यक्तिरेखा साकारली आणि तो चित्रपट होता – मुगले आजम, अन्यथा, त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये त्याने हिंदू व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

रफीच्या भक्तीगीतांतील अजुन एक अनमोल रत्न, “दुनिया न भाये, मोहे अब तू बुला ले तेरे चरणों में” हे ‘वसंत बहार’ चित्रपटातील आहे. योगायोगाने, ‘बैजु बावरा’ आणि ‘वसंत बहार’ ह्या दोन्ही चित्रपटात भारत भूषणने एका धड़पडणाऱ्या / संघर्ष करणार्‍या पण देवावर श्रद्धा असणार्‍या संगीतकाराची भूमिका साकारली आहे, आणि रफीच्या स्वरात व्यक्त झालेला भक्तिभाव केवळ अद्वितीय.

नया दौर’ ह्या सामाजिक नाट्यपटातील, “आना है तू आ, राह में कुछ फेर नहीं है, भगवान के घर देर है अँधेर नही है” हे गीत भक्ताला देवाच्या दारी जाण्यापासून कोणीही थोपवू शकत नाही हे दर्शविते. अंत:करणाचा वेध घेणारे हे भक्तीगीत, दिलीप कुमार, वैजयंतीमाला, अजित इत्यादि तारे तारकांची मांदियाळी असून सुद्धा देवळातील एका नवख्या कलाकारावर, चित्रित झाले आहे.

सुख के सब साथी, दुःख में ना कोई“, हे ‘गोपी’ चित्रपटातील दिलीप कुमारवर सुंदररित्या चित्रित झालेले गीत, सुखात साथ देणारे सगळेच असतात मात्र दु:खात कोणी बरोबर नसते, हे जीवनातील सत्य विशद करते.

तुलसीदास’ चित्रपटातील “मुझे अपनी शरण में ले लो राम” हे अत्यंत भावपूर्ण, आत्मस्पर्शी भजन ऐकताना श्रोता परमेश्वरचरणी लीन होऊन जातो.

नया रास्ता‘ चित्रपटातील, “ईश्वर अल्लाह तेरे नाम, सारा जग तेरी संतान” या गीतात ईश्वराची नावे जरी अनेक असली तरी, संपूर्ण जगाचा निर्माता एकच असून तोच आपल्या सर्वांना कृपाशीर्वाद देऊ शकतो सांगितले आहे.

गंगा तेरा पानी अमृत’ ह्या चित्रपटाचे शीर्षकगीत, गंगा आणि तिच्या पवित्र जलाचे भारतीय इतिहास, धर्म, श्रद्धा आणि लोकजीवनातील माहात्म्य वर्णन करते.

भजन तसेच भक्तीगीतांचे भारतीय समाजातील स्थान अनन्यसाधारण आहे. देवाची स्तुती करताना गायली जाणारी ती साधी सरळ गाणी आहेत. बहुतेक भजने १४ ते १७ व्या शतका दरम्यान लिहिली गेली. मोगल काळात, सारा हिंदुस्थान ढवळून काढणार्‍या व भक्ती चळवळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंदू पुनरुत्थान चळवळीचा ‘भजन’ हा एक महत्त्वाचा भाग होता. भजनांमध्ये, ‘राग’ तसेच वीणा, सारंगी, मृदंग, ढोल किंवा तबल्यावर धरलेला ‘ताल’ यावर आधारित भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर केला जातो. फिल्मी भजने ही हिंदी चित्रपटातील माधुर्यपुर्ण भक्तीगीते आहेत. मुळात, भजनांचा संबंध हिंदू धर्माशी आहे, मात्र बरीच भक्तीगीते ही सर्वांसाठीची आहेत असे समजून इतर धर्म आणि पंथाच्या अनुयायांकडूनही ती स्वीकारली जातात.

हिंदी सिनेमात भक्तीगीते खूप महत्वाची भूमिका निभावतात. हिंदी चित्रपट संगीतात अनेक भक्तीगीते रफीच्या अलौकिक आवाजात गायली गेली आहेत आणि त्याच्या आवाजाने चित्रपटातील भक्तीगीतांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्याचे संस्कृत शब्दांचे उच्चार हे इतर गायकांपेक्षा चांगले होते. त्याची सगळी भजने इतरांपेक्षा सरस होती. प्रत्येक शब्दात भावना ओतून, आवाजातील चढ उतार आणि स्वरांचे नियमन करून केलेली ही गाणी संस्मरणीय बनविली.

फार थोड्या इतर गायकांची काही भक्तीगीते रफीच्या गाण्यांशी बरोबरी करू शकतात. लता मंगेशकर हा एक ठळक अपवाद.

कै. खय्याम यांच्या म्हणण्यानुसार, “रफीला भजन गाण्याची खूप इच्छा/आवड होती; खरं तर, रफीनेच त्यांना भजनासाठी सूर दिले आणि त्या सुरावटींवर स्वरसाज चढवण्यास सांगितले.”

रफी खर्‍या आयुष्यात साईबाबांचे परमभक्त होता.

रफीच्या आवाजातील काही अनमोल आणि अजरामर भक्तीगीते:-

सन – चित्रपट – गीत – संगीत – कवी

१. १९५२ – बैजू बावरा – मन तरपत हरी दर्शन – नौशाद – शकील बदायुनी

२. १९५२ – बैजू बावरा – ओ दुनिया के रखवाले – नौशाद – शकील बदायुनी

३. १९५४ – तुलसीदास – मुझे अपनी शरण में ले लो राम – चित्रगुप्त – जी एस नेपाली

४. १९५४ – अमर – इन्साफ का मंदिर है – नौशाद – शकील बदायुनी

५. १९५६ – ताज – मेरी बिनती सुनो भगवान – हेमंत कुमार – राजिंदर कृष्ण

६. १९५६ – बसंत बहार – दुनिया ना भाये – शंकर जयकिशन – शैलेंद्र

७. १९५६ – बसंत बहार – बडी देर भई कब लोगे – शंकर जयकिशन – शैलेंद्र

८. १९५७ – नया दौर – आना हैं तो आ – ओ पी नय्यर – साहिर लुधियानवी

९. १९५७ – मिस मेरी – बृन्दावन का कृष्ण कन्हैय्या – हेमंत कुमार – राजिंदर कृष्ण

१०. १९६१ – घराना – जय रघुनंदन – रवी – शकील बदायुनी

११. १९६५ – खानदान – बडी देर भई नंदलाला – रवी – राजिंदर कृष्ण

१२. १९७० – नया रास्ता – ईश्वर अल्ला तेरे नाम – एन दत्ता – साहिर लुधियानवी

१३. १९७० – गोपी – सुख के सब साथी – कल्याणजी आनंदजी – राजिंदर कृष्ण

१४. १९७१ – गंगा तेरा पानी अमृत – गंगा तेरा पानी अमृत – रवी – साहिर लुधियानवी

१५. १९७९ – सरगम – रामजी की निकली सवारी – लक्ष्मीकांत प्यारेलाल – आनंद बक्षी

संगीत हे कानांना स्वर्गीय आनंद देते. आणि त्यातून ते जर रफी याच्या मधुर स्वरातील भक्तीगीत असेल तर तो खरोखरच दैवी अनुभव असतो. परमेश्वराप्रती उत्कट प्रेमभावना व्यक्त करणार्‍या भजने किंवा भक्तीगीतांपेक्षा इतर कोणतीही गोष्ट भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली नाही.

वर संदर्भित केलेल्या भक्तिगीतांमध्ये, रफीने आपल्या गायनातून स्वत;ला संपूर्ण समर्पित केले आहे आणि म्हणूनच ही गाणी अजरामर आहेत.

पण मला खरोखर आनंद आहे की रफीला आजच्या विद्वेषाची दुही माजलेल्या जगात ही गाणी गावी लागली नाहीत. नाहीतर कदाचित हिंदू भजने गायल्याबद्दल मुस्लिमांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला असता, किंवा हिंदूंनी त्यांच्या धर्मात ढवळाढवळ केल्याबद्दल त्याचा कदाचित तिरस्कार / द्वेष केला असता. आपण भाग्यवान आहोत की पन्नास ते सत्तरच्या सुवर्णकाळात रफीने ही सर्व भजने गायली.

तर, असा दुसरा रफी पुन्हा होणे नाही कारण त्याच्यासारखी माणसे सहस्त्राब्दात एकदाच जन्माला येतात आणि ती दैवी देणगी असते. देवी सरस्वतीने त्याला काही खास वरदान दिले असेल. कै. नौशादने बर्‍याच वेळा उल्लेख केला होता की रफीच्या चेहर्‍यावर नेहमीच एक मधुर स्मितहास्य विलसत असे. सर्वसामान्य माणसांसाठी ती पातळी गाठणे शक्य नाही.

आपण भाग्यवान आहोत की आपण त्याची गाणी ऐकता ऐकता मोठे झालो आणि त्याच्या स्वर्गवासानंतर एकोणचाळीस वर्षांनंतरही आपण त्याच्या भजनांचा आस्वाद घेत आहोत.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Bhakti #Rafi #Bhajan #Devotional #Hindi_Films #भजन #भक्ती #हिंदी_चित्रपट #रफी #संगीत

4 Comments

  1. फारच सुंदर व वाचनीय परीक्षण. काही वर्षांपूर्वी संगीतकार नौशाद ह्यांनी सांगितलेली त्यांच्याच मन तडपत प्रभू दर्शन को आज ह्या सुंदर गीताची जन्मकथा आठवली. ते गाणे रेकॉर्ड करण्या आधी गायक वादक सर्वांना शुचिर्भूत होऊन येण्यास सांगितले गेले कारण ईश्वराची आराधना करणारे गीत गायचे होते.

    Like

  2. लेख आवडला. अनेक जुन्या गीतांच्या स्मृती जाग्या झाल्या. समकालिनांत व नंतर रफीच्या तोडीचा दुसरा गायक झाला नाही. “वृंदावन का क्रिशन कन्हैया” ह्या रफी-लताच्या गाण्यासारखे दुसरे अवीट गोडीचे भजन नसावे. भक्तिरस जणू मधात घोळवून कोणीतरी कानात हळुवार ओतत असल्याचा भास होतो.
    धन्यवाद.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.