जाती / वर्ण व्यवस्था

आज जात असा नुसता शब्द उच्चारला तरी लोकं हिरीरीने मते मांडू लागतात. चातुर्वर्ण्य व्यवस्था हा हिंदू धर्मात सुधारणा होण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे असा सर्वसाधारण सूर असतो आणि तो काही अंशी बरोबरही असेल.

जाती व्यवस्था चांगली किंवा वाईट याच्या वादात शिरण्याआधी ती उपयुक्त असल्याशिवाय इतकी हजारो वर्षे टिकणार नाही हे आपल्याला मान्य करावे लागेल. आमच्या मते जाती व्यवस्थेतील सर्वात आक्षेपार्ह भाग कोणता असेल तर तो म्हणजे माणसानेच निर्माण केलेला उच्च-नीचतेचा भाव. दुर्दैवाने तो पूर्णपणे घालवता येणार नाही कारण माणूस स्वभावतःच आत्माभिमानी असतो परंतु तो भाव माणुसकीला काळिमा फासेल एवढा नसावा याची समाजाने खबरदारी घेतली तर जाती व्यवस्था एकेकाळी व थोड्याफार प्रमाणात आजसुद्धा उपयोगी आहे.

जाती व्यवस्थेमागील तसेच स्पृश्य अस्पृश्य प्रथेमागील मानसिकता काय असावी आणि ऐतिहासिक परिस्थितीचा काय परिणाम झाला असेल या अंगाने आम्ही चिंतन केले आहे. त्याचे प्रगटीकरण म्हणजे हा लेख आहे. आमच्या निरीक्षणाची त्याला जोड दिली आहे. आमच्या प्रतिपादनात्त त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या प्रतिपादनाला भौगोलिक सीमांच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या मर्यादा आहेत. पूर्ण भारतातील जातींचा मागोवा घेणे हे सर्वस्वी अशक्य आहे कारण नाहीतर या लेखाच्या ऐवजी एक मोठा प्रबंधच होईल.

जाती व्यवस्था ही भारतीय समाज व्यवस्थेचे अविभाज्य असे अंग आहे. जाती व्यवस्थेशिवाय भारतीय समाजाचा विचार होऊच शकत नाही. आपल्याला असे वाटते की, स्वातंत्र्योत्तर काळात जाती व्यवस्थेवरती जेवढी टीका होते आहे तेवढी कधी झालीच नाही परंतु तसे काही नाही. अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध धर्म जो फोफावला त्यातील महत्वाचे एक कारण बौद्ध धर्माने नाकारलेली जाती व्यवस्था हे आहे. त्या काळी वैदिक धर्मातील यज्ञ संस्थेमुळे हिंसाचार (पशुहत्येसंबंधी) आणि ब्राह्मणांचे महत्व अवाजवी प्रमाणात वाढले होते. क्षत्रिय राजांचा त्याला पाठींबा होता किंबहुना यज्ञ करण्यात त्यांचाच सिंहाचा वाटा होता कारण यज्ञ करण्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडेच होता. एका दृष्टीने ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांना यज्ञ संस्था फायदेशीर होती. असे का घडले याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करूया. श्री. मधुकर केशव ढवळीकर यांनी त्यांच्या हडप्पा आणि मोहेंजोदाडो वरील पुस्तकात एक पर्यावर्णीय संदर्भ दिला आहे. ते असं म्हणतात की इ.स.पू. २००० ते इ.स.पू. १००० या काळात भारतातील पर्जन्यमान कमी होऊ लागले. नद्या आटू लागल्या किंवा भूगर्भीय हालचालींमुळे नद्यांची पात्रे पूर्वेकडे सरकली आणि त्यामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली. त्यानंतर इ.स.पू. ५०० ते इ.स. ५०० या काळात परत भरपूर पाऊस पडू लागला त्यामुळे भारतवर्षात समृद्धी आली; व्यापार वाढला. या त्यांच्या अनुमानाला त्यांनी भरपूर पुरावे दिले आहेत. यावरून असे म्हणता येईल की, जेव्हा समाजात समृद्धी आणि स्वास्थ्य येते, त्याच वेळी समाजात वाईट गोष्टींचा शिरकाव होतो किंवा माणसांची बुद्धी भ्रष्ट होते. श्रीमदभगवतगीतेमध्ये यज्ञाचे जे मूळ स्वरूप सांगितले आहे त्याचे ह्या समृद्धी आणि स्वास्थ्य यांनी विकृतीकरण झाले. जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो त्यावेळी प्रतिक्रिया उमटतेच हा निसर्ग नियम आहे. बौद्ध धर्म हा जाती व्यवस्थेच्या अतिरेकाची प्रतिक्रिया आहे. बौद्ध धर्माने वेद नाकारण्याचे ते महत्वाचे कारण आहे. या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर असे दिसून येईल की, याच काळात मोठी साम्राज्ये उभी राहीली. चंद्रगुप्त मौर्यने विशाल साम्राज्य याच काळात उभे केले. ह्यानंतर म्हणजे इ.स. ३०० च्या सुमारास गुप्त साम्राज्य निर्माण झाले. बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास केला तर बौद्ध धर्माच्या अत्युच्य काळात श्रेष्ठी म्हणजे व्यापारी यांचे महत्व वाढलेले दिसते. यज्ञाऐवजी दानाला महत्व प्राप्त झालेले दिसते. तसेच ब्राह्मणांचे महत्व कमी झालेले दिसते. अनेक ब्राह्मण बौद्ध भिक्षुक तर झालेच आणि त्यांनी बौद्ध तत्वज्ञानाला मूर्तस्वरूप दिले.

जाती व्यवस्थेचे मूळ वैदिक किंवा हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्थेत आहे असे समजले जाते आणि ते बरोबरही आहे. श्रीमदभगवतगीतेमध्ये वर्ण व्यवस्था ही जन्मावर आधारित नसून ती गुणकर्मशः वर आधारित आहे असे सांगितले पण ही लक्षात न घेणाऱ्यात हिंदू धर्माचे जाज्वल्य अभिमानी जसे आहेत तसेच भारतीय समाजात जातीय विष हिंदू धर्माने निर्माण केले असे म्हणणारे जाज्वल्य टीकाकारही आहेत. वर्ण हे गुणकर्मशः होते ह्याच्या पुष्ट्यर्थ दोन तीन मजेदार उदाहरणे:-

१. ब्राह्मणांना सर्वात प्रिय आणि पवित्र वाटणारा जो गायत्री मंत्र तो विश्वामित्र ऋषींनी निर्माण केला जे जन्माने क्षत्रिय होते आणि जे तपश्चर्या करून ऋषी पदावर गेले.

२. महाभारतकार आणि सर्व वेदांचे वर्गीकरण करणारे महर्षी व्यास यांचे वडील पराशर ऋषी आणि आई कोळी राजाची मुलगी मत्स्यगंधा.

३. रामायणकर्ते वाल्मिकी हे कोळी होते.

या उदाहरणांवरून असे दिसून येईल की त्यावेळचा समाज हा माणसाच्या फक्त गुणाला महत्व देत होता; जातीला महत्व देत नव्हता.

या वरील विधानाला आक्षेप घेणारे बुद्धिनिष्ठ हे द्रोणाचार्य आणि एकलव्य यांचे उदाहरण पुढे करतील. यावरती आमचे म्हणणे असे आहे की, महाभारतातील द्रोणाचार्य हे विकारांच्या आधीन होणारे व्यक्तिमत्व आहे. मुळात द्रोणाचार्यांनी ब्राह्मण असून देखील गरिबीला कंटाळून कुरुकुलाची नोकरी पत्करली. ब्राह्मणाचा जो महत्वाचा गुण, क्षमा, त्याला तिलांजली देऊन द्रुपदराजावर सूड उगविला. तसेच ब्रह्मास्त्र कोणाला शिकवावे ह्याचे काही नियम होते आणि त्यातील एक नियम म्हणजे ब्रह्मास्त्र जाणणारी व्यक्ती ही विवेकी व विकारांपासून अलिप्त असायला हवी कारण ब्रह्मास्त्र म्हणजे अणूबाॅम्बच. असे असताना देखील त्यांनी हे अस्त्र पुत्रप्रेमाने आंधळे होऊन कोपिष्ट अश्वत्थाम्याला शिकविले. त्याने पुढे अनर्थ झाला. त्यांनी क्षत्रियधर्म स्वीकारल्यामुळे त्यांचा वध करणाऱ्या द्रुष्टद्युन्माला ब्रह्महत्येचे पाप लागले नाही. त्यामुळे द्रोणाचार्य आणि एकलव्य हा अपवाद आहे; तो नियम नव्हे.

सर्वसाधारणपणे जाती असा शब्द वापरला की असा समज असतो की त्या फक्त हिंदू धर्मातच आहेत. या कल्पनेला छेद देणारी ही काही उदाहरणे:-

एकदा वसई येथील लोपेझ नावाचा एक ख्रिश्चन गृहस्थ भेटला. बोलताना वसईत कुठे रहातो याची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, आम्ही सामवेदी ब्राह्मण, आमची एक स्वतंत्र गल्ली (आळी) आहे. ह्या गल्लीतील एका बाजूचे लोकं हिंदू सामवेदी ब्राह्मण आणि दुसऱ्या बाजूचे लोकं ख्रिश्चन आहेत पण आम्ही मूळचे सामवेदी ब्राह्मणच; आम्ही ख्रिश्चन सामवेदी मध्येच लग्न करतो. आमचे डोके चक्रावूनच गेले. जात नाही ती “जात” ह्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. तशीच एकदा एक मुस्लिम बाई भेटली. ती म्हणाली मी राजपूत आहे परंतु माझा नवरा खालच्या जातीतील आहे. एकदा आम्हाला हैद्राबाद मध्ये एका मुस्लिम कुटुंबात रहाण्याचा योग आला. या कुटुंबातील बाई पठाण होती आणि नवरा युपी मधील मुसलमान होता. बोलण्याच्या ओघात ती बाई म्हणाली, हम पठाण जबान के पक्के होते है. पठाण और मरगठ्ठे इनकी दोस्ती बहुत पुरानी और पक्की है. हम पठाण ये युपी के मुसलमानों की तरह हवा का रुख देखकर पलटते नही. पठाण आणि मराठे यांची दोस्ती पक्की होती असे ती म्हणाली याचे कारण तिला माहिती होती की, पानिपतावर भाऊसाहेब पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान पठाण (गारदी) शेवटपर्यंत मराठ्यांच्या बाजूने लढला. असो. एकूण काय प्रत्येक भारतीय माणूस जातीत वाटलेला आहे आणि प्रत्येकाला आपल्या जातीचा नको इतका अभिमान आहे. धर्म बदलला तरी “जात” जात नाही.

जाती व्यवस्था कशी निर्माण झाली असावी ?

जेव्हा शेतीवरती आधारित समाजरचना आकारास येऊ लागली त्यावेळेस गावे निर्माण होऊ लागली. माणूस समूह करून एकाच ठिकाणी वस्ती करून राहू लागला. त्यातून समाजाच्या सामूहिक गरजा दृष्टिपथास येऊ लागल्या आणि व्यवसाय निर्मिती झाली. ज्याला जो व्यवसाय आवडेल, ज्याच्यापाशी त्या व्यवसायाला लागणारे कसब (कौशल्य) असेल, शारीरिक क्षमता असेल तसा व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला होते. त्यातूनच १२ बलुतेदार म्हणजे १. सुतार २. लोहार ३. महार ४. मांग ५. कुंभार ६. चांभार ७. परीट ८. न्हावी ९. भाट १०. तेली ११. गुरव १२. कोळी यांची निर्मिती झाली. ही यादी स्थलपरत्वे थोडीशी बदलते परंतु १२ बलुतेदार ही प्रत्येक गावाची गरज होती. याशिवाय १८ व्यवसाय असे होते की दोन ते तीन गावे मिळून त्या व्यावसायिकांना कामे मिळत होती ज्यांना अलुतेदार असे संबोधण्यात यायचे. ते १८ अलुतेदार पुढीलप्रमाणे १. तांबोळी (विड्याची पाने विकणारा) २. कोष्टी/साळी (विणकर) ३. माळी ४. घडशी (भांडी घडवणारा) ५. तराळ (ओझी वाहणारा) ६. सोनार ७. शिंपी ८. गोंधळी (देवीचा गोंधळ घालणारे) ९. रामोशी (पहारेकरी) १०. खाटीक ११. डवरी (डौरी) १२. कळवंट/कलावंत १३. सणगर १४. ठाकर १५. गोसावी १६. जंगम १७. वाजंत्री १८. भोई

वरील सर्व व्यवसायांचे जातीत रूपांतर झाले. आजसुद्धा ज्या जातींची नावे आपण ऐकतो (पोटजाती सोडून) त्या मुळात व्यवसायाशी संबंधित अशाच आहेत. व्यवसायातून जाती कशा निर्माण होतात याची काही मजेदार उदाहरणे:-

१. महाराष्ट्रात नंदीबैलवाले अशी एक जात आहे. हे लोक नंदीबैल घेऊन गावोगावी जातात. त्या शिकवलेल्या नंदीबैलाचे खेळ करून लोकांचे मनोरंजन करून पैसे मिळवतात. परंतु ही जात मुळात कशी निर्माण झाली त्यामागे एक प्रथा आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय, बैल असे पशुधन असायचेच. त्यावेळी एक अत्यंत उपयुक्त व शास्त्राला धरून अशी एक प्रथा निर्माण झाली की, गावातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या गाईचा बैल, सांड किंवा वळू सर्व गावाने पाळायचा. त्या बैलाची देखभाल सर्व गावाने एकत्रितपणे करावयाची. त्या बैलाला नंदीबैल म्हणत असत. त्याचा उपयोग पुढील प्रजोत्पादनासाठी करावयाचा ज्यामुळे पुढील पिढीतील गाईंचे दूध उत्पादन वाढेल. आजसुद्धा Artificial Insemination द्वारे हीच पद्धत वापरली जाते. परंतु आपल्या गावातील नंदीबैल आपल्याच गावातील गाईंच्या प्रजोत्पादनासाठी वापरायचा नाही कारण त्यामुळे एकाच वंशाची प्रजा निर्माण होऊन त्यात विकृती निर्माण होऊ शकते. आपल्या पूर्वजांच्या निरीक्षण शक्तीला दाद दिली पाहिजे. यावर उपाय म्हणून दुसऱ्या गावातील नंदीबैल आणायचा व आपला नंदीबैल त्या गावाला पाठवायचा. या नंदीबैल आणणे व नेणे, त्याची देखभाल करणे ह्यातून एका व्यवसायाची आणि कालानंतराने जातीची निर्मिती झाली. कालौघात ही प्रथाच बंद पडल्यावर या जातीतील लोकांनी नंदीबैलाला केंद्रस्थानी ठेऊन व्यवसायाचे रूप बदलले. आज भटक्या विमुक्त जातीत त्यांची गणना होते.

२. लोहार जशी शेतीची अवजारे बनवत तशीच तलवारी, भाले अशी शस्त्रे सुद्धा बनवत. या शस्त्रांना उत्तम धार लावण्याचे कौशल्य काही जणांनी आत्मसात केले आणि त्यातून सलगर ही शस्त्रांना, अवजारांना धार लावणारी अजून एक भटकी जात निर्माण झाली.

३. उत्तर हिंदुस्थानात केवट नावाची एक जात आहे. त्यांचे काम काय तर लोकांना नावेतून नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोहचवणे. रामायणात देखील याचा उल्लेख आहे. श्रीराम वनवासात जाताना गंगापार करण्याची वेळ येते तेव्हा तो केवटला विनंती करतो की, तू मला पैलतीरी घेऊन जा. केवट त्याला एक अट घालतो ती अशी की, मी तुला गंगापार करून देईन पण मला ह्या संसाराचा भवसागर पार करून दे. ही जात महाराष्ट्रात नाही कारण पात्रांची प्रचंड रुंदी असणाऱ्या नद्याच महाराष्ट्रात नाहीत. गोदावरी आणि कृष्णा या नद्या महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यावर प्रचंड स्वरूप धारण करतात. असो.

पोटजाती निर्माण होण्याचे मुख्य कारण भूगोल, काही विशेष प्रसंग, काही परंपरा, स्थलांतर वगैरे. याबाबत दोन मजेशीर उदाहरणे:-

१. श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत आल्यावर तेथील ब्राह्मणांनी सांगितले की, रावण ब्राह्मण असल्यामुळे तुला ब्रह्महत्येचे पातक लागले त्यामुळे प्रायश्चित्य घ्यावे लागेल. बिचाऱ्या श्रीरामाने होकार दिला. (श्रीरामाला रावणापेक्षा अयोध्येतील लोकांनीच जास्त त्रास दिला) प्रायश्चित्याचा विधी झाल्यावर रामांनी ब्राह्मण भोजन दिले. ते घेण्यास काही कर्मठ ब्राह्मणांनी नकार दिला. परंतु ज्या ब्राह्मणांनी ते भोजन घेतले त्यांना या कर्मठ ब्राह्मणांनी म्हणजे कान्यकुब्ज ब्राह्मणांनी शरयू नदीच्या पलीकडे हाकलून दिले. त्या ब्राह्मणांची शरयूपारी ब्राह्मण ही पोटजात निर्माण झाली.

२. पहिल्या बाजीराव पेशव्याने व्यूहरचनेच्या धोरणातून उत्तर हिंदुस्थानात आपली विश्वासू आणि शूर माणसे पेरून ठेवली. उदा. शिंदे, होळकर, पवार इत्यादी. त्याचप्रमाणे त्याने गोविंदपंत खेर या कऱ्हाडे ब्राह्मण सरदाराची नेमणूक बुंदेलखंडात केली. कालांतराने त्यांचे खेर हे मूळ नाव लुप्त होऊन त्यांना लोक गोविंदपंत बुंदेले या नावाने ओळखू लागले. त्यांनी बरीच कऱ्हाडे कुटुंबे सागर वगैरे भागात नेली. माळव्याचा हा भाग सुपीक असल्याने हे श्रीमंत झाले व स्वतःला थोडे वेगळे समजू लागले. ते आज सगेरियन (सागर वरून) कऱ्हाडे ब्राह्मण म्हणून ओळखले जाऊन एक नवीन पोटजात निर्माण झाली.

जन्मावरून जात ठरण्याची प्रक्रिया कशी घडली असावी?

१. गरजा – समाजाची बांधणी होत असताना व्यावसायिक गरजा निर्माण झाल्यावर त्या गरजा पूर्ण करणारे गट तयार झाले असावेत. हे गट निर्माण होत असताना प्रत्येकाने ती निवड गुणकर्मशः केली असेल, परंतु जेव्हा व्यवसायाच्या अनुभवातून तंत्र विकसित होऊ लागली त्यावेळी मनुष्य स्वभावाप्रमाणे ती तंत्रे आपल्या घराण्यातच राहावीत असे वाटणे अगदी स्वाभाविकच होते.

२. अनुवांशिकता – अनुवांशिकतेमुळे एका पिढीकडे असणारी आवड व तंत्र दुसऱ्या पिढीकडे जाण्याची संभाव्यता खूप मोठी असते. त्यामुळे मुलाने बापाचा व्यवसाय स्वीकारण्याची शक्यता वाढते. याचा अनुभव आपण आजसुद्धा बऱ्याच क्षेत्रात घेतो.

३. व्यावसायिक संस्कार – पूर्वीच्या काळी व्यवसायाची जागा आणि घर एकमेकाला लागूनच असल्यामुळे घरातील लहान मुले त्याच व्यवसायाच्या वातावरणात वाढल्याने अनेक गोष्टी मुलांच्या अगदी सहज अंगवळणी पडलेल्या असावयाच्या त्यामुळे मुलाला बापाचा व्यवसाय स्वीकारणे सोपे जात असे.

४. विवाह संस्था – लग्नामुळे मुलगी एका घरातून दुसऱ्या घरात जात असल्यामुळे तिला एका मोठ्या स्थित्यंतराला सामोरे जावे लागते. अशा वेळी माहेर आणि सासर या दोन्ही घरातील वातावरण सारखं असल्यास विवाह टिकण्याची आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढत असल्याने सम व्यावसायिकात बेटी व्यवहार करण्याची प्रथा पडली असावी. या प्रथेमुळे आई आणि वडील दोघांकडून एकाच प्रकारचे गुण मुलांकडे संक्रमित होत असल्याने दुसरी पिढी तोच व्यवसाय करण्याची शक्यता आणखीन वाढते.

वरील सर्व मुद्यांचा तसेच २ ते ३ हजार वर्षांपूर्वीची लोकसंख्या आणि दळणवळणाची तुटपुंजी साधनं यांचा एकत्रित विचार केल्यास जन्मावरून जात पडण्याची प्रक्रिया कशी सुरु झाली असेल आणि कशी दृढ होत गेली असेल याची कल्पना येऊ शकते.

जातीतच लग्न करण्याच्या प्रथेमुळे आणि भौगोलिक कारणांमुळे आपल्याला असे दिसून येते की प्रत्येक जातीची काही स्वभाव वैशिष्ठ्ये तयार होतात.

१. तत्वाकरता भांडणे (वितंडवाद), एका पैशाचा सुद्धा फायदा दिसत नसताना एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे हे चित्पावन ब्राह्मण यांचे गुण किंवा अवगुण. परंतु त्यांच्या ह्या वैशिष्ठ्यांमुळेच इंग्रजांशी भांडणारे पुढारी, क्रांतिकारी, इतिहास-पुरातत्व सारख्या विषयात संशोधन करणाऱ्या व्यक्ती या जातीत निर्माण झाल्या. आज सुद्धा भारतात ब्राह्मण समाजाचा कल बुद्धीजीवी पेशा पत्करण्याकडे असतो. याचे कारण तो पहिल्यापासून शिक्षित होता व एवढेच नसून त्या समाजाला बौद्धिक क्रियांत जास्त आनंद मिळतो.

२. कोकणातील भंडारी समाज हा भांडकुदळ, शीघ्रकोपी, धाडसी म्हणून प्रसिद्ध आहे. भंडाऱ्यांच्या लग्नात भांडण झाले नाही तर काही मजा नाही असे समजले जाते. या समाजाचा मूळ धंदा म्हणजे ताडी / माडी काढणे आणि विकणे. भांडण हा त्या धंद्याचा अविभाज्य भाग असल्याने भांडण त्यांच्या स्वभावात उतरले. तसेच ताडी काढण्यासाठी झाडावर चढावे लागल्यामुळे शरीरात ताकद आणि रग असते त्यामुळे भांडण करण्यास जोर येतो.

३. रात्री पहारा करून गावाचे संरक्षण करणे हे रामोशाचे काम. त्यामुळे उत्तम शरीरयष्टी आणि धाडस हे रामोशांच्या स्वभावातच असते. शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा रामोशी जातीचा होता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी अनेक जातींच्या गुणवैशिष्ठ्यांचा उत्तम उपयोग करून घेतला. सर्व किल्ल्यांचा कारभार तीन व्यक्ती सांभाळत; किल्लेदार – मराठा, दारुगोळा-धान्यसाठा यांचा हिशेबनीस – सीकेपी आणि सामान्य प्रशासन – ब्राह्मण. तसेच सामान्य सैनिक म्हणून रामोशी, बेरड, महार वगैरे; नौदलात कोकणी मुसलमान, भंडारी, कोळी वगैरे आणि सेनापती / सरदार – मराठा.

एखाद्या गुण किंवा अवगुणांची मक्तेदारी एकाच जातीकडे असते असेच काही नाही पण जात हा एक संभाव्य घटक असू शकतो असे म्हणण्यास हरकत नसावी. या विधानाच्या पुष्ट्यर्थ अजून एकच उदाहरण बघुया.

एका शिल्पकाराला त्याची जात कोणती? हे विचारले कारण गणपती बनवणारे कारागीर बहुअंशी सोनार जातीचे असतात. कलाकुसर ही त्यांना मिळालेली वांशिक देणगी आहे. शिल्पकाराचे उत्तर होते पांचाळ. या जातीत लोहार, सुतार व इतर तीन जाती समाविष्ट असल्याने पुढचा प्रश्न की पांचाळांपैकी नक्की कोण? उत्तर मिळाले लोहार. मग विचारले की तुमचे पूर्वज काय करायचे? उत्तर मिळाले की चिलखते बनवत असत. यावरून कळू शकते की तो मनुष्य शिल्पकार कसा झाला. याचे कारण उत्तम चिलखत बनविण्यासाठी शरीर रचनेचे (anatomy) चांगले ज्ञान हवे आणि जे त्याला वंशपरंपरेने मिळाले होते. तो फक्त या ज्ञानाचा उपयोग चिलखताऐवजी मूर्ती घडवण्यासाठी करत होता.

असो, अशी प्रत्येक जातीची स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील. वरती उद्धृत केलेली काही वानगी दाखल दिलेली काही उदाहरणे आहेत.

स्पृश्य अस्पृश्य या विषयी चर्चा केल्याशिवाय जाती व्यवस्थेवरील लिखाण अपूर्ण आहे. परंतु स्पृश्य अस्पृश्यतेचे मूळ कशात असेल तर ते कालौघात प्रत्येक जातीला जो व्यवसाय नेमून दिलेला होता तोच त्यांनी केला पाहिजे अशी अनिष्ट प्रथा रुढ झाली त्यात आहे. परंतु या प्रथेने आपल्या समाजाचे अपरिमित नुकसान झाले. वर्णव्यवस्थेप्रमाणे शूद्र जातीचा धर्म काय तर सवर्णांची म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे. सवर्णांपैकी ब्राह्मण समाजाला त्यांच्या ज्ञान मिळविणे आणि ज्ञानदान यामुळे जरी त्यांच्याकडे पैसा व सत्ता नसूनसुद्धा मान होता. दरबारात ब्राह्मण उपस्थित झाला तर राजाने उभे राहून त्याचे स्वागत करण्याची प्रथा होती. क्षत्रिय आणि वैश्य वर्णांकडे अनुक्रमे सत्ता आणि पैसा असल्याने स्वाभाविकपणे त्यांना समाजात मान मिळत होता. शूद्र वर्णाकडे जी कामे होती ती हल्लीच्या भाषेत बोलायचे झाले तर अत्यावश्यक सेवा या स्वरूपाची होती. तेव्हा या वर्णाला त्यांची कामे न करण्याची सूट दिल्यास ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समाजाचे जगणे कठीण झाले असते त्यामुळे त्यांनी कायद्यापेक्षा धर्माची भीती घालून शूद्र वर्णावरती अन्याय केला हे मान्य करायलाच हवे.

स्वच्छता आणि शुचिर्भूतपणा हे अस्पृश्यतेमागचे मूळ कारण आहे. आज सुद्धा स्मशानातून आलेला आपल्याच कुटुंबातील माणूस आंघोळ करेपर्यंत अस्पृश्य मानला जातो. त्याने स्मशानात घालून गेलेले कपडे वेगळे धुतले जातात. त्यामुळे स्मशानात प्रेताची विल्हेवाट लावणारी डोंब जात अस्पृश्य ठरली. मेलेली जनावरे वाहून नेणारे महार, मेलेल्या जनावरांची कातडी कमावणारे ढोर, तसेच चांभार, भंगी हे सर्व अस्पृश्य ठरवण्यात आले. अस्पृश्यतेसंबंधी आणखीन एक मुद्दा लक्षात येतो तो असा की, हा समाज जी कामे करीत होता त्या कामाचा दुर्गंध हा देखील एक प्रमुख घटक होता. आजसुद्धा आपल्याला अनुभव येतो की, गाई म्हशींच्या गोठ्यात काम करणाऱ्या माणसाच्या अंगाला व कपड्यांना जनावरांच्या शेणामुताचा, कच्च्या दुधाचा वास येत असतो.

ढोर जातीतील एका साहित्यिकाने एकदा असे सांगितले होते की, कातडी कमावण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कमालीची दुर्गंधी आहे. तेव्हा अस्पृश्यता निर्माण होण्यात या दुर्गंधाच्या घटकाची संभाव्यता नाकारता येणार नाही. अस्पृश्य समाज जी कामे करत होता ती कामे कोणीतरी करणे आवश्यकच होते. त्या कामांशिवाय समाज चालणे शक्यच नव्हते.

हा सामाजिक प्रश्न जास्त प्रगल्भतेने हाताळणारे सामाजिक नेते भारतात निर्माण झाले नाहीत हे आपले दुर्दैव.

अस्पृश्य जातीतील महार आणि मांग जातीच्या काही विशिष्ट गुणांची काही माहिती:-

१. महार या जातीचा विशेष गुण म्हणजे लढाऊपणा आणि धाडसी स्वभाव. मेलेली जनावरे वाहून नेणे हे त्यांचे मूळ काम आणि म्हणून ते अस्पृश्य ठरले. परंतु महार ही जात हरकाम्या म्हणून प्रसिद्ध आहे. गावाचे रक्षण करणे, दवंडी पिटणे, गावाच्या जमीनजुमल्यांच्या हद्दींची माहिती ठेवणे, रात्री गावच्या वेसेवरील दरवाजा बंद करून सकाळी तो उघडणे हे काम ज्या महाराकडे असे त्याला वेसकर म्हणत (आता ते आडनाव झाले आहे). शिवकालात किल्ल्याच्या भोवतालची मोक्याची ठाणी सांभाळण्याचे काम महाराचे असे. यातूनच जासूसी, हेरगिरी करण्याचे काम सुद्धा त्यांच्याकडे आले असावे. मध्ययुगीन काळात हद्दीवरून वाद झाल्यास महाराच्या साक्षीला फार महत्व असे. शिवकालात एक महार गावचा पाटील झाल्याचा पुरावा मिळतो. जमिनींचे दफ्तर सांभाळणारा कुलकर्णी (ब्राह्मण) आणि त्याच्या हाताखाली जमीन मोजणी करणारा महार ज्याला काठ्या म्हणत. आजसुद्धा तलाठ्याच्या हाताखाली महार असतो आणि त्याला काठ्या असेच संबोधले जाते. पूर्वी जमिनीची मोजणी मापाच्या काठीने होत असे. अशी काठी सदैव बाळगणारा तो काठ्या. महार सरकारी कामात असल्याने कुलकर्णी, देशमुख, देशपांडे यांना जशी प्रथेप्रमाणे वतने होती तशी महारांना सुद्धा होती. वतन असणारी ती एकमेव अस्पृश जात असावी. पुढे पेशवे काळात जाती दुराभिमानाने स्पृश्य अस्पृश्यतेच्या दुर्दैवी कर्मठपणामुळे महारांना मराठा सैन्यात प्रवेश मिळेना; त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला. इंग्रजानी महार रेजिमेंट तयार करण्यामागील इंगित तेच आहे.

२. मांग लोकं घायपात या वनस्पतींची पाने कुजवून त्यापासून अत्यंत मजबूत असा वाखाचा घागा बनवून त्यातून दोऱ्या, जाड दोर बनवणे, झाडू बनवणे, गावातील मंगल कार्यात तोरणे बनवणे, वाजंत्री वाजवणे ही मांगांची जाती निहाय कामे. काळाच्या ओघात झाडू, दोऱ्या बनवणे ही कामे निघून गेली. वाजंत्री वाजविणे हेच मुख्य काम झाले त्यातूनच मनोरंजन करणे हा नवीन व्यवसाय निर्माण झाला. त्याचे आजचे दृश्य स्वरूप म्हणजे तमाशा, शाहीरी, डोंबारी. महाराष्ट्रातील आघाडीचे तमासगीर हे मांग जातीचे आहेत. शाहीर अण्णाभाऊ साठे व प्रसिद्ध तमासगीर विठाबाई मांग नारायणगावकर ही त्याची ठळक उदाहरणे.

मनुष्य हा किती विचित्र आणि स्वार्थी प्राणी आहे याचे एक उदाहरण:- भारत पाकिस्तान फाळणीच्या काळात पाकिस्तानी मुस्लिम समाजाने तिथे राहणाऱ्या हिंदू लोकांची कत्तल तरी केली किंवा अनेकांना हाकलून दिले. परंतु यातून एक हिंदू घटक वाचला आणि तो म्हणजे हिंदू भंगी समाज कारण ही मंडळी गेली तर त्यांचे काम करणार कोण?

भारतातील प्रत्येक जात हे माणसातील विशिष्ट गुण / अवगुण जोपासत असते. जातीत लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे शेकडो वर्षे टिकून राहतात. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निरनिराळी वैशिष्ठ्ये असलेल्या माणसांची जरुरी असते. जात असा पुरवठा करू शकते. जाती व्यवस्था हजारो वर्षे टिकून राहिली कारण समाजासाठी ती उपयुक्त होती. काळ बदलला आहे. अस्पृश्य समाज जी कामे करत होता ती करण्याची गरज आता तेवढी राहिलेली नाही. हा समाज, महाराष्ट्रात तरी, समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नातून (महाराष्ट्रातील समाजसुधारक ही संपूर्ण भारताने अभिमान बाळगावा आणि त्याचे अनुकरण करावे अशी गोष्ट आहे) शिकला, नोकरी, व्यवसाय करू लागला. अशा वेळी उच्च नीचतेचा भाव प्रयत्नपूर्वक टाकून द्यायला हवा. गट करणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. काळाच्या ओघात आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे जुनी जाती व्यवस्था मोडते आहे परंतु राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून ती बळकट करण्याचाही प्रयत्न होत आहे. जुनी स्पृश्य अस्पृश्यता जाऊन नवीन वैचारिक, राजकीय, साहित्यिक अस्पृश्यता जन्माला येत आहे. जुन्या व्यावसायिक जाती जाऊन नवीन व्यावसायिक गट निर्माण होत आहेत. याचाच अर्थ असा की, जात तयार होण्याची प्रक्रिया अजूनसुद्धा चालू आहे. तसेच अजून देखील खेड्यांमध्ये उच्च-नीचतेची भावना टिकून आहे त्याचा बंदोबस्त आपण करायला हवा. कारण उच्च नीच भाव काढून टाकला तर जात वाईट नसते.

परंतु दलित / शूद्र समाजाची उपेक्षा करणे, अवहेलना करणे, त्यांना अनेक गोष्टींपासून वंचित ठेवणे वगैरे गोष्टी करून भारतीय ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समाजाने घोडचूक केली आहे. मध्ययुगीन काळापासून ते इंग्रज काळापर्यंत त्यांनी जाती व्यवस्थेत इतका कर्मठपणा आणला की त्याची पुढे विकृती झाली. ही विकृती अस्पृश्य माणसाची सावली सुद्धा अंगावर पडू न देण्याच्या टोकाला म्हणजेच माणुसकीला लाज वाटावी इतक्या थराला गेली. हा त्या शूद्र, मागास जातींवर प्रचंड अन्याय होता यात काही शंकाच नाही.

आज आपण जो दलितांचा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य द्वेषाचा हुंकार ऐकतो तो या पार्श्वभूमीवर अपरिहार्य आहे. दलितांनी जो अन्याय अनेक पिढ्या भोगला त्याचे परिमार्जन म्हणजे हा द्वेष ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी खुल्या दिलाने मान्य करणे हाच होऊ शकतो. आमच्या पूर्वजांची चूक झाली आणि त्याची आम्ही मनापासून माफी मागतो अशी भूमिका घ्यावी लागेल.

आज समाजात अशी कित्येक उदाहरणे आहेत की एका सवर्णाचे एका दलिताशी अथवा एक धर्मीय माणसाचे दुसऱ्या धर्मीय एका माणसाशी खूप चांगले संबंध असतात परंतु हे संबंध गढूळ होतात जेव्हा असा मनुष्य त्याच्यासारख्या (एकजातीय) अनेक माणसांबरोबर एकत्रित होतो. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी अहंकार सोडायला हवा आणि मागासवर्गीयांनी मनातील द्वेष कमी करायला हवा तरच समाजात बदल होईल. महाराष्ट्रातील संतांनी हाच बदल घडवून आणण्यासाठी समाज घटकांना प्रबोधन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

आमच्या मते जेंव्हा माणसा माणसात मित्रत्वाचे नाते निर्माण होईल तेव्हाच ही मनातील किल्मिषे दूर व्हायला मदत होईल. आणि हीच गोष्ट इतर धर्मियांबाबत देखील तितकीच खरी आहे. जोपर्यंत आपण गुणांचा आदर करण्याची वृत्ती आणि विवेकी वागणूक आपल्या आचरणात आणत नाही तोपर्यंत खरी समरसता येणे शक्य नाही.

.

यशवंत मराठे आणि सुधीर दांडेकर

yeshwant.marathe@gmail.com

#जातीव्यवस्था #स्पृश्य_अस्पृश्य #जात #caste #caste_system

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.