प्रत्येक संवेदनशील मनुष्याला जगामध्ये न्यायपूर्ण, सुखी व समाधानी वातावरण असावे असे वाटत असते. सर्वांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, कोणी दुःखी कष्टी असू नयेत अशी त्याची अपेक्षा असते. असा मनुष्य जर कृतीशील असेल तर तो आपल्या बुद्धीप्रमाणे, कुवतीनुसार असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्या प्रयत्नाचे सामूहिक स्वरूप म्हणजे निरनिराळे इझम्स (वाद) निर्माण होणे उदा. सोशलिझम्, कम्युनिझम्, कॅपिटॅलिझम् वगैरे. हे इझम्स मानणाऱ्यातील ज्यांची प्रखर बुद्धिमत्ता असते, ते या वादांचे एक राजकीय प्रणाली निर्माण करतात आणि त्यायोगे समाजात न्यायाचे, समाधानाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे ह्या सर्व प्रकियेत दोन कळीचे मुद्दे हरवले गेले आहेत. ते म्हणजे १) माणसाच्या मनाचा आणि २) माणूस स्वार्थीपणे, दुष्टपणे का वागतो ह्याचा शोध घेतला जात नाही आणि त्यामुळे सर्व इझम्स अयशस्वी झाले आहेत असे आमचे मत आहे.

याशिवाय निसर्गाचा एक नियम लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय (नाश) ह्या निसर्गाच्या तीन अवस्था आहेत. त्यामुळे बदल हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. ह्या बदलांची दिशा सुद्धा ठरलेली आहे, उत्पत्तीकडून नाशाकडे. परंतु निसर्गातील सर्वच गोष्टी (ज्यात माणूस सुद्धा अंतर्भूत आहे) एकदम उत्पन्न होत नसतात व एकदम नष्ट देखील होत नाहीत, त्यामुळे स्थितीचा काळ अमर्याद जरी नसला तरी खूप मोठा असतो. समाजात चांगले व वाईट बदल सतत होत असतात. समाजात चांगले बदल घडवून समाजजीवन सुसह्य करणे हे संत महात्म्यांचे कार्य असते. संपूर्ण समाज एकाच वेळी सुखी, समाधानी व आनंदी होऊ शकत नसला तरी व्यक्ती मात्र सुखी, समाधानी व आनंदी होऊ शकते असे भारतीय तत्वज्ञान सांगते. म्हणून हे तत्वज्ञान व्यक्तीकडून समाजापर्यंत जाण्याचा मार्ग अनुसरते. जेवढया जास्त व्यक्ती आनंदी त्या प्रमाणात समाज आनंदी होईल. तर सर्व इझम्स समाजापासून सुरुवात करून व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात म्हणून अयशस्वी होतात अशी आमची धारणा आहे.

समाजातील दुःखांचा सूक्ष्मपणे विचार केलात तर असे दिसून येईल की अपमृत्यू, आजारपण, म्हातारपणामुळे होणारे क्लेष व निसर्गाच्या कोपातून निर्माण होणारी दुःखे ही निसर्गनिर्मित दुःखे आहेत; परंतु निसर्गकोपातील काही गोष्टी मात्र मानवनिर्मित आहे असे आता लक्षात येऊ लागले आहे. तेंव्हा समाजातील गैरव्यवस्थेचे व त्यातून निर्माण होणाऱ्या दुःखांचे खापर देवाच्या डोक्यावर फोडण्याला काही अर्थ नाही. जगात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करायची असल्यास माणसाची वृत्ती बदलविणे हे महत्वाचे कार्य आहे. तेच कार्य संत करीत असतात. तत्वतः माणूस संसारात समाधान आणि आनंद शोधत असतो परंतु संसार हे ह्या दोन गोष्टी मिळविण्याचे स्थानच नाही हे माणसाला कळत नाही. खरे समाधान व दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवरती अवलंबून नसलेला खरा आनंद याचा अर्थ माणसाला नीट समजलेलाच नाही.

प्रत्येक माणसाला सुख, समाधान आणि आनंद हवा असतो व तो त्याच्याच शोधात असतो. परंतु संसारात ह्या तिन्ही गोष्टी क्वचितच एकदम मिळतात आणि त्या सतत तर कधीच मिळत नाहीत; हीच तर संसाराची मर्यादा आहे. व्यवहारात सुख, समाधान व आनंद हे तीनही शब्द आपण बऱ्याचवेळा समान अर्थाने वापरतो. परंतु या शब्दात सूक्ष्म भेद आहे जो पटकन आपल्या लक्षात येत नाही. आपण या प्रत्येक शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करूया.

१) सुख – जेव्हा व्यक्तीला कोणतेही शारीरिक किंवा मानसिक क्लेष नसतात तेव्हा ती व्यक्ती सुखी आहे असे आपण म्हणू शकतो; परंतु त्याच वेळी ती व्यक्ती समाधानी व आनंदी असेलच असे नाही.

२) समाधान – जेव्हा व्यक्तीची शारीरिक किंवा मानसिक इच्छा पूर्ण होते तेव्हा त्या व्यक्तीला समाधान मिळते. उदा. तहान लागली, पाणी प्यायले, समाधान मिळाले. चांगल्या नोकरीची इच्छा धरली, ती मिळाली, समाधान मिळाले.

३) आनंद – आनंदाची एका वाक्यात व्याख्या करणे कठीण आहे परंतु असे म्हणता येईल की, ही मनाची अशी अवस्था असते की, या अवस्थेत माणसाला अनेक गोष्टींचा विसर पडतो. आपल्याला अनुभव असतो की, एखादी आनंदाची बातमी आपल्या प्रिय व्यक्तीला देण्याकरिता पडलेल्या शारीरिक कष्टाची आपल्याला पर्वा नसते. आपल्याला होणाऱ्या आनंदाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल.

अ) व्यवहारात ज्या आनंदाचा आपण बरेच वेळा अनुभव घेतो तो असतो इच्छापूर्तीचा आनंद.

ब) आपण केलेल्या कामाचा किंवा गुणांचा लोक गौरव करतात, आपली स्तुती करतात, मान देतात त्यावेळी जो आनंद मिळतो तो स्व च्या मान्यतेचा आनंद असतो.

क) सुंदर निसर्ग पाहिल्याने किंवा सुंदर संगीत ऐकल्याने जो आनंद मिळतो तो स्व निरपेक्ष असल्याने तो निर्मळ आनंद असतो. या आनंदाचा पोत जरा वरच्या दर्जाचा असतो.

ड) याशिवाय आनंदाचा आणखीन एक प्रकार असतो तो म्हणजे ज्ञान झाल्यामुळे होणारा आनंद. एखादी गोष्ट आपल्याला पूर्णतया कळली/समजली किंवा शोध लागला की होणारा आनंद आणखीन वरच्या दर्जाचा असतो.

इ) वर वर्णन केलेले सर्व आनंद दुसऱ्या गोष्टींवरती अवलंबून असणारे आहेत व ते काही काळ मिळतात आणि नंतर त्यातील स्वारस्य निघून जाते.

परंतु आत्मानंद असा एक आनंद आहे की तो आतून सतत मिळत असतो व तो कशावरही अवलंबून नसतो. संत याच आनंदाचा सतत अनुभव घेत असतात त्यामुळे ते सदासर्वकाळ आनंदी असतात.

साध्या साध्या गोष्टींचे ज्ञान झाल्याने जर आनंद मिळत असेल तर मग आत्म्याचे ज्ञान झाल्याने किती आनंद मिळेल याची कल्पना करता येऊ शकते. आपल्या तत्वज्ञानात ब्रह्माचे स्वरूप सांगताना तो सत् चित् आनंद (सच्चिदानंद) आहे असे सांगितले आहे. सत् म्हणजे सत्य; जे कधीच बदलत नाही ते. चित् म्हणजे उर्जा (energy). आनंद म्हणजे आनंदच (bliss). म्हणूनच ब्रह्माचा अनुभव आला की आनंद मिळणारच. आत्मा हा ब्रह्माचाच भाग आहे त्यामुळे आत्मज्ञान झाले की आनंद हा मिळणारच.

आता आत्मा आणि जीव ह्यातला फरक कळण्यासाठी एक उदाहरण घेऊ. आपण तीन ग्लासात शुद्ध पाणी घेऊन एका ग्लासात माती, कचरा टाकू; दुसऱ्या ग्लासात काही क्षार टाकू; तिसऱ्या ग्लासात विषाणू टाकू. असे केल्याने तिन्ही ग्लासातील पाणी अशुद्ध होऊन पिण्यायोग्य राहणार नाही. परंतु हे सर्व पाणी अशुद्ध झाले असे आपण म्हटले तरी सर्व ठिकाणी शुद्ध पाण्याचे अस्तित्व आहेच. ते शुद्ध पाणी नष्ट झालेले नाही; किंबहुना शुद्ध पाण्याच्या अस्तित्वावरच अशुद्ध पाण्याचे अस्तित्व टिकून आहे. आत्मा आणि जीव ह्यांच्यातील संबंध असाच आहे. जेव्हां आत्म्यावरती निरनिराळ्या संस्कारांची पुटे चढतात, तेव्हां त्याचे जीवात रूपांतर होते. हे संस्कार कोणत्या स्वरूपाचे आहेत त्यावरून सत्व, रज किंवा तम गुणी जीव तयार होतो. वरील पाण्याच्या उदाहरणाप्रमाणे पाण्याची अशुद्धता वेगवेगळी असली तरी सर्वांतील शुद्ध पाणी एकच असते, समान असते. म्हणूनच सर्वांचा आत्मा एकच असतो असे सांगितले जाते. त्याप्रमाणे पाण्यातील निरनिराळी अशुद्धता काढून टाकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतील त्याचप्रमाणे जीवातील अशुद्धता काढण्यासाठी ज्ञान, कर्म किंवा भक्ती मार्ग चोखाळावा लागेल. परंतु सर्व मार्गांचे अंतिम ध्येय आत्म्याचा अनुभव हेच असेल. ही मांडणी ढोबळ आहे परंतु प्रश्न समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे असे आम्हाला वाटते.

आता आत्म्याचा शोध म्हणजे काय? माणूस सतत विचार करत असतो. काही विचार बुद्धीतून येतात, काही कामनांमधून (इच्छेतून) येतात तर काही विचार पूर्व संस्कारातून (आठवणीतून) येतात. या सर्व विचारांचा केंद्रबिंदू स्व किंवा मी असतो. माझ्या मनात विचार येत आहेत याची जाणीव असते. किंबहुना मी विचार करू शकतो म्हणजेच आपण जिवंत आहोत ह्याची आपल्याला खात्री पटलेली असते. विचार येणे, न येणे, कोणत्या प्रकारचे येणे ह्यावरती खरे म्हणजे आपले नियंत्रण नसते. ह्याला थोडासा अपवाद म्हणजे बुद्धीने केलेला विचार. विचार स्फुरणे ही आणखीनच अजब गोष्ट आहे. त्याची कारणमीमांसा सामान्य माणसाला देता येत नाही (एखादं वेळेस मानसशात्रज्ञ देऊ शकतील). आपण असाही अनुभव घेतलेला असतो की जेवढे विचार कमी होतात, तसतशी मनाची शांती वाढत जाते आणि श्वासाची गती कमी होते. तेव्हां श्वासाची गती कमी करत विचारांची गती कमी करणे ह्यातूनच योग निर्माण झाला. विचारांची साखळी तयार होणे व ती तुटून परत स्वचे भान येणे ही प्रक्रिया सतत चालू असते. ही स्वची जाणीव सतत जागरूक असते. गाढ झोपेत ती अगदी सूक्ष्म असते. गाढ झोपेत विचार जवळजवळ नसतात त्यामुळे मनाला प्रतिक्रिया देण्याची जरुरीच नसते; त्यामुळे मन निश्चल असते. ह्याचाच अर्थ असा की स्व ची जाणीव जेवढी कमी, तेवढे विचार कमी आणि जेवढे विचार कमी तेवढी शांतता जास्त. विचार हे स्वकेंद्रित असतात. ज्याप्रमाणे लोहचुंबकाला एकेक टाचणी चिकटवून टाचण्यांची साखळी तयार करता येते अगदी त्याचप्रमाणे विचार शृंखला तयार होते. वरील उदाहरणात लोहचुंबकाचे चुंबकत्व काही कारणाने नष्ट झाले तर सर्व टाचण्या त्याक्षणी निखळून पडतील. त्याचप्रमाणे स्व नष्ट झाला तर विचार गळून पडतील.

आता स्व आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपले नाव आणि आपले शरीर ह्यातून स्व ची जाणीव तयार होते. या स्व ला अध्यात्मात अहंकार म्हणतात. या अहंकाराचे वैशिष्ठ्य असे आहे की तो स्वतःला कर्ता समजतो. या कर्तेपणातून इच्छा, भावना, वासना निर्माण होतात आणि या पूर्ण होईपर्यंत समाधान मिळत नाही. माणसाला अनेक इच्छा असतात त्यामुळे त्याचे कधीच पूर्ण समाधान होत नाही. तसेच नवीन इच्छा निर्माण करण्याचा कारखाना माणसाच्या मनात जोरात चालू असतोच. यावरचा जालीम उपाय म्हणजे कर्तेपण सोडणे आणि त्यायोगे अहंकार कमी करणे. सर्व संत माणसाचे कर्तेपण किती लटके आहे याची जाणीव करून देत असतात. हे जग किती क्षणभंगुर आहे हे सांगत असतात. सर्वांचा उद्देश एकच असतो की माणसाचा अहंकार कमी होत होत अंतिमतः नष्ट व्हावा. हे कर्तेपण आपण का घेतो ह्याचा शोध माणूस कधीच घेत नाही. आपले नाव (जे आपल्याला आईवडिलांनी दिलेले असते) आणि आपले शरीर या व्यतिरिक्त आपल्याला अस्तित्व आहे का? याचा शोध तर सोडूनच द्या पण याचा विचार सुद्धा आपण कधी करत नाही. त्यामुळेच आपल्याला मरणाची प्रचंड भीती वाटते. आपले तत्वज्ञान फक्त आत्मा अमर आहे, ब्रह्म व आत्मा यांचे अद्वैत आहे, ब्रह्म सत्य व बाकी सर्व माया आहे अशी नुसती पोपटपंची करतो असे अजिबात नसून, त्याचा अनुभव घेण्याचे मार्ग सुद्धा सांगतो. नामस्मरण, ध्यान ह्या त्यापैकी काही पद्धती आहेत. या पद्धतीतून विचाररहित जागृत अवस्था म्हणजे फक्त अस्तित्वाची जाणीव (माझ्या अस्तित्वाची जाणीव, असे नव्हे) अशी अवस्था प्राप्त होऊ शकते. हेच आत्मज्ञान असावे असा आमचा विश्वास आहे. ही अवस्था अत्यंत आनंददायी असावी कारण आनंद हे ब्रह्माचे व पर्यायाने आत्म्याचे एक स्वरूपच आहे. या आनंदाने सर्व क्लेष विसरले जातात, अहंकार गेल्यामुळे इच्छा नष्ट होतात व पूर्ण समाधान मिळते. योग्यांना ही अवस्था फक्त ध्यानातच प्राप्त होते असे म्हणतात परंतु नामस्मरण व भक्ती यामुळे ती अवस्था सतत प्राप्त होत असते आणि म्हणूनच भक्तिमार्गाला पंथराज म्हणतात. भातुकलीच्या खेळात लहान मुले चणे, कुरमुऱ्यावरून भांडतात तेव्हां मोठ्या माणसांना अशा मुलांची कीव येते, अगदी त्याचप्रमाणे संसारातील क्षुल्लक गोष्टींवरून भांडणाऱ्या माणसाबद्दल संतांना कीव येऊन ते ग्रंथ संपदा, कीर्तन, प्रवचन अशा गोष्टींद्वारे लोकांना सन्मार्गाला लावण्याचा अट्टाहासाने प्रयत्न करतात.

आत्मज्ञानाच्या शिडीच्या सदाचार, सदवर्तन व दुसऱ्याला त्रास न देण्याची वृत्ती या प्राथमिक पायऱ्या आहेत. त्या गाळून आत्मज्ञान होऊच शकत नाही. म्हणूनच आत्मज्ञान मिळविण्याच्या इच्छेने या पायऱ्या चढणाऱ्या माणसांची संख्या जेवढी वाढेल तेवढा समाज सुखी होईल.

या कारणामुळेच संत कुठचाही इझम् न सांगता, राज्यव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न न करता व्यक्तीला बदलविण्याचा प्रयत्न करतात. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम व रामदास स्वामींपर्यंत जी संतांची मांदियाळी निर्माण झाली त्याचे दृष्य स्वरूप म्हणजे श्रीमंत योगी, उपभोगशून्य राजा ही बिरुदे वागविणारे छत्रपती शिवाजी महाराज. याचाच अर्थ असा की चांगल्या समाजातून चांगला राजा किंवा राज्यकर्ता निर्माण होतो. लोकशाही यशस्वी करण्याची हीच गुरुकिल्ली आहे.

आत्मज्ञानामुळे जे संत, सतत आनंदाच्या डोहात डुंबत आहेत आणि समाधान – आनंद मुक्त हस्ते द्यायला तयार आहेत पण तरी देखील माणूसच घ्यायला तयार नाही, याचेच नाव माया. या गोष्टीचे अचूक वर्णन समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात केले आहे – घरी कामधेनू पुढे ताक मागे. तसेच संत चोखामेळा म्हणतात – काय भुललासी वरलीया रंगा.

समर्थ रामदास स्वामींचे २०५ मनाचे श्लोक आणि संत ज्ञानेश्वरांचा २८ अभंगांचा हरीपाठ जरी पूर्णपणे अभ्यासला तर गीता, उपनिषदे यांच्या गहन जंगलात न शिरता योग्य मार्गदर्शन होईल आणि तसेच अंधश्रद्धेवरती त्यांनी किती कडाडून हल्ला केला आहे ते ही कळून येईल.

वरील सर्व लिखाण प्रत्यक्ष शहर किंवा प्रदेश न बघता नकाशा आणि चित्रे / फोटो बघून त्या शहराचे किंवा प्रदेशाचे रसभरित वर्णन करण्यासारखे आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि तसेच त्यातील त्रुट्यांची सुद्धा कल्पना आहे. परंतु धडपडत आत्मज्ञानाची शिडी चढताना काही फोटो मिळाले ते इतरांना दाखविण्याचा हा एक प्रयत्न.

यशवंत मराठे

सुधीर दांडेकर

yeshwant.marathe@gmail.com

#spirituality #अध्यात्म #आनंद #happiness