माझी स्मरणशक्ती तशी चांगली आहे; मित्रांचे आणि जवळच्या लोकांचे वाढदिवस लक्षात राहतात. परंतु ही तारीख आठवण्याचे कारण तेंव्हा भीतीने वळलेली बोबडी.

२ ऑगस्ट १९९८ साली माझ्या एका मित्राचं अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले (त्याला तरी ही तारीख आठवते आहे की नाही कोणास ठाऊक). ऑपरेशन व्यवस्थित पार पडले आणि थिएटर मधून बाहेर आणून रूम मध्ये हलवण्यात आले. बाहेर त्याचे वडील, बायको, त्याचा चुलत भाऊ आणि मी असे चौघेच होतो. साहजिकच आम्ही सगळे रूम मध्ये गेलो.

त्याला हळूहळू शुद्ध येत होती. अचानक त्याने त्याच्या भावाला हाक मारली आणि ओरडून म्हणाला, त्या (दुसऱ्या कुठल्या तरी एका माणसाचे नाव घेतलं) मादरचोदच्या xx वर लाथ मारून त्या भडव्याला हाकलून लाव (बहुदा त्यांच्या काहीतरी ऑफिस मधले असावे). नंतर सुद्धा काहीतरी शिव्याशाप चालूच होते. त्याच्या वडिलांना एक शॉक बसल्यासारखे स्तब्ध झाले होते; त्यांची बोलतीच बंद झाली. आपला मुलगा एवढ्या शिव्या देऊ शकतो याचा त्यांना बहुदा अंदाज नसावा. मी पटकन त्यांचा हात पकडला आणि म्हटलं, काका चला, आपण जरा बाहेर जाऊया. आम्ही बाहेर पडेपर्यंत मित्राचं गटार तोंड चालूच होते. काकांना मी बाहेर आणून बसवलं पण त्यांची स्वतःचीच काहीतरी चूक झाल्यासारखे ते ओशाळवाणे झाले होते. मला खरं तर खूप हसायला येत होतं पण काकांसमोर हसणार तरी कसा? तोंड दाबून बुक्क्यांचा मार; दुसरं काय? मी त्यांच्या मानसिक स्थितीचा साधारण अंदाज करु शकत होतो. नंतर डॉक्टरला विचारलं तर तो म्हणाला, अनेस्थेसिया मधून बाहेर येताना असं होतं बऱ्याच वेळेला.

माझा मित्र बरा असे माझे तोंड गटार आहे त्यामुळे त्यावेळी पहिला मनात विचार आला, आपली अशी कधी वेळ आली तर? कल्पनेनेच दरदरून घाम फुटला. ठरवलं की आपल्यावर ऑपरेशनची कधी वेळच येऊ द्यायची नाही. पण अशा गोष्टी आपल्या हातात थोड्याच असतात?

२३ डिसेंबर २०१० साली माझेही अपेंडिक्सचेच ऑपरेशन करायला लागणार होते आणि ते सुद्धा कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच डॉक्टरकडे. मी भूतकाळातल्या आठवणींनी इतका घाबरलो होतो की विचारता सोय नाही. बरं, मला असेही वाटू लागले की नुसत्या शिव्या ठीक आहे पण बाकी मी भलतंच अडचणीचं काही बोलू लागलो तर? तद्दन वेडेपणाचे असले तरी मनात दबून बसलेले कल्पना विलास बाहेर आले तर? आपले सुप्त मन म्हणजे एक अभूतपूर्व रसायन आहे, त्यात काय काय दडलेलं असतं ते तो फक्त भगवंतच जाणे. काय करू, कोणाला सांगू तेच कळेना.

डॉक्टर चांगल्या ओळखीचा होता. तो म्हणाला, अपेंडिक्स ही तशी छोटी सर्जरी आहे पण तरी सुद्धा तू एवढा का घाबरला आहेस? तसा तू अजिबात घाबरट नाहीयेस मग प्रॉब्लेम काय आहे? मग मी त्याला माझी भीती स्पष्टपणे सांगितली. त्याची हसून हसून पुरेवाट झाली. तो म्हणाला अरे, असं काहीतरी होईलच असे तू गृहीत का धरतो आहेस? तसेच दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या १२ वर्षात औषधांमध्येही खूप बदल झाले आहेत त्यामुळे बहुदा असं काहीच होणार नाही. पण माझे काही समाधान होत नव्हते. मग माझ्या त्याच मित्राला फोन केला आणि सांगितलं की पूर्ण शुद्धीत येईपर्यंत त्याने एकट्यानेच रूम मध्ये बसावे. अदिती आणि मुलं पण बाहेरच असू देत. आणि मग अदितीलाही स्पष्टपणे माझी अडचण सांगितली. ती पण खोखो हसायला लागली आणि वर मला म्हणते कशी, अरे अशी काही न सांगितलेली गुपिते आहेत का तुझ्या आयुष्यात? नसतील तर का घाबरतोस? पण नंतर बहुदा माझी दया येऊन म्हणाली, बरं बरं, मी बाहेरच थांबीन.

ऑपरेशन झालं आणि मी पूर्ण शुद्धीवर आल्यावर मित्राकडे फक्त बघितलं. त्याने जोरात हसून Thumbs Up केला; पण मला खात्री वाटत नव्हती. शेवटी जेव्हा मित्राने शपथपूर्वक सांगितले तू अगदी गपगुमान झोपला होतास आणि एक शब्द देखील बोलला नाहीस तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. परंतु त्या अनामिक भीतीने काही तास मला जे काही छळलं ते नाही शब्दात नीट सांगता येणार.

त्यानंतर गेल्या ८ वर्षात माझ्या अजून दोन शस्त्रक्रिया झाल्या. दोन्ही वेळेला मला जनरल अनेस्थेसिया देण्यात आला पण त्यावेळची भीती काही परत जाणवली नाही.

परंतु आज मागे वळून बघताना हे भीतीचे भूत माझ्या डोक्यावर कसे नाचत होतं किंवा मला कसे नाचवत होतं हे आठवून आज मलाही खूप हसायला येतंय.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#fear #anaesthesia #शिव्या #भूत