कबुतर जा जा जा…

या जगात जर सगळ्यात निर्बुद्ध पक्षी कुठचा असेल तर निःसंशयपणे कबुतर असे म्हणता येईल. निसर्गचक्रात प्रत्येक प्राणिमात्राचे काहीतरी स्थान असते असे म्हणतात पण काही घटकांबाबत मात्र हे पटत नाही. उदा. झुरळ, ढेकूण, डास आणि त्याच बरोबरीने कबुतर.

पृथ्वीतलावर २६ कोटी कबुतरे आहेत असा अंदाज. या सामान्य कबुतरांचे (ब्लू रॉक पीजन) मूळ स्थान हे कडेकपारींवर होते आणि जिथे घरटी करणे हा त्यांच्या पसंतीचा पर्याय; तो देखील अन्नाच्या उपलब्धतेवर अवलंबून. त्याचप्रमाणे निसर्गाने त्यांच्या संहारासाठी शिकारी पक्षांची आणि प्राण्यांची पण सोय केली त्यामुळे त्यांची संख्या प्रमाणाबाहेर कधीच वाढली नाही.

पण त्यांच्या शहरी भाऊबंधांना ही अडचण कधीच आली नाही. घरटी बनवण्यासाठी जागाच जागा; पॅरापिट्स, ए.सी. कॉम्प्रेसर्स, इमारतींमधील कुठेही मिळणाऱ्या सपाट जागा त्यामुळे वर्षभर कधीही घरटी करायला तयार आणि शहरीकरणामुळे नामशेष झालेले शिकारी पक्षी किंवा प्राणी.

आज कबुतरांमुळे सर्वत्र एक धोक्याची घंटा वाजत आहे आणि सर्वसाधारण जनता हवालदिल झाली आहे. मुंबईत परिस्थिती काही अजिबात वेगळी नाही. कबुतरांची दिवसेंगणिक वाढणारी अमाप संख्या हा एक मोठा जटिल प्रश्न झाला आहे. ही कबुतरे सहजी मिळणाऱ्या अन्नामुळे चांगली जाडजूड सुद्धा होऊ लागली आहेत.

पक्षी मित्रांच्या मतानुसार या काँक्रीट जंगलात टिकाव धरून जगणारा तो एक साहसी पक्षी आहे. बऱ्याच लोकांच्या दृष्टीने कबुतरांना खायला घालणं आणि त्यांची काळजी घेणे हे त्यांचे धार्मिक कर्तव्य आहे आणि मुख्यत्वे ते भूतदयेचे लक्षण आहे. परंतु टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या लोकांना आणि अशा इमारतीत वसणाऱ्या कॉर्पोरेट ऑफिसेस यांना त्याचा किती त्रास होतो ते त्यांनाच माहीत. कबुतरांना दूर ठेवण्यासाठी आज घराघरांमध्ये आपल्याला जाळ्या (नेट्स) लावलेल्या दिसतात.

कबुतरांच्या वाळलेल्या हगण्याचा आज खूप मोठा प्रॉब्लेम आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना विचारा आणि ते ही सांगतील की त्याचा आरोग्याला किती धोका आहे ते. अनेक लोकांना श्वसनाचे विकार होत आहेत.

पक्षी तज्ञांचे असे म्हणणं आहे की कसलाही धरबंध न ठेवता कबुतरांना खायला घालणे हे त्यांची संख्या अमर्याद वाढण्याचे प्रमुख कारण आहे. आज मुंबईत जरी अधिकृत १०० कबुतरखाने असतील तर १०००० अनधिकृत कबुतरखाने आहेत. समुद्रकिनारी, फुटपाथवर आणि जिथे जमेल तिथे थोडे धान्याचे दाणे टाकले की झाली कबुतरखान्याची सुरुवात. कित्येक धान्याचे व्यापारी स्वतःच दुकानासमोर धान्य टाकतात आणि मग येणारं गिऱ्हाईक त्याच्याच कडून धान्य विकत घेऊन फुटपाथवर फेकायला सुरुवात करते. दुकानदारांचा धंदा वाढतो आणि कबुतरांची चंगळ. त्यांना अन्नासाठी काही कष्टच घ्यावे लागत नाहीत; सगळं आयतं मिळतं. पण त्यांचा दुष्परिणाम म्हणजे प्रत्येक पक्षी जातीला आवश्यक असलेली अन्न शोधण्याची क्षमताच कबुतरांमधून नष्ट झालीये. आज कबुतराने काय खावं हे तो नाही ठरवत तर ते मनुष्य ठरवू लागला आहे.

लोकांना वाटतं की कबुतरांना खाद्य देणे हे एक पुण्यकर्म आहे पण वास्तविकता अशी की त्यामुळे पक्षांमध्ये असंतुलता वाढीस लागून त्याचा शेवटी निसर्गचक्रावर विपरीत परिणाम होत आहे. कबुतरांच्या वाढत्या संख्येने चिमण्यांची तर पार हकालपट्टीच झाली आहे.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कबुतरे खरेच इतकी निर्बुद्ध असतात की एखाद्या उघड्या खिडकीतून आत शिरतील पण पटकन बाहेर पडायचे काही केल्या त्याला उमगत नाही. आमच्या घरी तरी आजपर्यंत दोन वेळा कबुतर घरात शिरून पंख्याच्या फटकाऱ्याने मेलेले आहे. एक दोन वेळा तर बाथरूम मध्ये शिरले; काढता काढता नुसती फडफड आणि मारामार. नंतर नेट लावून घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय शिल्लकच राहिला नाही.

आज संपूर्ण जगातील सर्व मोठ्या शहरांमध्ये कबुतर ही एक प्रचंड मोठी समस्या झाली आहे. कबुतरे ही पक्षांमधील तिरस्कृत प्रजाती झाली आहे. अनेक लोक आज तुच्छतेने त्यांना पंख असलेले उंदीर असे संबोधतात आणि हा आकाशी उंदीर सर्वसामान्यांचा शत्रू नंबर एक झाला आहे.

२००१ सालापासून लंडनमधील प्रसिद्ध ट्रॅफल्गार स्वेअर येथे कबुतरांना खाद्य घालण्यास संपूर्ण बंदी करण्यात आली आहे तसेच २००८ पासून व्हेनिस मधील सेंट मार्क्स स्वेअर येथे कबुतरांचे खाद्य विकणे हा दंडनीय गुन्हा आहे. स्पेन मधील कॅटलान या शहरात कबुतरांच्या नसबंदीचा उपाय म्हणून मक्याच्या दाण्यांना Nicarbazin या औषधाचे कोटिंग करण्यात येते आणि मगच ते त्यांना खायला देण्यात येते.

आपल्याला देखील अशी काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी ज्यायोगे ही प्रचंड वाढणारी कबुतरांची संख्या मर्यादित करता येईल. परत इथे देखील कुत्र्यांप्रमाणेच कायद्यात बदल करणे आवश्यक आहे.

हिंदी सिनेमातील प्रसिद्ध गाण्याच्या बोलानुसार कबुतर जा जा जा, कबुतर जा, लेकिन वापिस मत आ असे म्हणायची वेळ आली आहे.

यशवंत मराठे

#कबुतर #pigeons #health_hazard

7 Comments

 1. सर, खरंच आहे, कबुतरांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न गंभीर होत आहे, माणसांची कबुतरांना इतकी सवय झालीय, यात माणसांचाच दोष आहे.

  Like

 2. कबुतरांच्या त्रासासाठी काही अत्यंत सोपे उपाय आहेत. हे मी स्वत: पडताळून बघितले आहेत आणि त्यांचा नेहमी उपयोग करीत असतो. जिथे कबुतरं, कावळे नेहमी येतात अशा ठिकाणी, उदा. विंडो ए सी, स्प्लिट ए सीचे बाहेरील युनिट, अशा ठिकाणी जुन्या प्लास्टिकच्या पिशव्या चिकटपट्टीने लावून ठेवाव्यात. त्या वाऱ्याने हलत राहतात आणि कबुतरं, कावळे अशा ठिकाणी बिलकुल येत नाहीत.

  आमच्या गोव्याच्या अपार्टमेंटच्या गॅलेरीमध्ये आम्ही तिथे काही महिने गेलो नसतांना कबुतरांनी खूपच घाण करून ठेवली होती आणि ते सर्व स्वच्छ करणं अत्यंत कटकटीचे काम होते. तिथून परत येण्यापूर्वी आम्ही एक-दोन लाल मिरच्या चुरडल्या आणि गॅलेरीभर टाकल्या. तेव्हापासून तिथे कबुतरं फिरकत सुद्धा नाहीत.

  Like

 3. शाळेत असताना माझ्याकडे आणि गल्लीतल्या आणखी एकाकडे एअर गन होती. हिवाळ्याच्या दिवसांत आम्ही कबुतरं मारायचो आणि सात आठ जण अर्धवट बांधकाम झालेल्या ईमारतीत जाऊन ती कबुतरं भाजून किंवा मसाला वगैरे लावू सुकं किंवा रस्सा करुन पावा बरोबर खायचो. कोंबडी सारखंच लागतं. मजा यायची.

  Like

 4. Concrete jungles were built by us, trees were cut by us, their natural predator were driven away by us, they are fed by us throwing food and other things ( basically our negligence) and for that also we blame the pigeons. Thats the best joke i have hear this week.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.