वसंत तसा माझ्यापेक्षा फक्त दोनच वर्षांनी लहान. पण तरीसुद्धा तो मला नेहमीच दादा म्हणत आला. लहानपणापासूनच तो अतिशय शांत आणि खरंच गुणी; त्याच्यामानाने मी अवगुणीच. मी लहानपणी त्याच्यावर खूप दादागिरी करायचो पण तो सगळी सहन करायचा. तो वरकरणी रागावत नसे पण मला खात्री आहे त्याला मनातून नक्की राग येत असणार; तो त्याने कधीही दर्शवला नाही हे मात्र तितकंच खरं. सगळं डोळ्यातून बोलायचा. त्याचा वाढदिवस तिथीने तुकाराम बीजेचा. त्याचा शांत स्वभाव बघून आई तर त्याला लहानपणी तुकारामच म्हणायची.

तो शिकायला अमेरिकेला गेला पण जायच्या आधीपासून त्याला सर्वांनीच पढवून ठेवले होते की शिक्षण संपवून तुला लगेच परत यायचे आहे. त्याच्या बरोबर गेलेलं त्याचे जवळजवळ सगळेच मित्र तिथेच स्थायिक झाले. पण तो मात्र आज्ञाधारक मुलासारखा दीड वर्षात परत आला. शिक्षण संपल्यानंतर ना कुठे फारसा फिरला किंवा ना अनुभव म्हणून कुठे नोकरी केली. कधीकधी वाटतं की त्याच्यावर सगळ्यांकडून अन्याय तर झाला नाही ना? तो तिथेच राहिला असता तर आज त्याचे आयुष्य कसे असते? मला कल्पना आहे की या माझ्या अशा विचारांना काही अर्थ नाही पण मनात येते कधीतरी.

१९८९ पासून तो कौटुंबिक धंद्यात जो आला तो गेल्या वर्षीपर्यंत अथक परिश्रम करत होता. आता एकत्र धंदा म्हणजे मतभेद तर होणारच पण त्याचे कौतुक म्हणजे मोठा भाऊ म्हणून मी जे सांगेन ते तो कधीही धुडकावायचा नाही. त्याने तिथेही माझी दादागिरी थोडीफार सहन केलीच. त्याची सहनशीलता वाखाणण्याजोगी आहे यात काही शंकाच नाही. नशिबाने अगदी पाहिल्यापाहून आमचे आपापसातील संबंध खूपच चांगले होते. आम्ही दोघांनीही आमच्या कौटुंबिक बाबींना आमच्या संबंधांमध्ये लुडबुड करू दिली नाही. मी तसा रागीट आणि पटकन आवाज वाढवणारा. आणि देव माझ्या घश्यात सायलेन्सर बसवायला बहुदा विसरलाय त्यामुळे कधीकधी बोलणं वर्मी लागू शकतं आणि म्हणूनच संबंध चांगले राहण्याचा जास्त वाटा बहुदा त्याचाच असेल. त्याच्यात बोट ठेवावं असा एकही दोष किंवा अवगुण मला तरी माहित नाही आणि म्हणूनच असेल पण तो खऱ्या अर्थाने अजातशत्रू आहे.

अमेय आणि प्रणवच्या लहानपणी वसंतने त्यांचे किती कौतुक आणि लाड केले याला खरंच तोड नाही. अमेय तर त्याचा खास लाडका आणि अमेयला सुद्धा काका म्हणजे जीव की प्राण.

नोव्हेंबर २०१४ मध्ये त्याला बसलेल्या कौटुंबिक आघातानंतर आज ज्या पद्धतीने त्याने त्याच्या मुलांची काळजी घेतली ती तर अभूतपूर्व आहे. ओम आणि सिया नशीबवान आहेत असा बाप मिळायला.

गेल्या वर्षी जानेवारीच्या आसपास मला एक प्रकारचे मानसिक रितेपण छळत होते त्यावेळी मला ते फक्त त्याच्याशीच शेअर करावेसे वाटले आणि त्याने त्यावेळी इतकी मस्त मार्गदर्शकाची भूमिका निभावली की मला कोण्या दुसऱ्या सल्लागाराकडे जावेच लागले नाही. माझ्या ब्लॉगचा खरा प्रणेता पण वसंतच आहे. आज सुद्धा माझे लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील याची तळमळ माझ्यापेक्षा त्यालाच जास्त असते. त्याचे आभार मानलेले त्याला आवडणार नाही पण तरी देखील, त्याला मनःपूर्वक धन्यवाद.

गेल्या वर्षी मे महिन्यात वसंत मला म्हणाला की आधी ठरल्याप्रमाणे तो दोन्ही मुलांना घेऊन कुठेतरी ट्रीपला जाणार होता पण त्या दोघांचं कॉलेज, इंटर्नशिप मुळे दोघांनाही जमत नाहीये तर मी एकटाच कुठेतरी जातो. मी म्हटलं, खरंच जा; एक दोन जागा पण सुचवल्या. अचानक दुसऱ्या दिवशी तो मला म्हणाला, दादा तूच का येत नाहीस माझ्याबरोबर? अशी ठरली आमची मालदिवची ट्रिप.

आम्ही दोघेच अशी पहिलीच ट्रिप त्यामुळे थोडी धाकधूक होती की कंटाळा तर येणार नाही ना? पण ही ट्रिप निदान माझ्या आयुष्यातील तरी एक अविस्मरणीय सफर ठरली. आम्ही वैयक्तिक जीवनातील किती अनेक गोष्टी एकमेकांबरोबर तिथे शेअर केल्या की नंतर असं जाणवलं की अरे, आपल्याला आपल्या भावाची एक वेगळी ओळख या ट्रीपने दिली. आमचे संबंध भाऊ या नात्याबरोबरच मैत्रीच्या नव्या धाग्यात बांधले गेले. खूप मजा आली आणि असा निर्णय घेऊन टाकला की वर्षातून एकदा आम्ही दोघांनीच कुठेतरी जायचंच. आणि तसा योग पाठोपाठ आलाच. माझ्या मुलाने काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत घर घेतलं तेव्हा माझी बायको जाऊन आली होती. मला डिसेंबर महिन्यात अमेरिकेत एका लग्नाला जायचंच होतं म्हणून मी तिच्याबरोबर गेलो नाही. मी एकटाच म्हणून वसंतला विचारलं तर तो एका पायावर तयार. अशी आमची २०१८ मधील दुसरी ट्रिप झाली.

त्याने वयाच्या ५५ व्या वर्षी त्याने डॉक्टरेट करायचा निर्णय घेतला आणि मी थक्क झालो. या वयात अभ्यास? नाही नाही, मला शक्य नाही. नुकताच तो IIM कलकत्ता येथे Guest Lecturer सुद्धा झाला आहे. मानलं बाबा त्याला! हॅट्स ऑफ!

पुढचा जन्म असतो का नाही मला कल्पना नाही पण असेल तर वसंत माझा परत भाऊ झालेला आवडेल. हां, आता त्याने माझी दादागिरी माझ्यावर उलटवण्यासाठी मोठा भाऊ व्हायचं ठरवलं तर काय करायचे याचा विचार अजून केलेला नाही.

आज त्याने ५६ वर्षे पूर्ण केली असल्याने त्याला आता अब तक सिर्फ छप्पन असे म्हणता येईल. मी जेष्ठ असल्याने जीवेत शरदः शतम् असा आशीर्वाद देऊ शकतो पण आशीर्वाद देणारा मी आणि घेणारा वसंत दोघेही शंभर काही बघणार नाही त्यामुळे आपल्याकडे अशी उगाचच एक पद्धत जरी असली तरी मी असं काहीही म्हणणार नाही.

मी एक इच्छा मात्र मनापासून करू शकतो की संध्याकाळी एका हातात पुस्तक, दुसऱ्या हातात उत्तम स्कॉचचा ग्लास यांची मस्त मैफल, मनसोक्त भटकंती, संगीताचा मनमुराद आस्वाद आणि उर्वरित आयुष्यात धमाल मजा. बस्स, अजून काय पाहिजे?

यशवंत