मराठी माणूस म्हटला की तो सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय असणार असे गृहीत धरले जाते आणि ते काही फारसे चुकीचे नाही. पण मध्यमवर्गीय म्हणजे काय?

खूप श्रीमंत नसलेला, कमी आकांक्षा असलेला, स्वत:च्या परिघात आनंद निर्माण करणारा, निष्ठा बाळगणारा, प्रतिष्ठा जपणारा आणि बऱ्याच अंशी मूल्यांना मानणारा मराठी वर्ग म्हणजे ‘मध्यमवर्ग‘ असं म्हणता येईल. या सगळ्या चौकटीत त्याची आर्थिक सुबत्ता सुस्थिर असणं हा भागदेखील महत्त्वाचा. मात्र ती त्याची पूर्व-अट नव्हती किंवा तो त्याबद्दल फारसा आग्रही नव्हता. अंथरूण पाहून पाय पसरावं म्हणताना त्यानं अंथरूणाची लांबी-रूंदी गरजेनुसार स्थिर केली. प्रसंगपरत्वे वाढवली देखील. परदेशी स्थायिक झालेली आपली मुले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

मध्यमवर्गीय असे म्हटलं की मला नेहमी पु.ल. देशपांडे आठवतात. पुलंचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनातून सतत व्यक्त होणारी मध्यमवर्गीय संस्कृती. गेल्या अनेक पिढ्या मराठी माणसाने आपली म्हणून जी संस्कृती, जीवनसरणी अनुभवली, जपली आणि जोपासली आहे; तिचा इतका सर्वांगीण, संपूर्ण आणि खोलवर वेध घेणारा पुलंसारखा अन्य कोणताही लेखक गेल्या अर्धशतकात मराठी साहित्यामध्ये झाला नाही. एक लेखक आणि एक माणूस या नात्याने पुलंनी जी अपरंपार लोकप्रियता संपादन केली, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या साहित्यातून सतत प्रकट होत राहिलेली ही मध्यमवर्गीय संस्कृती. बहुसंख्य मराठी माणूस ही या संस्कृतीचीच निमिर्ती आहे. म्हणून तिचा सातत्याने आविष्कार करणारे पु.ल. मराठी वाचकांना इतके भावले, आवडले. नुसते आवडले इतकेच नव्हे; हा लेखक त्यांना अगदी आपला, आपल्या घरातला, आपल्याच रक्तामासाचा असा वाटला. पुलंशी त्यांचे अभिन्न, उत्कट असे नाते जडले. ही आपुलकी, ही जवळीक गेल्या अर्धशतकात अन्य कोणत्याही लेखकाच्या वाट्याला आलेली नाही.

कुटुंब हा मराठी समाजाचा केंदबिंदू होता. बहुतेक मराठी माणसे कुटुंबाच्या आश्रयाने राहत. एकूण जीवनालाच कुटुंबसंस्थेची भरभक्कम बैठक होती.

माझ्या लहानपणी काय परिस्थिती होती? माझे आजोबा अप्पासाहेब हे वेंगुर्ल्याहून मुंबई ते कराची आणि फाळणीनंतर परत मुंबई असा प्रवास करून मुंबईकर झाले. पण पुढची अनेक वर्षे वेंगुर्ल्याहून कोणीही मुंबईत आला की पहिले काही दिवस मुक्काम मराठ्यांच्या घरी ठरलेला. त्याची दुसरी सोय होईपर्यंत तो तिथेच रहायचा. बरं आमचं घरही काही प्रचंड मोठं नव्हतं. ६०० फुटाचा फ्लॅट पण बाहेरच्या दुकानांच्या कृपेने घरातील उंची १४ फूट. त्यामुळे अख्ख्या घरामध्ये माळा होता. (आता तो अधिकृत का अनधिकृत ही मला कल्पना नाही). त्या घरात साधारणपणे १५ ते १८ पाहुणे कायमस्वरूपी असायचे (घरचे ७-८ सोडून). आता मला कल्पना सुद्धा करवत नाही.

नंतर देखील नातेवाईकांचा राबता घरात कायम. जेवायला आम्ही फक्त घरचेच असे अपवादात्मकच. मामा, मावश्या, आत्या, काका असे एक मोठं कुटुंब. अशा वातावरणात वाढल्यामुळे माझ्या गरजा तशा आजही मर्यादितच राहिल्या आहेत. आणि कुठेतरी पहिल्यापासून दुसऱ्याला कमीपणा वाटेल असा पैशाचा थाट किंवा प्रदर्शन कधीही नाही. मला आठवतंय की दिवाळीत फटाके पण फार जास्त आणायचे नाहीत कारण सोसायटीमधील माझ्या अनेक मित्रांना तेवढेही शक्य नसायचे. आम्ही जास्त फटाके लावले तर त्यांना वाईट वाटेल म्हणून मग वडील थोडे जादा फटाके माझ्या मित्रांमध्ये वाटून टाकायचे.

मी आजही केस कापायला जातो त्याची किंमत रु. १०० पेक्षा जास्त असेल तर मला मानसिक त्रास होतो. माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी धाकट्या मुलाच्या आग्रहाने कुठल्यातरी मेन्स हेअर स्पा मध्ये गेलो आणि साध्या केस कापण्याचे रु. १२०० ऐकल्यावर मला फेफरं आलं होतं.

कालांतराने बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीने या मध्यमवर्गाच्या स्थैर्याला गदगदा हलवले. पूर्वीच्या अनेक मूल्यांची पडझड झाली. पैसा या गोष्टीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आणि त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांना बाजारूपणाची कळा आली. मराठी माणसाकडे तुलनेने पैसा कमी त्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड. आता परिस्थिती थोडीफार बदलली असेल पण मराठी व्यावसायिक फारसे नाहीत. कुठचीही सामाजिक संस्था घ्या; त्याचे देणगीदार कोण तर गुजराथी आणि मारवाडी, मराठी जवळजवळ नाहीत. त्यामुळे मराठी माणसाला कुठे महत्वच नाही.

कला, साहित्य, राजकारण सारे पैशाच्या संदर्भात मोजले आणि विकले जाऊ लागले. सिद्धीपेक्षा प्रसिद्धीला अधिक मोल आले. या महाराष्ट्राच्या मातीत किती थोर व्यक्ती जन्माला आल्या; मग ते राजकारण असो की समाजकारण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तोंडात बोट घालायला अशी कामे आणि संस्था महाराष्ट्रात उभ्या केल्या. पण इतर संस्थांप्रमाणे देणगीदार गुजराथी आणि मारवाडी त्यामुळे त्यांचा उदोउदो होतो. दुर्दैवाने त्या संस्थेसाठी रक्त आटविणाऱ्या माणसाला महत्वच नाही कारण त्यांचे कुठेच उदात्तीकरण होत नाही. काही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास लोकांना अश्या व्यक्ती माहीतच नसतात मग त्यांचा अभिमान कसा वाटावा?

आपणच आपला इतिहास विसरलो मग तो इतर प्रांतीय का लक्षात ठेवतील? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व सुद्धा आपण मराठी माणसापुरते मर्यादित करून टाकले आहे. आपल्या पेशव्यांचे कर्तृत्व एवढे मोठं पण आम्ही त्यांना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादात इतके संकुचित करून टाकले की त्यांना इतिहासात स्थानच राहिले नाही. त्याची आजची परिणीती काय तर देशाच्या राजकारणात गेल्या ७० वर्षात मराठी माणसाला नगण्य महत्व.

मा. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना एकदा पानिपतला गेले होते तेव्हा त्यांनी खास करून काला आम या मराठ्यांच्या युद्ध स्मारकाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी बोललेलं वाक्य प्रत्येक मराठी माणसाने मनावर कोरून ठेवायला हवं – या भूमीत मराठे जे लढले ते हिंदुस्थानाच्या संरक्षणासाठी लढले, आपल्या स्वतःसाठी नाही.

परंतु गेल्या काही वर्षात अनेक मूल्यांची इतकी मोठी घुसळण झाली आहे की, मराठी माणसे आपली बलस्थानेच विसरून गेली आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी मराठी माणूस म्हणजे त्याग, व्यवस्थितपणा आणि लढाऊ बाणा. पण आज त्यातलं काय शिल्लक राहिलंय?

इंग्रजी आले नाही तर मागे पडू या भीतीने मराठी शाळाच नामशेष होऊ लागल्या. आम्ही आमची भाषाच विसरू लागलो आहोत. आज जगात कुठेही गेलात तरी इतर भाषीय त्यांचा प्रांतीय भेटला की त्यांच्या भाषेत बोलायला लागतात; मग ते गुजराथी, पंजाबी, तामिळ, बंगाली अथवा अन्य कुठलेही भाषिक असू देत पण दोन मराठी माणसे मात्र बऱ्याचदा इंग्रजीत बोलताना आढळतील.

त्यामुळे मराठी संस्कृती नेमकी कशाला म्हणावं याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. हल्ली तर स्वतःला मराठी म्हणणे म्हणजे शाप तर नाही अशी शंका येण्यासारखे वातावरण झाले आहे. आम्ही भाषा विसरलो तशी आमची संस्कृती आमच्यापासून विलग होऊ लागली. हे असेच चालू राहिले तर या संस्कृतीचा लोप अटळ आहे.

हल्ली आपल्या बहुतेकांची मुले सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकली आहेत त्यामुळे पुढे मुलं काय करतील अशी शंका बऱ्याच जणांना असते. तसेच बरेच मराठी भाषिक आज मुख्यत्वे अमेरिकेत स्थाईक झाले आहेत; होत आहेत त्यामुळे भविष्यात काय होणार याची आमच्या पिढीला एक काळजी. पण मला असं वाटतं की आपण घरात कोणती भाषा बोलतो यावर खूप काही अवलंबून आहे. घरी मराठीतच सगळे व्यवहार चालत असतील तर मुलांची शाळा इंग्रजीत असल्याने काहीही फरक पडत नाही. शेवटी इंग्रजीच्या शिक्षणाने त्यांची व्यावसायिक उन्नती होणार असेल तर ती भाषा शिकलीच पाहिजे; त्यात काहीही गैर नाही. पण घरात सर्व व्यवहार मराठीत असले तर आपली मुले मराठीपासूनही दूर जात नाहीत हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून म्हणू शकतो.

मी काही समाजाला बदलू शकत नाही परंतु मी एक गोष्ट नक्की करू शकतो आणि ती म्हणजे जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी ही मराठी संस्कृती जपेन.

आणि म्हणेन मी अभिमानाने, की हो, आहे मी मराठी मध्यमवर्गीय!!!

यशवंत मराठे

#मराठी #मध्यमवर्गीय #संस्कृती #MiddleClass #culture