आशा भोसले

मी २८ सप्टेंबरला माझा लतादीदी हा लेख प्रसिद्ध केला होता. बऱ्याच जणांनी मला असे बोलून दाखवले की मी काहीही म्हटले तरी आशा ही लतापेक्षा जास्ती चतुरस्र गायिका आहे. त्यांच्या मताचा मी आदर करतो तरीदेखील मी माझ्या मतावर ठाम आहे की जर हिंदी चित्रपट सृष्टीचा विचार केला तर लताची प्रतिभा ही एका वेगळ्याच जगातील आहे.

आशाने तिचे पहिले मराठी गाणे १९४३ मध्ये माझं बाळ या चित्रपटातील “चला चला नवबाला” हे वयाच्या १० व्या वर्षी गायले. तिचे हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले गाणे हे चुनरिया (१९४८) ह्या सिनेमातील सावन आया हे होते पण पहिले सोलो गाणे १९४९ सालातील रात की रानी या चित्रपटात होते. ओ पी नय्यरनी तिला प्रथमतः सीआयडी या चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली पण तिला खरे यश १९५७ च्या नया दौर या चित्रपटाने दिले जेव्हा ती पहिल्यांदाच मुख्य हेरॉईनसाठी तिने सर्व गाणी म्हटली. त्याकाळी लता मंगेशकर, गीता दत्त आणि शमशाद बेगम यांची सद्दी होती त्यामुळे सर्व प्रमुख गाणी त्यांना मिळत आणि त्यांनी नाकारलेली (म्हणजे सहकलाकारांवर चित्रित झालेली किंवा सवंग) गाणी आशाच्या वाट्याला यायची. कदाचित त्यामुळे असेल पण आशाची गाजलेली हिंदी सोलो गाणी खूप कमी आहेत. एक प्रकारे हा तिच्यावर अन्यायच झाला पण तरी देखील तिने कधीही लताची कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही. तिने स्वतःची वेगळी स्टाईल ठेऊन आपले व्यक्तित्व जोपासले यातच तिचा मोठेपणा आहे.

अगदी पहिल्यापासून बघितले तर चित्रपट गीतांमध्ये संगीतकाराला सगळं क्रेडिट मिळतं, गायक किंवा गायिका कोण हे फारसे महत्वाचे नसे. ते समीकरण लता आणि आशा या दोन बहिणींनी आणि रफी-किशोर या गायकांनी बदलले. आज सुद्धा रेहमानचे संगीत असलेल्या गाण्यात गायक किंवा गायिका कोण हे बऱ्याच वेळा माहितीच नसते.

या सर्व कठीण दिव्यातून आणि तसेच स्वतःच्या कौटुंबिक शोकांतिकेतून तिला दोन संगीतकारांनी सावरलं आणि तिला स्वतःची अशी ओळख दिली आणि ते म्हणजे ओपी नय्यर आणि आरडी बर्मन.

आणखीन एका गोष्टीने तिला एक स्वतःचे स्थान देऊन वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आणि ती म्हणजे मराठी गीते. तिने काय काय गाणी मराठीत म्हटली नाहीत? भक्तीगीते, प्रेमगीते, शृंगारगीते, नाट्यसंगीत, बालगीते, तमाशागीते, भावगीते. अफाट रेंज. माझ्या मते मराठी गीतांमध्ये लतापेक्षा देखील आशा जास्त लोकप्रिय झाली आणि तिने इथे मात्र तिने लताला मागे सारलं. एक झलक म्हणून गाणी बघा.

१. अत्तराचा फाया, २. उठी श्रीरामा पहाट झाली, ३. उषःकाल होता होता, ४. एका तळ्यात होती, ५. कठीण कठीण कठीण किती, ६. का रे दुरावा, ७. केव्हांतरी पहाटे, ८. चंद्रिका ही जणू, ९. चांदणे शिंपीत जासी, १०. जिवलगा, राहिले रे दूर, ११. तरुण आहे रात्र अजुनी, १२. धुंदी कळ्यांना, १३. नाच रे मोरा, १४. नाच नाचुनि अति मी दमले, १५. परवशता पाश दैवे, १६. पांडुरंग कांती दिव्य तेज, १७. प्रेम सेवा शरण, १८. बुगडी माझी सांडली गं, १९. मर्मबंधातली ठेव ही, २०. मागे उभा मंगेश, २१. मी मज हरपून बसले, २२. युवती मना दारुण रण, २३. ये रे घना, २४. रवि मी चंद्र कसा, २५. रामा रघुनंदना, २६. रूप पाहता लोचनी, २७. रेशमांच्या रेघांनी, २८. शूरा मी वंदिले, २९. स्वप्नात रंगले मी, ३०. ऋतू हिरवा ऋतू बरवा

दीनानाथ मंगेशकरांचा नाट्यगीतांचा वारसा जर कोणी पुढे चालवला असेल तर तो फक्त आशानेच.

त्याच प्रमाणे आशा नवनवीन प्रयोगाला कायम तयार असते. तरुण परदेशी गायकांबरोबर fusion गाण्यात तर तिचा कोणी हातच धरू शकत नाही. तिने माझ्या माहितीनुसार इंग्रजी, स्पॅनिश, रशियन, मले, झेक, नेपाळी या परदेशी भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. आणि अर्थातच भारतीय भाषांबद्दल तर बोलायलाच नको; १५ तरी नक्कीच असतील. तसेच कुठच्याही शैलीतील (genre) गाणे निवडले तर असं म्हणता येणार नाही की या शैलीत आशाचे एकही गाणे नाही.

गेल्या काही वर्षात आशाने चित्रपट संगीतातून जवळजवळ विरक्ती घेतली आहे पण तिच्या ८५ वर्षाच्या वयाला लाजवेल असा गोडवा अजून तिच्या आवाजात आहे. आयुष्यात आलेल्या अडचणींचे तिने कधीही अवडंबर माजवले नाही; चेहरा कायम हसतमुख. या एकाच गोष्टीसाठी आशाला त्रिवार सलाम!!

यशवंत मराठे

#AshaBhosale #PlaybackSinger #मराठी नाट्यगीते #DinanathMangeshkar

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.