मी दीड महिन्यापूर्वी फेरीवाले हा लेख लिहिला तेव्हा बऱ्याच जणांनी मी वासुदेव बद्दल काहीच उल्लेख केला नाही असे मला कळवलं होतं. पण माझ्या दृष्टीने वासुदेव हा फेरीवाला या प्रकारात मोडूच शकत नाही.

वासुदेवाचा इतिहास काय आहे हे शोधत असताना मिळालेल्या माहितीतून आणि काही माझ्या स्वानुभवातून तयार झालेला हा लेख.

वासुदेव‘ या परंपरेची सुरुवात नक्की कधी झाली कुणास ठाऊक पण ती किमान १०००-१२०० वर्षापुर्वीची तरी नक्कीच असावी. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी ‘वासुदेवावर’ लिहीलेली रुपके आजही उपलब्ध आहेत. जुन्या काळात मराठी मुलखातील खेडोपाडी येणारी पहाट मोठी प्रसन्न असायची. घराघरातून जात्यावरची गाणी म्हणत धान्य दळणार्‍या महिला, गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आडावरून पाणी आणणारी गडीमाणसं अन् त्याच वेळी डोक्यावर उभट मोरपिसांची टोपी, गळ्यात कवड्याच्या माळा, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ, कमरेला पावा (बासरी), मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे आणि पायात घुंगरू अशा वेशात गाणं म्हणत नाच करणारा वासुदेव दिसायचा.

अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. बायका सुपातून जोंधळे घालत दान करत असत. पुरुष पैसा देऊन त्याला नमस्कार करत. वासुदेवही दान पावलं म्हणत अंगणात नाच करत असे. सारे अंगण आत्यंतिक समाधानात न्हाहून जायचे.

मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवाच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती. या वासुदेवाच्या साहाय्याने शिवाजीने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत.

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग – गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. हरिनाम बोला हो वासुदेव बोला म्हणत लोकांमध्ये धर्मभावना जागृत करण्याचं, दिवसाची सुंदर, पवित्र सुरुवात करुन देण्याचं काम हा ‘वासुदेव’ इमाने इतबारे करत असतो. कुणी मग त्याच्या झोळीत पसाभर धान्य टाकतात आणि तो संतुष्ट होवून ‘वासुदेव बोला, हरिनाम बोला’ करत पुढच्या दाराकडे वळतो. मुखात अखंड हरिनाम घेत दिवसाची प्रसन्न सुरूवात करुन देणारा वासुदेव आजकाल तसा दुर्मिळच होत चालला आहे. खेडोपाडी अवचित दिसतो तरी, शहरांतून मात्र तो जवळजवळ अदृष्य झाला आहे.

वासुदेव सहसा कुणालाही आपणहून पैसे मागत नाही पण त्याला पैसे दिले की तो मग बासरी वाजवतो. पूर्वीच्या काळी अगदी पहाटे पहाटे कृष्णभक्तीची गाणी ऐकवून लोकांना झोपेतून उठवणारा गुणवान भिक्षेकरी. आता तो शहरात पहाटे आला तर लोकं हाकलवून देतील म्हणून मग तो थोडा उशीरा म्हणजे ८-८.३० च्या सुमारास येतो.

जसे आजकालच्या सगळंच बदलू लागलं आहे तसे शहरात येणारे वासुदेवही बदलत चालले आहेत. त्यांच्यातही बाजारूपणा डोकावू लागला आहे. जास्तीत जास्त पैसे कसे काढता येतील याचे मार्ग ते अवलंबतात. तुम्हाला कोणाला कधी जाणवलंय की नाही माहीत नाही पण हे वासुदेव बऱ्याचदा खूप अचूक फेस रीडिंग करतात. त्यांच्यात ही कला का तांत्रिकता कुठून येते याची कल्पना नाही but sometimes it is very scary.

दोन उदाहरणे देतो:

१. माझ्या मित्राच्या सोसायटीत वासुदेव यायचा. हा खाली उतरला तर तो समोरच. आता ह्याच्या मुलाचा त्याकाळी काही प्रॉब्लेम होता आणि तसा तो काळजीग्रस्त होता. वासुदेव त्याला म्हणाला, साहेब मुलाचा प्रॉब्लेम सुटायला अजून थोडा काळ जावा लागेल. मित्राला काय बोलावे तेच कळेना कारण त्याने काहीच विचारले नव्हते. मग काय तो एकदमच केविलवाणा झाला. मग त्या वासुदेवाने त्याला काहीतरी उपाय सांगितला आणि त्याच्याकडून रु. ५००० काढले. नंतर पुढे काय झालं हे माझ्या मित्राला कधी विचारले नाही पण कालांतराने त्याच्या मुलाची गाडी रुळावर आली हेही तितकंच खरं. हे ऐकले तेव्हा मला वाटलं की हा निव्वळ योगायोग असावा कारण आज बरेच पालक मुलांच्या भविष्याच्या काळजीने चिंतीत असतात त्यामुळे त्याने एक अंदाज ठोकला आणि तो फीट बसला असेल असे समजून मी ते विसरून गेलो.

२. दुसरा प्रसंग आमच्या अगदी समोर घडला. एकदा एक वासुदेव बाजूच्या बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये चिपळ्या वाजवत उभा होता. माझा मित्र आणि त्याची बायको आमच्याकडे आले होते आणि आम्ही चौघे आमच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीत उभे राहून त्याच्याकडे बघत होते. तो वासुदेव माझ्या मित्राच्या बायकोला म्हणाला, ताई, संकष्टीचा उपवास का सोडलात? सोडू नका. तिच्याबरोबर आमचीही बोबडी वळायची वेळ आली. तिने खरोखरीच नुकताच उपवास करणे बंद केले होते. पुढे लगेच काहीतरी उपाय सांगू लागला जो एक प्रकारे पैसे काढण्याचाच प्रकार होता.

परंतु आम्हाला अजूनही न उलगलेलं कोडं म्हणजे तिने उपास सोडला आहे हे त्या वासुदेवाला फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघून, ते सुद्धा ती तिसऱ्या मजल्यावर उभी असताना कसे कळले? काही अगम्य गोष्टी असतात त्यातील ही एक आहे.

पण या बाजारूपणाचा दुष्परिणाम म्हणजे वासुदेव हळूहळू शहरातूनच काय पण गावातूनही हद्दपार होतील अशी शक्यता दिसू लागली आहे. पूर्वीच्या समाज प्रबोधनापासून आजची ही स्थिती म्हणजे वासुदेवाची शोकांतिका आहे.

यशवंत मराठे

#vasudev #वासुदेव #FolkArtist