माझी हिंदी गाण्यांची आवड ही १९८० दशकांपर्यंतच. नंतर सगळा आनंदी आनंदच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील स्त्री पार्श्वगायिकांचा १९४० च्या दशकापासून जरी विचार केला तरी खूप जास्ती नावे समोर येत नाहीत.

सुरुवातीचा काळ लक्षात घेतला तर १९४० च्या दशकात नूरजहान, अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालेवाली, सुरैय्या, शमशाद बेगम, मीना कपूर ह्या प्रमुख गायिका होत्या. पण थोड्याफार प्रमाणात सुरैय्या सोडली तर बाकी सर्वांचा आवाज एकदम भारदस्त. गाणी सुद्धा बैठकीची वाटावी अशी. कोवळ्या नायिकेच्या कोवळ्या गळ्याला शोभेल असा एकही आवाज नाही पण दुसरा काही पर्याय नसल्याने या गायिका बऱ्यापैकी गाजल्या.

पण लता मंगेशकर आली आणि सगळंच बदलून गेलं. तिची पहिली काही गाणी म्हणजे परकर पोलक्यातील कोवळी गायिका. अतिशय मधाळ आवाजातील अशक्य प्रतिभा.

(माझ्या लता आणि आशा यांच्यावरील प्रेमाच्या हक्काने मी त्यांना एकेरी संबोधत आहे)

तिच्या पाठोपाठ काही वर्षांनी आशा भोसले उदयास आली. खरं सांगायचं तर लता या झंझावातासमोर फक्त एकच गायिका टिकली आणि ती म्हणजे आशा आणि म्हणूनच तिचे स्थान मोठं आहे.

पुढे १९५०-१९६० च्या दशकांमध्ये गीता दत्त, मुबारक बेगम, सुधा मल्होत्रा, सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर या गायिका पुढे आल्या पण त्यातल्या त्यात गीता दत्त सोडली तर बाकीच्यांचा फार प्रभाव पडला नाही. दुर्दैवाने सुमन कल्याणपूर ही फक्त प्रति लता बनून राहिली आणि तिला स्वतःची अशी प्रतिमा नाही उभी करता आली. आता त्यात असेही म्हणणारे लोक असतील की लता आणि आशा या बहिणींनी, आणि खास करून लताने मोनोपॉली केली आणि बऱ्याच गायिकांना वर येऊ दिले नाही. हे मला काही फारसे पटत नाही कारण खरं म्हणजे लताला तिच्या आसपास देखील स्पर्धक नव्हता. जर का तसा असता, तर संगीतकारांनी त्या स्पर्धकाला पण वापरले असते. याच कारणाने मला ओ पी नय्यर मोठा वाटतो. या माणसाने १९५० आणि १९६० ही दोन दशके लताचा आवाज न वापरता गाजवली. आणि ह्याच ओपी मुळे आशाला स्वतःची अशी एक ओळख मिळाली.

मग आता लोकांचा लाडका प्रश्न की श्रेष्ठ कोण? लता की आशा? एक गोष्ट मान्य करायलाच हवी की जर लता नसती तर आशाला जी लोकप्रियता मिळाली त्यापेक्षा खूप जास्त मिळाली असती. त्यामुळे काही अर्थी तिने चुकीच्या वेळी जन्म घेतला. सर्व प्रमुख गाणी लताला मिळायची आणि बाकी फुटवळ, सवंग आशाच्या वाट्याला यायची. दुय्यम अभिनेत्रींच्या तोंडी आशाचं गाणं हा सर्वसाधारण नियम. तो नंतर नंतर तिने स्वतःच्या प्रतिभेने बदलला. पण खूप लोकांना लता पेक्षा आशा जास्त चतुरस्त्र गायिका आहे असे वाटते.

मला मात्र हे अजिबातच पटत नाही. प्रत्येकाला स्वतःची आवड असते आणि मी त्याचा आदर करतो. परंतु माझ्या मते लताची प्रतिभा ही एका वेगळ्याच विश्वातील आहे. गायिकांमध्ये लता म्हणजे माऊंट एव्हरेस्ट आहे. आशा कांचनगंगा जरूर आहे परंतु एवरेस्ट काही अंगुळे का होईना पण उंचच राहणार.

एक साधा सरळ सोपा प्रश्न; लता आणि आशाची तुम्हाला आवडणारी दहा सोलो गाणी सांगा. लताची १० काय; मला ३६ गाणी पटापट आठवली आणि नंतर मग थांबलो कारण अजून नीट विचार केला तर कदाचित अजून २५ पण आठवली असती. आशाची मात्र १० सोलो आठवायला कष्ट पडले.

लताची सोलो गाणी:

१. आयेगा आनेवाला (महल), २. अल्ला तेरो नाम (हम दोनो), ३. आपकी नजरोंने समझा (अनपढ), ४. बैंया ना धरो (दस्तक), ५. चंदा रे जा रे जारे (जिद्दी), ६. धीरे धीरे मचल (अनुपमा), ७. एक था बचपन (आशिर्वाद), ८. हाये रे वो दिन क्यूॅं न आये (अनुराधा), ९. हम प्यार मे जलनेवालों (जेलर), १०. हमारे बाद अब मेहफिल में (बागी), ११. हमारे दिल से न जाना (उडन खटोला), १२. कैसे दिन बिते (अनुराधा), १३. कुछ दिल ने कहां (अनुपमा), १४. लग जा गले के (वो कौन थी), १५. मनमोहना बडे झुठे (सीमा), १६. मोरा गोरा अंग (बंदिनी), १७. नैनों में बदरा छाये (मेरा साया), १८. ओ सजना बरखा (परख), १९. ओ बेकरार दिल (कोहरा), २०.पवन दिवानी (डॉ. विद्या), २१. फैली हुई है (हाऊस नं. ४४), २२. रहे ना रहे हम (ममता), २३. रसिक बलमा (चोरी चोरी), २४. रुठ के तुम जो चल दिये (जलती निशानी), २५. संसार से भागे फिरते (चित्रलेखा), २६. सत्यम शिवम सुंदरम (सत्यम शिवम सुंदरम), २७. सुनो सजना (आये दिन बहार के), २८. साजन की गलिया (बाजार), २९. सपने में सजन से (गेटवे ऑफ इंडिया), ३०. तुम ना जाने किस (सजा), ३१. तुम क्या जानो (शिनशिनाकी बुबला बू), ३२. तुम्हारे बुलाने को जी (लाडली), ३३. ठंडी हवाऐं (नौजवान), ३४. ऊठाये जा उनके सितम (अंदाज), ३५. उनको ये शिकायत (अदालत), ३६. याद रखना चांद तारों (अनोखा प्यार)

आशाची सोलो गाणी:

१. आईये मेहेरबा (हावडा ब्रिज), २. आओ हुजूर तुमको (किस्मत), ३. भंवरा बडा नादान (साहिब, बीबी और गुलाम), ४. काली घाट छाये (सुजाता), ५. कोई आया धडकन (लाजवंती), ६. जब चली ठंडी हवा (दो बदन), ७. तोरा मन दर्पन (काजल), ८. जाईये आप कहा (मेरे सनम), ९. दिल चीज क्या है (उमराव जान), १०. इन आखोंकी मस्ती में (उमराव जान)

इथे गायनेतील प्रतिभेबद्दल बोलत असल्यामुळे, माणूस म्हणून कोण मोठं आहे, लता कशी कोत्या मनोवृत्तीची आहे वगैरे गोष्टी गैरलागू आहेत.

ज्या लताने मधाळ, पातळ आवाजाने सुरुवात केली, तिनेच नंतर स्वतःच्या गायकीचा पीच इतका वाढवला की तिच्या पुरुष सहगायकांना सुद्धा त्रास झाला असेल. माझ्या मते तिने हा प्रकार आपल्या जवळपास कोणी प्रतिस्पर्धी येऊच नये म्हणून केला असावा. लताची प्रतिभाच इतकी होती की तिने तो लीलया पेलला पण दुसऱ्या कुठल्या गायिकेच्या दृष्टीने ती जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती. आशाने तो प्रयत्नच केला नाही. लता तिच्या प्रयोगात यशस्वी तर नक्कीच झाली आणि कोणी तिच्या आसपास पण फिरकू शकले नाही. परंतु त्याचा दुष्परिणाम भविष्यात असा झाला लताचा आवाज पुढे त्यामानाने खूप लवकर खराब झाला. गेले १०-१५ वर्षे तर ती गात नाहीचेय पण त्याच्या आधीच्याही ५-१० वर्षातील तिची गाणी ऐकवत नाहीत. मग त्या मानाने आशाचा आवाज तेवढा खराब झाला नाही आणि तो आत्ताआत्तापर्यंत श्रवणीय होता. आणि ह्या आयुष्याच्या टप्प्यात मात्र आशाने लतावर मात केली असे मला वाटते.

तसेच एका गोष्टीचे मला कधीही उत्तर मिळालेले नाही आणि ती म्हणजे अशी खूप गाणी आहेत की जी पुरुष गायकाने म्हटली आणि तेच गाणं लताने पण म्हटलं; परंतु असे एकही गाणे आठवत नाही जे लताने म्हटले आणि पुरुष गायकापेक्षा जास्ती लोकप्रिय झाले. वानगीदाखल काही गाणी की जी लताने पण म्हटली आहेत असं बऱ्याच वेळा सांगावं लागतं.

रफी: गर तुम भुला ना दोगे, तेरी आँखोंके सिवा, एहसान तेरा होगा मुझपर, दिल जो न केह सका, जिया ओ जिया ओ, मेरे मेहबूब तूझें, जिंदगी भर नही भुलेगी, ओ मेरे शाहे खुमा, तुम मुझे यूं भुला, नगमा ओ शेर की सौगात, परदेसीयों से अखिया, जब जब बहार आये, तकदीर का फसाना, तुम कमसीन हों, झिलमिल सितारोंका, आजा तुझको पुकारे

किशोर: अजनबी तुम जाने पेहचाने, छोटीसी ये दुनिया, जीवन के सफर में राही, रिमझिम गिरे सावन, मेरे नैना सावन भादों, खिलते है गुल यहाँ

मुकेश: चंदन सा बदन, आ लौट के आजा, मुझको इस रात की, जिस दिल में बसा था

तलत: ऐ मेरे दिल कहीं, जाये तो जाये कहाँ, सब कुछ लुटा के

मी १९५० ते १९७५ च्या संगीताला सुवर्णयुग म्हणतो पण जर लताच नसती तर ते तसे असते? कठीण वाटतं. म्हणूनच देवाचं आभार की ज्या काळात लता मंगेशकर होती त्या काळात त्याने मला जन्माला घातलं नाहीतर केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो, नाही का?

एकदा आचार्य अत्रेंना लताबद्दल लिहायला सांगितलं तेव्हा शब्दप्रभू अत्रे म्हणाले:

“केवळ लोखंडाच्या निपातून उतरल्या शाईनं, जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखादया अप्सरेच्या मृदुल चरणकमलाखाली गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे.”

लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर..

“पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं.”

“लताचा आवाज हा मानवी सुष्ठीतला एक अद्भुत चमत्कार आहे. साक्षात विधात्याला सुद्धा असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही.”

“श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल.”

“सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं. कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली

ल ता मं गे श क र

यशवंत मराठे

#celebrities #lata #LataMangeshkar #PlaybackSinger