साहेब

आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात साहेब एकच आहेत तसेच आमच्या मित्रांमध्ये अनभिषिक्त साहेब एकच आणि तो म्हणजे श्रीराम दांडेकर.

श्रीराम हा तसा माझा ५५ वर्षे ओळखीचा आहे असे म्हणायला हरकत नाही, मी मित्र म्हणत नाही हे लक्षात घ्या.

आम्ही अगदी शिशुवर्गापासून बालमोहन शाळेत एकत्र होतो. तशी पाचवी-सहावी पर्यंत फारशी अक्कल पण नव्हती त्यामुळे वर्गातील सगळीच मुले आपले मित्र अशी एक सरळ सोपी व्याख्या. सातवी नंतर मग आपला ग्रुप, दुसरा ग्रुप अशा टोळ्या होऊ लागल्या. मी जरी रूढ अर्थाने हूड नसलो तरी श्रीरामच्या मानाने अत्रांगच. आम्हांला जरा लवकरच शिंग फुटायला लागल्यामुळे आपण कोणीतरी वेगळे ही एक भावना त्यामुळे तसे आम्ही शाळेत कधीच मित्र नव्हतो.

शाळेनंतर तो रुईया आणि मी रुपारेल त्यामुळे संबंधच राहिला नाही. तसे आमचे कौटुंबिक संबंध पण फार होते असे नाही. त्याची आई खूप लवकर स्वर्गवासी झाली पण त्यावेळी मला त्या गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कळले. या कारणामुळे त्याचे लग्नही लवकरच झाले, आमच्या दृष्टीने बालविवाहच. पण गमंत म्हणजे त्याच्या वडिलांकडून माझ्या वडिलांना एक औपचारिक आमंत्रण आले आणि माझे आई वडील त्याच्या लग्नाला गेले सुद्धा पण मी काही गेलो नव्हतो. पुढे माझ्या लग्नाला पण मी त्याला वेगळे आमंत्रण दिलेले काही आठवत नाही किंवा तो आमच्या लग्नाला आला होता असे वाटत तरी नाही. त्यावेळी जर मला कोणी सांगितले असते की पुढे तुझी श्रीरामशी मैत्री होईल तर मी त्याला वेड्यात काढला असता.

साधारणपणे १९९५ च्या आसपास माझा त्यावेळचा अगदी जवळचा मित्र, अभिजित वर्दे यांने आम्हां काही जणांना घरी जेवायला बोलावले तेव्हा श्रीराम पण होता. तेव्हा खरं म्हणजे त्याची आणि माझी पहिली चांगली भेट झाली. तेव्हा असं लक्षात आलं की आपण याच्याबद्दल उगाचच काहीतरी ग्रह करून घेतला होता. तो काही गर्विष्ठ वगैरे काहीच वाटला नाही. तेव्हांपासून रूढार्थाने आमच्या मैत्रीचा प्रवास सुरु झाला असे म्हणता येईल. बहुदा त्याच्याही मनात माझ्याबद्दल काहीतरी समज असतील आणि ते कदाचित दूर झाले असावेत.

नंतर अधूनमधून आमची भेट होऊ लागली. साधारण जानेवारी १९९७ मध्ये श्रीरामने आम्हां दोघांना घरी बोलावले; कशासाठी तर एकत्र कोकण ट्रिप ठरवण्यासाठी. आणि कोकण ठरवता ठरवता आम्ही नक्की काय केले तर १७ दिवसाची युरोप ट्रिप. तेव्हा हे मला लक्षात आलं नव्हतं की ही माझ्यासाठी भविष्यात घडणाऱ्या अशा गोष्टींची नांदी होती. परंतु आश्चर्य म्हणजे १९९७ च्या मे महिन्यात ती ट्रिप घडली सुद्धा. पुढे कालांतराने आमच्या कौटुंबिक सहली पण झाल्या; आधी राहिलेलं कोकण, केरळ वगैरे.

साधारण २००० मध्ये आमच्या बालमोहनच्या वर्गातील सतीश धारप, श्रीराम, भूषण गोठोस्कर आणि बहुदा मिलिंद वैद्य, अरुण तेंडुलकर हे दर रविवारी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर भेटायला लागले. आणि श्रीराममुळे मला त्या ठिकाणी पाठोपाठच प्रवेश मिळाला त्याबद्दल त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच. ऐ श्रीराम, चूप, शिव्या देऊ नको, पूर्ण लेख वाच मुकाटपणे.

जसे लोणचं मुरतं तशी आमची मैत्री हळूहळू मुरू लागली आणि गेल्या दहा वर्षात ती कशी काय एवढी घट्ट होत गेली हे तो भगवंतच जाणे. याचे जास्ती श्रेय त्यालाच द्यायला हवं कारण मी तसा माणूसघाणा, मला फोनवर देखील नीट बोलता येत नाही (इति अदिती), मी निर्व्यसनी (निरनिराळी व्यसने असलेला) आणि तो त्या खऱ्या अर्थाने त्या व्याख्येच्या जवळ जाणारा. पण कसे का होईना पण तारे जुळले एवढं नक्की.

श्रीराम हा कॅम्लिन या मोजक्या मराठी बिझनेस परिवारापैकी. शाळेपासून आम्हां सर्वांचीच कॅम्लिनशी एक वेगळीच जवळीक त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटायचा, सुदैवाने असूया कधीच वाटली नाही. पण आश्चर्य म्हणजे श्रीरामनेही त्याची कधी शेखी मिरवली नाही. गेल्या काही वर्षात बदलत्या Business Dynamics मुळे दांडेकर फॅमिलीने त्याचा majority stake जपानी कंपनीला विकला असला तरी आपल्या मराठी लोकांच्या दृष्टीने कॅम्लिन आणि दांडेकर हे एक अतूट नाते आहे.

मी जसजसा त्याला ओळखू लागलो तशी मला त्याच्यातील गुणांची जाणीव होऊ लागली. बायको मुलांवर निरातिशय प्रेम, पापभिरू, मनाने अतिशय हळवा, गद्य आणि पद्य लिहिण्याची अतिशय सुरेख प्रतिभा, बोलघेवडा, लोकांना काहीही अपेक्षा न ठेवता मदत करण्याची तयारी आणि आवड, स्वप्नात सुद्धा कधी कोणाला फसवणार नाही अशी सच्चाई, अभूतपूर्व लोकसंग्रह (निखिलच्या लग्नाला आलेले व्हीव्हीआयपी बघून अजून प्रकर्षाने जाणवले), सर्व सोशल सर्कल मध्ये याचा राबता, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि काय काय लिहू? एका माणसात इतके का गुण असावेत की ज्यामुळे माझ्यासारख्या माणसाला न्यूनगंड वाटावा? श्रीरामा, थोडासा बिघडलास तरी चालेल रे.

पण हो, या गुणांबरोबर काही गोष्टी अशा ही आहेत की ज्या फक्त तोच करू शकतो. कुठलाही प्लॅन ठरवण्यात हा सगळ्यात पुढे पण तो तडीस जाईलच याची काहीही खात्री नाही. कारण आमच्या मते त्याचा पहिला प्लॅन हा कॅन्सल करण्यासाठीच असतो. त्याने आजपर्यंत कट्टा ग्रुपच्या कुठे कुठे ट्रिप्स फक्त ठरवल्या पण झाली एकही नाही. हा एकाच दिवशी एकाच वेळेला ४-५ लोकांशी भेट ठरवू शकतो आणि मग गोंधळ झाला की स्वतःच्या थोबाडीत मारून घेणे किंवा कपाळावर हात मारणे हा याचा लाडका छंद. हा तासातासाला प्लॅन बदलू शकतो. हा पक्का देशप्रेमी संघिष्ठ आणि भाजपा वाला. पण याचा प्रॉब्लेम म्हणजे त्याच्या मताच्या पूर्ण विरुद्ध मत याला झेपतच नाही आणि मग तो काहीतरी लिहीत राहतो आणि स्वतःचा पॉईंट ठोकत राहतो. पटकन रागावण्यात याचा हात कोणी धरणार नाही, तसा शांत पण होतो लवकर पण जरा संयम कमीच. याचे एका शब्दात वर्णन करायचे झाले तर मनस्वी हा एकदम फिट बसणारा शब्द.

आमच्यातील राजकारणात जायला सगळ्यात लायक माणूस कोण असेल तर फक्त श्रीरामच. आम्ही श्रीराम दांडेकर मित्रमंडळ असे बॅनर पण तयार ठेवलेत पण हा पठ्ठ्या काही अजून तयार होत नाही. बोलण्याची तर इतकी खुमखुमी की हा कुठेही भाषणाला उभा राहू शकतो. स्टेज हे याचे अतिशय लाडकं ठिकाण, बहुदा जन्मही स्टेजवरच झाला असावा. हा कुठे, कधी आणि केव्हा स्टेजवर असेल याची कल्पना कोणीही करू शकत नाही. एकच उदाहरण देतो – याची बायको एकदा तिच्या मैत्रीणींबरोबर इकडे तिकडे ओळख काढून रामदेव बाबांच्या कार्यक्रमाला गेली. थोड्या वेळाने तिची एक मैत्रीण जवळजवळ किंचाळलीच कारण श्रीराम रामदेव बाबांबरोबर स्टेजवर होता. त्याच्या बायकोला सुद्धा काही कल्पना नव्हती. नंतर तिने त्याला विचारल्यावर तो म्हणाला, अग मलाही माहित नव्हतं की मी स्टेजवर पोहोचेन.

असा हा माझा मित्र उद्या साठीत पदार्पण करतो आहे.

त्याच्या काव्य प्रतिभेची झलक म्हणून श्रीरामने केलेली एक कविता पोस्ट करतोय.

मुक्त गान

मुक्त मी, उन्मुक्त मी, छंद भुक्त मी,

शेष मी, निःशेष मी,

व्यक्त मी, अव्यक्त मी,

अपूर्ण मी, संपूर्ण मी,

भान मी, बेभान मी,

काळ मी, कळीकाळ मी,

क्षुद्र मी, रुद्र मी,

क्षयशीण मी, अक्षूण्ण मी,

अदृश्य मी, दृश्य मी,

वेग मी, संवेग मी,

बंधभान, आयुष्य गान,

होतो तरी ही, मुक्त मी ।

मला कल्पना आहे की हे त्याच्याबद्दल एवढं लिहिलेलं श्रीरामला आवडणार नाही पण काही हरकत नाही; खाईन थोड्या शिव्या. मित्राकडून अधूनमधून असे आहेर मिळायलाच हवेत नाही का? जीवाला जीव देणारा हा एक अतिशय मस्त मित्र आहे. जियो मेरे यार. असाच हसत रहा आणि आम्हांला आनंद देत रहा.

यशवंत मराठे

#personalities #camlin #dandekar #katta #shriram

4 Comments

 1. व्वा, यशवंतराव,आधूनिक आणि संक्षिप्त (श्री)रामायण च लिहीले आहेस. Kuddos.
  Actually श्रीराम च्या द्रूष्टीने आम्ही पण ओवाळून टाकलेले, म्हणून जास्त संबंध वाढू शकले नाहीत, पण मला नेहमीच त्याच्या चांगूलपणाचे कौतुक होते व आहे.
  पण त्याच्या इतर गुणांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  असाच लिहीता रहा.👍🏻👍🏻

  Like

 2. फार छान. कदाचित श्रीरामला अवघडल्या सारखं झालं असेल हे वाचून. मला आवडणाऱ्या काही निवडक माणसांपैकी श्रीराम हा एक. केव्हाही पाहिलं तर नेहमी हसतमुख आणि प्रसन्न रहाणारा श्रीराम हा सत्शील आणि विनयशील व्यक्तीमत्वाचा असावा असं माझं मत आहे. माझा त्याचा ही विशेष संबंध आलेला नाही तरीही कुठेही भेटला तर आपणहून ओळख दाखवणार आणि ओळखीच्या स्मितहास्याने अभिवादन करणार. फार छान माणुस.

  Like

 3. माझी संघ संबंधामुळे श्रीरामच्या वडिलांशी – शरदरावांशी – आधी ओळख झाली. ते इतके सह्जपणी बोलत की त्यांचा मी ‘मित्र’च आहे असं बघणाऱ्याला वाटावं. नंतर गेल्या काही वर्षात श्रीरामशी भेटी गाठी वाढल्या. तोही वडिलांसारखा सहज संबंध ठेवणारा. त्यामुळे त्याच्याशी खरोखर मैत्री झाली. वसंत लिमये ह्या अवलिया कॉमन मित्रामुळे ती आणखी घट्ट झाली. श्रीरामला आगाऊ शुभेच्छा !!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.