शिवाजी पार्कच्या गप्पा

(गद्धे पंचविशी) 

कॉलेज मध्ये असताना माहीम स्टेशनच्या जवळ आमचा एक फ्लॅट होता जो रिकामाच होता त्यामुळे मित्रांच्या दृष्टीने काय आनंदी आनंद.. पण त्यावेळी खिशात फार पैसे नसायचे त्यामुळे बियर पिणे परवडायचं नाही त्यामुळे सगळा इंटरेस्ट पत्ते खेळण्यात, आणि तो सुद्धा ३ पत्ती परंतु अत्यंत कमी स्टेक्सवर (कारण पैसेच नव्हते).. ३-४ तास खेळून १५-२० रुपयांची उलाढाल व्हायची.. जो जिंकेल त्याने कुठेतरी खायला घालायचं; अगदी वडा पाव सुद्धा चालायचा.. खेळायची हौस तर इतकी की एकदा तर भर पावसात कमरेभर पाण्यातून वाट काढत काढत तिथे पोहोचलो.. अशा वेळी मग मित्राचा मित्र काय पण मित्राचा मामा आलेला ही चालायचा..

मी पदवीधर झालो आणि लगेचच आमच्या फॅमिली बिजनेसला जॉईन झालो कारण मला पुढे शिकण्यात उत्साह राहिला नव्हता.. त्यामुळे छोटासा का होईना पण महिन्याला पगार चालू झाला (महिना रु. ५००).. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पैशावर कसलीही जबाबदारी नाही; मग काय माझे श्रीमंती थाट.. त्याच सुमारास माहीमचा फ्लॅट विकून आमच्याच बिल्डिंग मध्ये वडिलांनी एक दुसरा मोठा फ्लॅट घेतला त्यामुळे आमचा आधीच फ्लॅट रिकामाच मग तर काय आमच्या दृष्टीने स्वर्गसुखच.. माझ्या मित्रांनी या आमच्या फ्लॅटचे “निझाम पॅलेस” असे नामकरण केले होते.. पार्टी करायला मोकळंच रान मिळालं आम्हाला.. आणि सर्वांनाच दारू पिण्याची हौस भारी.. नुसतीच बाटली आणायची, ग्लास घरी होतेच.. ना चकणा, ना बर्फ, ना सोडा; पेग भरायचा आणि बेसिनच्या नळाचे पाणी.. दारू कितीही वाजता कमी पडली तर घराच्या अगदी जवळ भोला शेठचा सनराईज बार होताच; अगदी रात्री २-३ वाजता पण नक्की मिळणार.. बरं रात्री कितीही उशीर झाला तरी जेवायचं काय आणि कुठे हा प्रश्न कधीच आला नाही कारण जेवायच्या भरपूर जागा होत्या.. दादर स्टेशन किंवा फाईव्ह गार्डनला पाव भाजी, बुर्जी पाव नाहीतर मग ग्रॅण्ट रोड दिल्ली दरबार.. सकाळी ४-५ वाजेपर्यंत कधीच प्रॉब्लेम आला नाही..

जर कधी घरी शक्य नसेल तर मग बाहेर जायचे दारू प्यायला.. आम्ही इतक्या जागा शोधून काढल्या होत्या की काय काय सांगू असे होईल.. नारळी बागेतील घुमटाखाली, स्कॉटिश शाळेच्या समोरचे आता असलेले गार्डन, हिंदुजा हॉस्पिटल समोरच्या गल्लीत गाडीत बसून, दादर चौपाटी वरील काही स्टॉलच्या मागचा कट्टा आणि इथे सगळीकडे ग्लास, बर्फ, सोडा आणि चकण्याची सोय करून देणारे कोणी ना कोणीतरी होते.. त्यामुळे सर्व्हिस पण मिळायची आणि स्वस्तात दारू प्यायची मजा.. पण आमची सगळ्यात आवडती जागा म्हणजे स्विमिंग पूल कॅफे (बहुतेक कॅफे सिमला).. समुद्राचा मस्त वारा, तेथील ज्युक बॉक्स मधून लागली जाणारी धुंद गाणी आणि स्वतःची चपटी घेऊन जायला आडकाठी नाही, खायला टेस्टी मटण पॅटिस; काय जबरदस्त वातावरण!! ज्या दिवशी तो कॅफे बंद झाला तेव्हा आम्हाला एक प्रकारे सूतक आलं..

आताच्या पिढीला हे सर्व अशक्य आणि स्वप्नवत वाटेल बहुदा.. दुसरं म्हणजे दारू पिऊन गाडी चालवायची नाही अशी सक्तीही नव्हती.. त्या काळी ट्रॅफिक कमी होता ही गोष्ट खरी पण तरी सुद्धा आता असे वाटते की त्यावेळेसही बंदी असायला हवी होती.. आमच्या कोणाचा अपघात झाला नाही ही केवळ देवाचीच कृपा..

गद्धे पंचविशीच्या काळात काय काय केले नाही? मटका खेळला, माहीम दर्ग्यात जाऊन चरस आणि गांजा ओढला, आजूबाजूच्या वाडीच्या दादांशी (आताच्या भाषेत भाई लोग) दोस्ती केली, दारू-सिगरेट तर होतीच.. एकच गोष्ट कधी जमली नाही ती म्हणजे स्त्री संबंध.. एक प्रकारचा न्यूनगंड होता आणि तशी डेरिंग पण अजिबात नव्हती.. घरचे संस्कार असे थोतांड शब्द मी नाही वापरणार कारण ते असते बाकीच्याही गोष्टी करायला धजावलो नसतो..

पण माझ्या सुदैवाने या सगळ्यातून मी सहीसलामत बाहेर पडलो.. त्यामुळे असंगाशी संग आला पण प्राणांशी गाठ पडली नाही आणि बचावलो.. मी दारू आणि सिगरेट अजूनही पकडून आहे पण त्यावेळेच्या तुलनेने खूपच कमी आणि कंट्रोल मध्ये..

एक गोष्ट चांगली घडली की या सर्व गोष्टी लग्नाच्या आधीच कमी झाल्या आणि त्यामुळे बायकोला जरा त्रास कमी दिला असेल किंवा झाला असेल.. ऑफ कोर्स हे म्हणणं माझं झालं पण तिचं काय मत असेल ते तिलाच माहित..

काही म्हणा पण तद्पश्चात या माझ्या परिसरात प्रचंड बदल घडू लागला आणि आता तर अशी परिस्थिती आहे की जुने लँडमार्कच नाहीसे होऊ लागले आहेत आणि माझ्यासारख्या वर्षोनुवर्षे इथे राहिलेल्या व्यक्तीला सुद्धा हा परिसर जरा अनोळखी आणि दुरावल्यासारखा वाटायला लागला आहे..

तेव्हा आता पुढच्या शेवटच्या अंकात बघू की आज या परिसराची परिस्थिती काय आणि ओळख काय?

यशवंत मराठे

#shivajipark #memories #दारू #cards