शिवाजी पार्कच्या गप्पा

जन्मापासून आजतागायत ह्याच परिसरात वाढलो, मोठा झालो त्यामुळे मी ह्या परिसराचा नैसर्गिक आणि स्थायी नागरिक आहे असे ठामपणे म्हणू शकतो.. लहानपणापासून जी आठवण आहे त्यानुसार प्रामुख्याने मध्यमवर्गीय लोकवस्ती असलेला हा परिसर.. झकपक रेस्तराँ, फाईव्ह स्टार हॉटेल्स, पब्स, multiplexes तेव्हा नव्हती आणि आताही फारशी नाहीत..

पुढील काही लेखांमधून माझे स्वानुभव मी शेअर करण्याचा एक प्रयत्न करणार आहे.. मला कल्पना आहे की सध्याची नवीन पिढी त्या अनुभवांशी कदाचित समरस होणार नाही परंतु त्यांना एक प्रकारे भूतकाळात डोकावण्याची संधी मिळेल ज्यायोगे ५० वर्षांपूर्वींपासूनचे जीवनमान कसे आणि काय होते याची एक चुणूक किंवा झलक मिळू शकेल.. हे लिखाण मी इंग्रजीत पण करणार आहे ज्यामुळे मी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेन..

आता मी जर ह्या परिसरातील महत्वाच्या काय खुणा होत्या असा जर विचार केला तर असे लक्षात येते की तशा त्या फारच थोड्या होत्या.. शिवाजी पार्क आणि त्यातील जिमखाना हे प्रसिद्ध असणे अतिशय स्वाभाविक होते कारण एक प्रकारे ते मुंबई क्रिकेटचे, किंवा खरं म्हणायचे तर भारतीय क्रिकेटचेच माहेरघर म्हणावे लागेल.. १९७० च्या दशकात मुंबईचा दबदबा क्रिकेटमध्ये एवढा होता की मला आठवतंय १९७२-७३ साली एका टेस्ट मॅचमध्ये ११ पैकी ७ ते ८ खेळाडू मुंबईचे होते.. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नसानसातून क्रिकेट धावत असे..

शिवाजी पार्क ही ह्या परिसराची ऑक्सिजन देणारी हिरवळ आहे.. गेली ५० वर्षे तिथे सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्र, काहीही असो, तिथे चालणारे, धावणारे लोक दिसतातच.. तसेच थोड्या थोड्या अंतरावर बसणारे ग्रुप्स – सिनियर सिटिझन्स, तरुण मुलं-मुली, मित्रांचे अड्डे, कपल्स ही तर असतातच.. हा कधीही न झोपणारा पार्क आहे असे म्हटले तर वावगं होणार नाही..

आणि मग माझी शाळा – बालमोहन विद्यामंदिर.. शिक्षण महर्षी (सर्वार्थाने सद्य सम्राटांपेक्षा उत्तुंग असलेले) कै. दादासाहेब रेगे यांनी संस्थापित केलेली मराठी शाळा.. त्या शाळेत व्यतीत केलेली १२-१३ वर्षे ही माझ्या आयुष्यातील सोनेरी पानेच आहेत.. या शाळेची कीर्ती अशी होती की आमच्या सोसायटीत राहणारी अमहाराष्ट्रीय मुले सुद्धा इतर दुसऱ्या शाळेचा विचार न करता बालमोहनकर झाली..

वीर सावरकर मार्ग (कॅडल रोड) आणि कटारिया मार्ग यांच्या जंक्शनवर असलेली आलिशान वास्तू म्हणजे नातू बंगला.. वस्त्रोद्यय व्यवसायातील यशस्वी उद्योजक यांची टोलेजंग वास्तू, जिथे आज आसावरी बिल्डिंग आहे ती जागा.. आऊटहाऊस आणि स्टाफ क्वार्टर असलेला एक दिमाखदार बंगला..

तसेच खूप जुन्या म्हणून माहित असलेल्या बिल्डींग्स म्हणजे लोकमान्य नगर, रामबाग, अल्ट्रा आणि गुडविल अस्यूरन्स.. त्या तुलनेत १९७७ साली उभे राहिलेले सेना भवन तसे नवीनच.. आणि त्या काळी ह्या परिसरात बरीच सिनेमा थिएटर्स आणि इराणी कॅफे तर होतीच परंतु त्याबद्दल आपण विस्तृतपणे नंतर बोलूच..

आणि हो, हिंदुजा हॉस्पिटल, जेव्हा ते नॅशनल हॉस्पिटल म्हणून ओळखले जायचे.. ह्या परिसराबाहेरील लोकांना अजिबात माहित नसलेले हॉस्पिटल.. मुंबईतील दुसऱ्या भागातून जेव्हा इथे यायचे असे तेव्हा टॅक्सी ड्राईव्हरला नक्की कुठे जायचंय हे सांगताना नाकीनऊ यायचे.. पण तशी त्यांचीही काही फार चूक नव्हती कारण तेव्हा हॉस्पिटलची एक छोटी बैठी बिल्डिंग होती.. १९८० साली एका दुर्दैवी घटनेमुळे त्या हॉस्पिटलला खूप प्रसिद्धी मिळाली.. ३१ जुलै १९८० रोजी प्रथितयश पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन या हॉस्पिटलमध्ये झाले आणि दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात त्याचे नाव झळकले आणि मला खात्री आहे की याच्या आधी कधीही त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसावी.. आम्ही मित्र सुद्धा आपापसात बोललो की, अरे यार आपल्या नॅशनल हॉस्पिटल नाव सर्व ठिकाणी झळकले..

पुढच्या झलकीत मी तुम्हाला माझ्या शालेय जीवनातील काही प्रातिनिधिक गंमती सांगीन, तोवर जरा थोडी कळ काढा..

यशवंत मराठे

#shivajipark #memories #childhood