रिदम हाऊस बंद झाले आणि पाठोपाठ स्ट्रॅन्ड बुक डेपो बंद झाले म्हटल्यावर मन विषण्ण झाले. एक पर्व संपल्याची भावना आली.

माझा दक्षिण मुंबईशी संबंध साधारणपणे १९७० च्या दशकाच्या अखेरीस आला जेव्हा मुंबईला बॉम्बे म्हणूनच ओळखले जाई. तिथे राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने तीच खरी मुंबई. त्यावेळी सुद्धा दक्षिण मुंबईची ओळख म्हणजे श्रीमंती थाट, high status आणि सगळं कसं ultra modern. तेथील ब्रिटिश कालीन इमारती, सिनेमा हॉल्स आणि रेस्तराँ यांचा एक वेगळाच रुबाब होता आणि आहे आणि त्यामुळे असेल कदाचित पण उगाचच दबल्यासारखं वाटायचं.

सिनेमे, संगीत, रेस्तराँ मध्ये खाणे आणि बिअर ही दक्षिण मुंबईची खास वैशिष्ठे होती. तेव्हा तिथे एकही मॉल, पब, सिनेप्लेक्स नव्हती आणि श्रीमंती असली तरी फाईव्ह स्टार कल्चर पण नव्हते. गमंत म्हणजे ताज महाल हॉटेलच्या शामियाना कॉफी शॉप मध्ये एक कप कॉफीची किंमत नऊ रुपये होती (सर्व टॅक्स सहित) पण ती सुद्धा फार क्वचितच परवडायची. आणि त्या कॉफीची मुख्य मजा म्हणजे नऊ रुपयात कितीही कप पिऊ शकण्याची सवलत. तुमच्या कपातील कॉफी संपली की वेटर परत रिफील करायचा. पण पण नऊ रुपये असण्याच्या वेळा किती?

मला स्ट्रॅन्ड बूक डेपो मधे जाऊन पुस्तके चाळायला खूप मजा यायची. पुस्तक विकत घेणे कधीतरी सठीसहामाशी. तसेच रिदम हाऊसमध्ये बऱ्याच वेळा नुसतेच संगीत ऐकायला जाणे हा एक आवडता छंद होता; अगदी क्वचित वडिलांनी आणायला सांगितलेली एखादी रेकॉर्ड विकत घेतली असेल तर ती देखील त्याचे वेगळे पैसे त्यांच्याकडून मिळाले असतील तरच. जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये चक्कर मारण्याचे नाटक खूप वेळा करायचो कारण काहीतरी नयनसुख मिळण्याची आशा. आर्ट मध्ये कुठे काय कळत होतं. माझा इंटरेस्ट वेगळ्याच आर्ट मध्ये असायचा. तिथेच समोवर मधे बियर आणि लंच, पण ते सुद्धा काही खास प्रसंग असला तर. कधीतरी मित्रांबरोबर गाडी किंवा मोटरसायकल वरून मलबार हिल वर एक चक्कर आणि नंतर कॅफे नाझ मधे बसून बियर पिणे हा एक वेगळाच अनुभव होता. तिथून दिसणारा क्वीन्स नेकलेसचा नजारा अवर्णनीय असाच होता. Simply Breathtaking.

View from Cafe Naaz 👆

तर मग कधी वेगळा अनुभव म्हणून मोकॅम्बो कॅफे किंवा वे साईड इन ला जाणे. कधी क्रिस्टल मधील साधे जेवण तर कधी सत्कार मधील थाळी. स्ट्रॅन्ड, रिगल किंवा इरॉसला सिनेमा बघणे हे माझ्यासारख्या मराठी मिडियम शाळेतील मुलाच्या दृष्टीने स्वप्न पूर्ण होण्याचा अनुभव असे. इंग्रजी कळण्याच्या नावाने पूर्ण बोंब पण तिथल्या थिएटर मध्ये सिनेमा बघितला हीच एक किक असायची.

दुर्दैवाने ते सगळं संपलय. स्ट्रॅन्ड सिनेमा, कॅफे नाझ, समोवर, सत्कार, क्रिस्टल, स्ट्रॅन्ड बुक डेपो आज अस्तित्वात राहिले नाहीत. मोकॅम्बो, वे साईड इन आज माझ्या आठवणीपेक्षा पूर्ण बदलेले आहेत. मागे राहिल्यात त्या फक्त आठवणी; ज्या जुनी ओढ उत्पन्न करतात पण शेवटी फार दुःख देतात. पण अंतिमतः कालचक्राचा हा परिपाक अपिरहार्य आहे हे ही तितकेच खरं.

RIP South Bombay of my teenage and which I still yearn for.

Yeshwant Marathe

#reminiscence #southmumbai #southbombay