जीवनाचे / आयुष्याचे ध्येय

जेव्हा आपण निसर्गचक्राचा विचार करतो तेव्हा पार भंडावून जायला होतं. अगदी किडामुंग्यांपासून मानवापर्यंत असलेलं हे एक अभूतपूर्व चक्र आहे. आपण असेही बघतो की त्यातील प्रत्येक घटकाचे या भूतलावर काहीतरी प्रयोजन आहे, जगण्याचा काहीतरी हेतू आहे.

जनावरांचा विचार केला तर असे जाणवते की तहान-भूक आणि मैथून (लैंगिक वासना) यांची पूर्तता करून पुढील प्रजोत्पादन करणे हीच त्यांची इतिकर्तव्यता आहे. जनावरांना मन नाही त्यामुळे ते विचार करू शकत नाहीत त्यामुळेच निसर्गाच्या या उत्क्रांतीच्या चक्रात मानवाचे स्थान सर्वात वरचे आहे.

गेल्या ४००-५०० वर्षात मानवाने केलेली प्रगती ही थक्क करणारी आहे. विज्ञानाच्या मदतीने अशक्य किंवा अतर्क्य वाटणाऱ्या कित्येक गोष्टी सहजप्राय झाल्या आहेत. रोज नवनवीन शोध लागत आहेत आणि ही प्रगती चालूच आहे. त्यामुळेच मानव विचार करू लागला असेल की माझ्या आयुष्याचे ध्येय किंवा उद्देश्य काय? पण मला असेही वाटले की मानवाने असा विचार करावा की नाही? काय गरज आहे ध्येय किंवा उद्देश्य शोधण्याची? सर्व लोकांचे एकच ध्येय असू शकते का? आज समाजात ऐवढी आर्थिक, मानसिक तफावत आढळते की एकसमान विचार असणे अशक्यप्राय आहे. ज्या माणसाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल त्याला असला विचार करायला तरी वेळ आहे का? आणि जो मनुष्य श्रीमंत आहे तो देखील असा विचार करणे जरा अवघडच कारण त्याच्या मते त्याने त्याच्या कष्टांनी संपत्ती कमावली आहे आणि ती अजून वाढविणे किंवा टिकवून ठेवणे हेच त्याचे मोठे ध्येय आहे. पण तरी सुद्धा अनेक लोकांना “मी कोण आहे, जग काय आहे आणि आपला या जगाशी संबंध काय” या विचाराने झपाटून टाकलेले असते; आणि ही आत्मज्ञानाची तीव्र जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

हिंदू धर्मातील एक महत्वाचा सिद्धांत हा “पुनर्जन्म आहे” असे मानणारा आहे. इतर धर्मीय ही गोष्ट मान्यच करत नाहीत त्यामुळे त्यांची विचारधारणा सर्वस्वी भिन्न आहे. मग मी स्वतःलाच प्रश्न विचारला की मी तरी पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो की नाही? जेव्हा मी माणसामाणसातील आर्थिक, मानसिक आणि शारीरिक तफावत बघतो तेव्हा असे जाणवते की कुठलाही मनुष्य आयुष्यात दुःख मागून घेणार नाही. जर माणसाला निवड करणे शक्य असते तर प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुख, आनंद आणि समाधान निवडले असते परंतु तसे घडताना दिसत नाही. मग हे सुखदुःखाचे भोग कुठून आणि कसे आले? तेव्हा मात्र मला काही अंशी पटले की ह्या गोष्टी पूर्वजन्मातील कर्मांचा परिपाक असू शकतील. म्हणूनच पूर्वसुकृतानुसार आपल्याला या जन्मी चांगले, वाईट भोग भोगावे लागतात आणि पुढील जन्मांमध्ये देखील तेच सुरु राहणार आहे.

एकदा पूर्वजन्म मान्य केला किंवा झाला की मग मात्र या आयुष्याच्या ध्येय, उद्देश्य याचा विचार भंडावून सोडतो; आणि आयुष्यात अध्यात्माचा प्रवेश होतो. पण अध्यात्म म्हणजे काय? अंधश्रद्धा, देवपूजा, कर्मकांड? तसे असेल तर अशा अध्यात्माशी संलग्न होणे कर्मकठीण काम; आणि ते जर तसे नसेल तर ते काय आहे? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे देवाचे अस्तिस्त्व आपण मानतो की नाही? आज माणसाने कितीही प्रगती केली तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विज्ञानाला संपूर्ण अनुत्तरित आहेत. त्यामुळे अंधश्रद्ध नसला तरी माझा देवावर सश्रद्ध विश्वास आहे.

आज अध्यात्म म्हटले की साधक, साधना, संयमन वगैरे शब्द कानावर आदळत असतात. कोणाशीही बोलायला गेले किंवा विषय जरी काढला तरी ध्यान करणे, नेम करणे या गोष्टींचा मारा चालू होतो. सांगण्यात काय येते की करायला, बसायला सुरुवात करा, हळूहळू सवय होईल; मन विचाररहित करता येईल तेव्हाच आत्मशोधाची सुरुवात होईल आणि असे बरेच काही. प्रत्येक व्यक्तीची जातकुळी संपूर्णपणे वेगळी असते त्यामुळे सर्वांना समान फूटपट्टी कशी लागणार? दुसऱ्याचे ऐकून काही करायला जावे तर मन लागत नाही, सातत्य तर अजिबात नाही. टंगळमंगळ होते, बघू नंतर कधी तरी सुरुवात करू असे म्हणत काहीच होत नाही. माझ्या स्वतःच्या बाबतीत विचार केला तर ध्यान करणे ह्याचा मी थोडाफार प्रयत्न केला पण त्यात कधीही मन रमले नाही.

जेव्हा मी स्वतःचा विचार करतो तेव्हा असे जाणवते की जगातील खूप कमी नशीबवान लोकांपैकी मी एक आहे. सधन कुटुंबात जन्म, आई-वडील, भावंडे, बायको, मुले, पैसाअडका, मित्र सगळं चांगलं चांगलं. कुठे फार कुरकुर करावी अशी परिस्थिती आली नाही. मग असं वाटलं की जर कुठच्याही गोष्टीची लालसा किंवा आसक्ती नसेल, आयुष्यात सर्वसाधारणपणे आनंद आणि समाधान असेल तर अशी मनःशांती टिकवणे हेच आयुष्याचे ध्येय का होऊ शकत नाही?

कोणत्याही मनुष्याला आपली सुखाची स्थिती कायम रहावी असे वाटत असते. परंतु सुखदुःख हे आपल्या कल्पनेवर वा विचारांवर अवलंबून असल्याने आपल्या मनासारखे घडले की सुख होते आणि मनाविरुद्ध घडले की दुःख होते. आपल्याला व्यवधान असल्याशिवाय जगणे जड जाते, म्हणूनच आनंद भोगण्यास आपल्याला वस्तू अथवा व्यक्तीची गरज भासते त्यामुळे ती वस्तू अथवा व्यक्ती दूर गेल्यावर आनंदही मावळतो. मग आपण कल्पनेने आनंद निर्माण करतो व त्यात रमतो. पण अशी खात्री कोण देणार की असे सुख आणि आनंद कायम मिळत राहील? ते तर अजिबात शक्य नाही कारण बदल ही आयुष्यातील एकच कायम गोष्ट आहे.

अध्यात्माचे खरे गमक हे या गोष्टीशी निगडित आहे. आयुष्यात काहीही घडले तरी आपला समतोल न बिघडवू देणे हे अत्यंत कर्मकठीण काम आणि इथे भगवदगीतेतील ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, आणि भक्तिमार्ग यांचे महत्व लक्षात येते. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” हे गीतेतील वचन वाचायला आणि समजायला तसे सोपे पण पचवणे आणि आचरणात आणणे कर्मकठीण. कोणतेही कर्म मनापासून करणे व त्यात भगवंताची आठवण ठेवणे हे समाधानी जीवनाचे मर्म आहे. कर्म तर करायचे पण त्याचा कर्ता मी नव्हे ही जाणीव जपायची ही कसरत एकदा जमली की मनाचा उडणारा गोंधळ हळूहळू नाहीसा होईल असे मला वाटते. सदैव एकच स्मरण कायम ठेवायला हवे – “मी कर्ता नाही, मी एक अलिप्त निरीक्षक आहे, आणि आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींकडे मी फक्त साक्षीभावाने बघणार आहे.” हे साधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याला जो झेपेल तो मार्ग त्याने निवडावा. अध्यात्म कोणत्याही धर्म वा पंथाशी निगडित नाही. जी गोष्ट दुसऱ्याने आपल्या बाबतीत करू नये असे आपल्याला वाटते ती आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे म्हणजे आध्यात्मिक भूमिकेवर असणे असे मला वाटते.

कर्तेपण जाणे आणि अखंड आनंद समाधान (सच्चिदानंद) टिकणे हेच अध्यात्माचे आणि पर्यायाने आयुष्याचे अंतिम ध्येय असावे असे मला वाटते.

यशवंत मराठे

#lifemission #mission #spiritual #ध्येय #आयुष्य #जीवन

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.